जोतिबांचे लेक : मानुष जगण्याकडे वाटचाल!हरीश सदानी

Advertisement

‘‘स्त्री-पुरुष समतेसाठी काम करणारे ‘जोतिबांचे लेक’ ही संकल्पना वाचकांना के वळ आवडलीच नाही, तर वर्षभर अनेकांनी त्यावरचे आपले विचार मला सविस्तर पत्रांद्वारे कळवले. स्त्री-पुरुष समानता आणायची असेल, तर केवळ स्त्री सक्षमीकरण पुरणार नाही; पुरुषांच्या मानसिकतेवर दीर्घकाळ काम करावं लागेल, हे मनोमन पटल्याची पावती वाचक देत होते. स्वत:तील पुरुषीपण बाजूला ठेवत जाणीवपूर्व स्त्रियांसाठी सामाजिक काम करणाऱ्यांची संख्या सध्या तुलनेनं कमी असली, तरी यापुढील काळात ती नक्की वाढेल, अशी खात्रीच मला या अभिप्रायांमधून मिळत होती.’’

गेली तीन दशकं मी स्त्री-पुरुष समतेसाठी पुरुषांबरोबर करत असलेलं काम पाहून वर्षभरापूर्वी ‘चतुरंग’ने जेव्हा मला हे सदर लिहिण्यासाठी विचारलं, तेव्हा सुरुवातीला मी त्याकरिता फारसा तयार नव्हतो. माझ्या अनेक वर्षांच्या कामातील अनुभवावरून स्त्री-पुरुष समतेच्या मुद्दय़ांवर स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी ठोस काम करणाऱ्या देशभरातील पुरुषांची संख्या कमी आहे, असं वाटत असल्यानं मला अशा पुरुषांच्या कहाण्या वर्षभराच्या सदरासाठी मिळतील याची खात्री तेव्हा वाटत नव्हती, पण जेव्हा मी लिंगभावाच्या प्रश्नावर कार्यरत दिग्गज, ज्येष्ठ कार्यकर्त्यां कमला भसीन (ज्यांचं नुकतंच निधन झालं) तसंच मनीषा गुप्ते यांच्याशी यासंदर्भात बोललो तेव्हा त्यांनीही मला हे सदर लिहिण्यासाठी प्रोत्साहित केलं. लिंगभाव समानता मानणारे व त्या दृष्टीनं आपापल्या आयुष्यातील स्त्रियांना सक्षम करण्यासाठी धडपडणारे विविध क्षेत्रांतील, वयोगटांतील पुरुष शोधून त्यांच्या कथा सादर करण्याचं आव्हान मी स्वीकारलं आणि आज वर्षांच्या शेवटी हा लेख लिहिताना ते आव्हान पूर्ण केल्याचं समाधान आहे.

Advertisement

वर्षभरात मी २२ पुरुषांच्या, त्यांच्या कर्तृत्वाच्या खऱ्याखुऱ्या कहाण्या वाचकांसमोर मांडू शकलो.  हे पुरुष ग्रामीण,आदिवासी क्षेत्र, शहरी आणि निमशहरी भागांतील आहेत. या सर्व पुरुषांमध्ये लिंगभाव आणि लैंगिकतेच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेनं बघण्याची वृत्ती आहे. आपल्याला भावलेल्या लिंगभावाच्या प्रश्नांवर ते व्यक्तिगत तसंच व्यावसायिक पातळीवर जिद्दीनं व चिकाटीनं काम करत आहेत. त्यातील काही जणांचं काम हे एखाद्या संस्थेइतकं विशाल आहे, तर इतर तरुणांनी ध्येयवादानं दीर्घ काम करण्याच्या दिशेनं गेल्या काही वर्षांत ठोस पावलं उचलली आहेत. त्यांच्या अवतीभवतीच्या जनसमुदायांवर प्रभाव टाकून त्यांनाही पारंपरिक पुरुषी प्रवृत्ती तपासून ती बदलण्यासाठी ते प्रेरित करत आहेत. अनेक अडचणी, आव्हानं पेलत हे सारे जण न डगमगता वाटचाल करत आहेत.

