मुंबई41 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंच्या मुद्यावरून भाजपवर तिखट टीका केली आहे. भ्रष्ट समीर वानखेडेला वाचवण्यासाठी भाजपाचे लोक का पुढे आलेत? तो भाजपाचा कोण लागतो? सरकारी सेवेत असणारा वानखेडे नागपूरला जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला का भेटी देतो? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांनी या प्रकरणी भाजपवर केली आहे.
नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांची भेट घेऊन राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा केली. या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान आदी नेत्यांचा समावेश होता. यावेळी पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली.
महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. सामाजिक एकोपा राखण्याचा महाराष्ट्राचा लौकिक आहे. पण गत काही महिन्यांतील घटनाक्रम पाहता राज्यातील कायदा – सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही जण करत असल्याचे स्पष्ट होते. 2 धर्मांत तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न काही संस्था, संघटना करत आहेत. विशेषतः काही जण प्रक्षोभक विधाने करुन वातावरण गढूळ करत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी काँग्रेसने या प्रकरणी आपल्या निवेदनात केल्याचे नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यातील सामाजिक ऐक्याला गालबोट लावून संभाजीनगर, अमरावती, अकोला, शेवगाव, अहमदनगर व त्र्यंबकेश्वरमध्ये जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे काम झाले. कायदा सुव्यवस्था बिघडवणे राज्यासाठी अत्यंत चिंताजनक बाब असून, अशा प्रकारांना खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. काही संघटनांचे नेते प्रक्षोभक वक्तव्य करून सामाजिक आरोग्य बिघडवत आहेत. त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. पण त्यानंतरही महाराष्ट्रात या आदेशांचे पालन दिसत नाही. यामुळे राज्यातील पोलिस यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा डाव
त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याच्या प्रकरणाला काही संघटनांनी जाणीवपूर्वक वादाचा रंग दिला. पण गावकऱ्यांनी सामंज्यस्याची भूमिका घेत शांतता टिकवून ठेवली. सध्या काही संघटनांचे लोक त्र्यंबकेश्वरला जाऊन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक शांतता भंग करून वातावरण पेटवण्याचे काम करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.
भ्रष्ट अधिकारी समीर वानखेडेंचे भाजपकडून समर्थन का?
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआय कारवाई सुरु आहे. त्यांच्या भ्रष्ट कारभाराची सध्या चौकशी सुरु आहे. वानखेडेंवर नामांकित व्यक्तींना ब्लॅकमेल करुन माया गोळा केल्याचा आरोप आहे. वानखेडेंची सीबीआय चौकशी सुरु असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवारा यांच्यासह भाजपचे अनेक नेते त्यांचे समर्थन करत आहेत. वानखेडेला वाचवण्यासाठी भाजपाचे लोक का पुढे येत आहेत? वानखेडे भाजपाचा कोण लागतो? सरकारी सेवेत असणारा वानखेडे नागपूरला जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला कशासाठी भेट देतो? तो कुणाला भेटला व कशासाठी? हे उघड झाले पाहिजे, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.
बारसू आंदोलकांवर बळाचा वापर
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना व महिला आंदोलकांवर पोलिस बळाचा वापर केला. ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना तडीपार केले जात आहे. हा पोलिसी अत्याचार थांबवून आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. मुंबई – वडोदरा मार्गासाठी भूसंपादन करताना आदिवासी महिलांवर अन्याय करण्यात आला. हा अन्याय थांबवून संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, असेही पटोले यावेळी म्हणाले.