साताऱ्यातील माण तालुक्यात दुष्काळग्रस्त प्रदेश असलेल्या म्हसवड या गावी प्रभातचा जन्म झाला.
|| हरीश सदानी
लहानपणापासून साहसी गोष्टींची आणि खेळाची आवड असणारा साताऱ्यातील माण तालुक्यातला प्रभात परदेशी गेला आणि त्याला जागतिक क्रीडाविश्वाच्या भव्यतेची ओळख झाली. तीच ओळख आपल्या ग्रामीण मुलींना घडावी म्हणून त्यानं ‘माणदेशी चॅम्पियन्स’ संस्था सुरू केली. या त्याच्या प्रयत्नांमधून गेल्या १० वर्षांत ८,००० मुलामुलींनी विविध खेळांत प्रशिक्षण घेतलं असून त्यातून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळणारे क्रीडापटू तयार झाले. क्रीडापटू होण्याबरोबरच या मुलींच्या व्यक्तिगत आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणाऱ्या प्रभात सिन्हा या जोतिबांच्या लेकाविषयी…
टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारतीयांनी मिळवलेल्या पदकांच्या निमित्तानं खेळांच्या दृष्टीनं देशात असलेल्या वातावरणाबाबत थोडीफार चर्चा झाली. पदकविजेत्यांपैकी मीराबाई चानू, लव्हलिना बोरगोहेन आणि पी. व्ही. सिंधू यांनी केलेल्या खडतर प्रवासाबद्दल बोललं गेलं. सुमारे १ अब्ज ३४ कोटींची लोकसंख्या असलेल्या देशात उत्तम खेळाडू निपजण्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि दूरदर्शीपणा असायला हवा, त्याची वानवा आपल्याला दिसते. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील एका गावात जन्मलेल्या प्रभात सिन्हा या ३२ वर्षांच्या तरुणानं वंचित मुलांमध्ये- विशेषत: मुलींमध्ये क्रीडाविश्वाबद्दल ‘पॅशन’ निर्माण करून त्यांच्यातून विजेते घडवण्यासाठी घेतलेले कष्ट व त्याची वाटचाल अतिशय रोमांचक व प्रेरणादायी आहे.
साताऱ्यातील माण तालुक्यात दुष्काळग्रस्त प्रदेश असलेल्या म्हसवड या गावी प्रभातचा जन्म झाला. घरापासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत तो शिकत होता. शाळेच्या वाटेवर तरस, लांडगे यांसारखे प्राणी नेहमी दृष्टीस पडत. त्याचे आईवडील ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’ या जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या सामाजिक चळवळीत सक्रिय होते. ८७ वर्षं जगलेली प्रभातची आजी- गंगूबाई (अक्का)
एक समर्थ, धाडसी स्त्री. ती प्रभातला साहसी खेळांसाठी व कृतींसाठी प्रोत्साहन देत असे. घराजवळच्या तलावात पोहायला जाणं, मधमाश्यांची पोळी काढण्यासाठी झाडावर चढणं, झाडाच्या शेजारी असलेल्या विहिरीत उड्या मारणं, सूरपारंब्यांसारखे पारंपरिक खेळ खेळणं, हे प्रभात करत होता. रानात अनवाणी, निडरपणे फिरताना साप पकडणं, सापांचे प्रकार ओळखणं हे तो आजीकडून शिकत होता. शाळेत राबवलेल्या ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत प्रभात आठवड्यातले दोन दिवस शाळेच्या शेतजमिनीत मका लावणं, गांडूळ शेती यांसारखी कामंही करायचा. तो आठवी इयत्तेत शिकत असताना त्याच्या आईला-(चेतना गाला सिन्हा) यांना अमेरिकेत जाण्यासाठी येल विद्यापीठाची फेलोशिप मिळाल्यानं त्यांच्याबरोबर प्रभातलाही जाण्याची संधी मिळाली. तिथे गेल्यावर त्याला स्पर्धात्मक खेळांची सर्वप्रथम ओळख झाली. शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे तो माध्यमिक शिक्षणासाठी अमेरिकेतील कनेक्टिकट शहरातील शाळेत दीड वर्षं होता. नंतर साताऱ्यातील ‘यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालया’त अकरावी-बारावीमध्ये शिकत असताना तो विभागीय स्तरावर बास्केटबॉल, पोहण्याच्या शर्यतीत भाग घेऊ लागला. मित्रांबरोबर अधूनमधून स्कूटीवरून फिरत विविध गडांची सैर, सायकलीनं पुणे ते कोकण भ्रमंतीही करत होता. पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर प्रभातनं अमेरिकेत ‘स्पोट्र्स’ याच विषयात प्रबंध लिहून मास्टर्स केलं. त्याला अमेरिकेत क्रीडा उद्योगातील तीन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळाल्या. ‘नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन’च्या (एनबीए) व इतर खेळाडूंबरोबर फिरून विविध खेळस्पर्धांचं आयोजन, ब्रँडिंगसाठी समन्वयाची कामं करत असताना त्याचं संघटन व असंख्य व्यक्ती-संस्थांशी जोडण्याचं कौशल्य विकसित होत होतं.