या प्रत्येकाच्या वैशिष्टय़पूर्ण कार्याची माहिती घेऊन, त्यांना या कामासाठी प्रभावित करणारे घटक समजून-उमजून ते मर्यादित शब्दांत मांडताना माझ्या स्वत:च्या जाणिवाही  विस्तारल्या. लिंगभावविषयक (‘जेंडर’विषयक) दृष्टिक्षेप वृद्धिंगत झाला. बदलाच्या प्रक्रियेतील माझ्या प्रमेयांना पुष्टी मिळाली. अनेकांच्या हृदयद्रावक कहाण्या जाणून मी हेलावलो, अस्वस्थ झालो. अनेकदा डोळे पाणावले. स्त्री-पुरुष समतेच्या माझ्या कार्यात मला नवे ध्यासवेडे, समधर्मी, सहप्रवासी भेटले त्यामुळेही मी सुखावलो. पिढय़ान्पिढय़ा लिंगभेदानं तयार करून ठेवलेल्या पुरुषपणाची चाकोरी मोडणाऱ्या पुरुषांच्या- ‘जोतिबांच्या लेकां’च्या कहाण्यांना वाचकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले असंख्य वाचकांचे अभिप्राय संदेश, फोन व ई-मेलद्वारे मला मिळाले. सिंधुदुर्गमधील मालवणचे श्रीधर वामन मेस्त्री  आणि इतरही काही वाचकांचे अभिप्राय मला आवर्जून सांगावेसे वाटतात. मेस्त्री लिहितात, ‘‘जोतिबांचे लेक’ हे सदर मी आवडीनं वाचतो. तुमच्या लेखातून भेटलेली सगळी व्यक्तिमत्त्वं माझ्या सामाजिक जाणिवांना जागृत करतात, प्रेरणा देतात. आत्ममग्नतेकडे झुकवणाऱ्या माध्यमांच्या काळात ही मंडळी नि:स्वार्थ भावनेनं, कसलाही आव न आणता समाजाला आरसा दाखवण्याचं काम अनंत अडचणींचा सामना करूनही अगदी लीलया पार पाडताहेत. समाजासमोर उभ्या ठाकलेल्या अवजड प्रश्नांची उत्तरं शोधताना त्यांनी दिलेलं अमूल्य योगदान तुम्ही अगदी सोप्या भाषेत आमच्या समोर ठेवता. यात कुठेही विभूतिपूजा नसते. कागदी आकडय़ांच्या टक्केवारीपेक्षा जमिनीवरच्या कामाची माहिती वाचल्यावर समाजाबरोबर एकूण व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, विचार बदलतात, चळवळीचं महत्त्व पटतं..’

Advertisement

 काही वाचकांनी तर लेख वाचून संबंधित कार्यकर्त्यांविषयी आणखी माहितीही विचारली, ही त्यांच्या कामाची पावतीच होती. अलिबागचे बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव धामणकर त्यांच्या पत्रात लिहितात, ‘आजच्या आपल्या भोवतालच्या जगाच्या बातम्या नैराश्य आणणाऱ्या असताना हे सारे पुरुष ‘ओअ‍ॅसिस’ वाटतात, जीवनाला उभारी देतात.’ बारामती येथील ‘शारदाबाई पवार महिला महाविद्यालया’तील उपप्राचार्य

प्रा. डॉ.  श्रीकुमार महामुनी हे नियमितपणे हे सदर वाचत आले आहेत. ते लिहितात, ‘या लेखमालेतील चाकोरीबाहेरचा विचार व कृती करणारी माणसं जाणून घेणं अनेक पुरुष वाचकांना आपल्यात दडलेल्या पारंपरिक विचारांची मांडणी बदलवण्यास भाग पाडेल. लेखकानं भेटवलेली व्यक्तिमत्त्वं आपल्याला नेहमीच्या आपल्या व्यग्र आयुष्यात कदाचित भेटली नसती. आता मात्र या कहाण्या वाचून सर्व वाचकांना एक नवी दृष्टी प्राप्त झाली असेल असं वाटतं. लेखमालेतील सर्व ‘जोतिबांचे लेक’ हे स्त्रियांच्या संवेदना समजून घेणारे, अनेक पुरुषांकरिता दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतील. ‘गाली बंद’सारखं अभिनव, लोकाभिमुख अभियान चालवणाऱ्या गोरखपूर येथील  मनीष कुमार यांची भेट या  लेखमालेमुळे झाली हे फार चांगलं. अक्षत सिंघल या तरुणाची ‘मुलगे घडवणारी प्रयोगशाळा’ही मला विशेष भावली. स्त्रियांच्या दु:खानं त्रस्त होऊन निर्धारानं स्त्रियांच्या सक्षमीकरणाकरिता लढणारे कमल नायक, तसंच धरणीकोटा सुयोधन यांच्या कार्याचा मागोवा हा वाचकांना भिडणारा, बदलासाठी प्रेरित करणारा आहे. यांतील अनेक पुरुषांशी माझ्या सहकाऱ्यांनी संपर्क साधला असून त्यांना आमच्या महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन विद्यार्थिनींना संबोधित करण्यासाठी आम्ही बोलवणार आहोत.’

