मुंबई21 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते तिथे दोन तासांच्या वर बसत नाही. त्यांना नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला कोण घेऊन जात आहे?, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
नव्या संसद भवनाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. मात्र, या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नाही म्हणून विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे.
नवीन इमारत हे लोकांच्या आस्थेचे मंदिर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवीन इमारत केवळ संसद भवन नाही. तर, देशातील 140 कोटी लोकांच्या आस्थेचे मंदिर आहे. अशा मंदिराच्या उद्घाटनावर बहिष्कार घालणे म्हणजे लोकशाहीला नाकारण्यासारखे होईल. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी संसदेच्या एन एक्स इमारतीचे उद्घान केले होते. तेव्हा विरोधकांना राष्ट्रपतींची आठवण झाली नाही का? इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचेही उद्घाटन केले आहे. तेव्हा विरोधकांना राज्यपालांची आठवण झाली नाही का? राजीव गांधी यांनी संसदेतील वाचनालयाचे उद्घान केले होते. तेव्हा विरोधकांची ही भूमिका कुठे गेली होती?, अशी प्रश्नांची सरबत्ती देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सोनिया गांधींनीही विधानभवनाचे उद्घाटन केले
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी केलेल्या विधानभवनांच्या उद्घाटनाची यादीच वाचून दाखवली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, नितीश कुमार यांनी बिहार विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहाचते लोकार्पण केले. तामिळनाडूतील विधानभवनाचे उद्घाटन हे तर सोनिया गांधी यांनी केले आहे. त्यावेळी त्या फक्त एक खासदार होत्या. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांनीही आपापल्या विधानभवनातील सभागृहांचे लोकार्पण केले आहे.
विरोधक हे खुर्चीचे व्यापारी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक हे खुर्चीचे व्यापारी आहेत. केवळ खुर्चीसाठी राजकारण करणारे हे लोक आहेत. सत्तेच्या लालसेसाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत. कारण आपण एकएकटे नरेंद्र मोदींचा सामना करू शकत नाही, याची पूर्ण जाणीव त्यांना आहे. मात्र, ते सर्व एकत्र आले तरी मोदींचा सामना करू शकत नाहीत. निवडणुकीत मोदींना पराभूत करण्याचे त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही.
हेही वाचा,
प्रत्युत्तर:देवेंद्र फडणवीसांवर गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ, आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवू नका- संजय राऊत
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ आली आहे. फडणवीसांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवू नये, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राजकारणाच्या पलीकडे जाऊन मातोश्री नाते जपते, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले होते. त्यावर टीका करताना बाळासाहेब ठाकरे हे नाते जपणारे नेते होते. मात्र, उद्धव ठाकरेंना त्याचा विसर पडला, अशी टीका देवेंद्र फडणीसांनी केली होती. त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. वाचा सविस्तर