Advertisement

गडचिरोलीमधील दुर्गम भागात कुरखेडा येथे महाविद्यालय चालवणाऱ्या प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनीदेखील लेखमालेतील त्यांना भावलेल्या कथांविषयी लिहिलंय,‘पुरुषभान ते समाजभान असा प्रवास करणाऱ्या ध्येयवेडय़ा पुरुषांच्या कामाची परिणामकारकता या लेखमालेतून मला जाणवली. या खऱ्याखुऱ्या हिरोंच्या अस्सल कथा माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करतील याची मला खात्री आहे.’ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक तरुण ‘जोतिबांचे लेक’ वाचून आपलं मनोगत मला  कळवत होते. यांपैकी गणेश वाडकर हा तरुण लिहितो, ‘स्त्री सुरक्षिततेसाठी ‘वॉर अगेन्स्ट रेल्वे राउडीज’ ही मोहीम राबवणाऱ्या दीपेश टँक या तरुणाची कथा मला खूप स्फूर्ती देणारी वाटली. बलात्कार, छेडछाड यांसारख्या घटना वाढत असताना कृतिशील तरुण पुरुषांचं कार्य खूप सकारात्मक ऊर्जा देतं. या लेखमालेमुळे ‘महिला विकास व शिशु संस्कार केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मला लैंगिकता, एड्स यांसारख्या विषयांवर मोकळेपणानं बोलण्यास मदत झाली.’ बेलापूर, नवी मुंबई येथे राहणाऱ्या स्त्रीवादी कार्यकर्त्यां लक्ष्मी यादव लिहितात, ‘या सदरातील पुरुष आपल्यासारखेच सर्वसामान्य आहेत, मात्र त्यांनी स्त्री-पुरुष विषमतेनं नुसतं अस्वस्थ न होता ही विषमता कमी व्हावी यासाठी ठोस काम सुरू केलं आहे हे विशेष. रवींद्र केसकर या गृहस्थांची गोष्ट म्हणजे एका पितृसत्ताक व्यवस्थेतील पुरुषानं पुरुष म्हणून मिळणारे सत्तेचे सगळे फायदे उपभोगले, स्वत: चुकलेही आणि त्या चुकांतून घडलेही. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी समतेसाठी काम सुरू केलं. पुरुष म्हणून मिळणारे फायदे सोडणं हा त्यांच्यासाठी माणूस म्हणून जास्त प्रगल्भ होण्याचा प्रवास होता. विशेष बाब ही की, त्यांनी आपण आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांशी किती असंवेदनशील पद्धतीनं वागलो याची सार्वजनिक कबुली दिली. माझ्या मते त्यांचा हा प्रवासही सोपा नाही आणि ते म्हणतात त्याप्रमाणे ‘मी शोषक होतो आणि अजूनही स्त्री-पुरुष समतेमधील प्रवासी आहे,’ हे मान्य करणंही सोपं नाही. अनेकदा पुरुष हे मान्य करत नाहीत, की त्यांचं वागणं शोषणपूर्ण आहे आणि हे त्यांनी मान्य केलं तरी स्वत:त बदल करणं, सत्ता सोडून देणं त्यांच्याकडून होत नाही. समतेसाठी अनेक वर्षांपासून स्त्रियांबरोबर काम होत आहे, पण पुरुषांबरोबर काम होणं ही काळाची गरज आहे. या लेखमालेमुळे ही बाब अधोरेखित झाली हे छान झालं.’

सावंतवाडीमधील ग्रामीण स्त्रियांबरोबर काम करणाऱ्या वंदना करंबेळकर या कार्यकर्त्यां लिहितात, ‘या सदराचं वेगळेपण शीर्षकापासूनच जाणवतं. कारण ‘लेक’ हा शब्द लिंगसमभावाचं उत्तम प्रतीक आहे. बहुतांश वेळा लेक म्हटलं तर आईचा संदर्भ असतो. तर या स्तंभाद्वारे बापाचा संदर्भ येतो. बाप म्हणजे कर्तबगार, गुणी बापमाणूस या अर्थानं.’  प्रवाहीपणा जपत सतत लिहिणाऱ्या ८९ वर्षांच्या सुमन फडके यांनीदेखील मी शब्दबद्ध केलेला पुरुषांचा हा प्रवास प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करणाऱ्या अनेकांना प्रेरित व थक्क करणारा, दिलासा देणारा आहे, असं कळवून त्या हे सदर उत्कंठेने वाचत असल्याबद्दल आवर्जून सांगितलं.  

Advertisement

मानसशास्त्र विषयाच्या निवृत्त प्राध्यापक

डॉ. नंदिनी दिवाण यांनी मला लिहून कळवलं, ‘या सदरातील लेखन वेगळ्या प्रकारचं आहे. पारंपरिक लिंगभेदांवर आधारित विचारसरणी आणि साचेबद्ध पुरुषत्वाच्या कल्पना नाकारून वेगळ्या प्रकारचं कार्य करणाऱ्या आणि तसं जीवन जगणाऱ्या पुरुषांची नोंद ठेवायची काहीच विशेष व्यवस्था समाजात नाही. त्यामुळे मानवतावादी मूल्यं जपत, सुसंस्कृत समाज निर्माण करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा मोलाचा वाटा असूनही त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. ‘सावित्रीच्या लेकी’ होण्यासाठी स्वत:ची प्रबळ इच्छा, कुटुंबीयांचं उत्तेजन, सरकारी वा इतर सवलती, आरक्षण, विशेष संस्था असं खूप पोषक वातावरण आहे. याउलट ‘जोतिबांचे लेक’ होण्याच्या प्रक्रियेत कौटुंबिक/ सामाजिक विरोध, अंतर्मनातलं द्वंद्व, क्वचित कायदेशीर बाबी, आधाराचा अभाव असे अनेक अडथळे येऊ शकतात. त्यामुळे असे लेक होणं जास्त अवघड आहे! म्हणूनच अशा लेकांचं खास कौतुक आणि अभिनंदन! या सदरातील लेखांचे एक पुस्तक व्हावे, ही सदिच्छा. लिंगसमभावा- विषयी जागृती निर्माण करण्यासाठी आयोजलेल्या उपक्रमांत आणि कार्यशाळांमध्ये, तसंच भेट देण्यासाठी ते खूपच उपयुक्त ठरेल.’ त्यांच्याबरोबरच अनेक वाचकही या लेखमालेचं पुस्तक व्हावं, असं मला लिहून कळवत होते. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होत आहे. ‘ग्रंथाली प्रकाशन’ ही लेखमाला ‘चाकोरी मोडणारे पुरुष’ या नावानं पुस्तकरूपानं आज (२५ डिसेंबर) प्रकाशित करत आहे. 

Advertisement

  स्त्रियांना सन्मानानं व सुरक्षितपणानं जगता यावं यासाठी चाकोरी मोडत वेगळी वाट चोखाळणाऱ्या पुरुषांच्या कहाण्या या समस्त पुरुषांचं जगणंही मानुष जगण्याकडे, माणूसपणाच्या वाटेकडे जाण्यासाठी प्रेरित करेल, ही आशा व्यक्त करत मी आपला निरोप घेत आहे. धन्यवाद.

[email protected]

Advertisement

The post जोतिबांचे लेक : मानुष जगण्याकडे वाटचाल! appeared first on Loksatta.Source link

Advertisement