मे २०१६ मध्ये अमेरिकेहून सुट्टीत भारतात परतल्यानंतर प्रभात एकदा जेवणासाठी पाटण तालुक्यातील एका शेतात थांबला होता. तिथे त्यानं पाहिलं, की एक १३ वर्षांची मुलगी कापडाच्या चिंध्यांपासून बनवलेल्या चेंडूनं मैत्रिणींबरोबर खेळत होती. भाजून काढणाऱ्या ४०-४२ अंश सेल्सिअस तापमानात खेळणाऱ्या त्या मुलीच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य प्रभातनं बघितलं. तिच्याशी बोलल्यावर त्याला समजलं, की ती शाळेत जात नव्हती. दररोज पहाटे
४ वाजता उठून ती ८ ते ९ तास ऊसतोडणीचं काम करत होती. सर्पदंशापासून आपला बचाव करत राबत होती. तिनं तिचं नाव सांगितलं – ‘नकुसा’. प्रभातनं हे नाव त्याआधीही ऐकलं होतं. ‘मुलगाच हवा’ अशी मानसिकता असलेले अनेक कुटुंबीय दुसऱ्या-तिसऱ्या मुलीनंतर जन्मलेल्या मुलींची नावं ‘नकुसा’ ठेवत असल्याचं त्याला माहिती होतं. या मुली १५-१६ वर्षांच्या झाल्या, की त्यांची लग्नं लावली जात असत हेही तो जाणून होता. त्याला त्या क्षणी नवं होतं, ते त्या आईवडिलांना ‘नकोशा’ असणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर खेळताना उमटलेलं हास्य. खेळांची ताकद काय असू शकते हे त्याला जाणवलं. ग्रामीण भारतातील सांघिक खेळांच्या संधींचा अभाव जाणून घेऊन तो दूर करण्यासाठीचे विचार त्याच्या मनात रुंजी घालू लागले.
अमेरिकेत परतल्यावर ‘स्पोटर्स एजंट’चं काम करून तो छानछोकीचं आयुष्य जगत होता, पण त्याच वेळी मायदेशी खेळासाठीचे चांगले बूटही विकत घेऊ न शकणाऱ्या, अनवाणी खेळणाऱ्या मुलामुलींचं स्मरण होऊन तो अस्वस्थ होत असे. त्यानं २०१६ च्या अखेरीस साताऱ्यात येऊन वंचित मुलामुलींना खेळांच्या संधी उपलब्ध करून देण्याविषयी दीर्घकाळ काम करण्याचा निर्णय पक्का केला. ‘माणदेशी महिला सहकारी बँक’ व ‘माणदेशी फाऊंडेशन’च्या माध्यमातून देशातील ग्रामीण स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांचा प्रभात हा पुत्र. या कामास पूरक म्हणून त्यानं ‘माणदेशी चॅम्पियन्स’ ही संस्था सुरू केली. जिथे जनावरांची चारा छावणी चालवली जात होती, त्या माळरानाचं ४०० मीटर धावण्यासाठीच्या ट्रॅकमध्ये रूपांतर के लं, कुस्तीसाठी दोन आखाडे सुरू केले. राज्यस्तरीय कुस्ती खेळणाऱ्या शाळेतील मित्राला बरोबर घेऊन मुलामुलींना कुस्ती शिकवण्यासाठी प्रवृत्त केलं. राज्यपातळीवरील पोहण्याच्या स्पर्धा घेता येऊ शकतील असा भव्य तरणतलाव उभारला. ५,००० चौरस फूट जागेत आधुनिक जिमही सुरू केलं. दररोज ४०० मुलामुलींना या सर्व सुविधांचा वापर करून खेळ खेळता यावेत यासाठी बस प्रवासाची व्यवस्था केली. मग दिवस उजाडतानाच मैदानात पोहोचलेली मुलं हसतखेळत, घाम गाळून उत्तम खेळाडू बनण्याचं स्वप्न उराशी बाळगू लागली. खेळण्यासाठी सोयीचे टी-शट्र्स, शॉट्र्सही मुलांना मिळू लागले. खेळण्याबरोबरच अंडी, केळी, दूध, खजूर, गूळ-शेंगदाणेही मिळत असल्यानं मुलांचा उत्साह वाढला.
स्वत:च्या पैशांची गुंतवणूक करण्याबरोबरच ‘इंडसइंड बँक’, ‘रिदम फाऊंडेशन’, देशविदेशातील खेळाडू व अनेक दानशूर व्यक्तींकडून आर्थिक सहाय्य मिळाल्यानं प्रभातनं ‘माणदेशी चॅम्पियन्स’च्या कामाचा विस्तार केला. खेळाच्या प्रशिक्षणाबरोबरच व्यावसायिक व इतर कौशल्य मुलामुलींना मिळावं यासाठी २०१७ च्या सुरुवातीस त्यानं ‘युवा विकास केंद्र’ उभारलं. यात नोकरीसाठी ‘रिझ्युमे’ लिहिणं, संवाद व नाटक लिहिणं, अर्थव्यवहार करणं, सायकल व मोटार चालवणं, याचं प्रशिक्षण मिळाल्यानं हजारहून अधिक मुलींची कौशल्यं विकसित झाली. यातील ७० मुलींना बँक, वन विभाग, होमगार्ड, पोलीस दल येथे, तसंच जिम प्रशिक्षक, कॉर्पोरेट शिक्षक, आहारतज्ज्ञ म्हणून नोकऱ्याही मिळाल्या.
२३ वर्षांची रेश्मा केवटे शाळा सुटल्यावर म्हशी राखण्याचं काम करायची. आधी इंग्रजीचं अवाक्षरही न येणारी रेश्मा ‘माणदेशी चॅम्पियन्स’मध्ये आल्यानंतर आत्मविश्वासानं ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’मध्ये खेळली. अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील निमंत्रित चॅम्पियनशिपही तिनं पटकावली. सरिता भिसे ही मुलगी पूर्वी शाळेच्या वाटेवर येणाऱ्या लांडग्यांचा मागोवा घ्यायची, ती राज्य हॉकी टीमची कॅप्टन बनली. काजल जाधव या माणदेशी कुस्तीपटूनं ७ राष्ट्रीय पदकं मिळवली. नम्रता तांदळे या जिल्हा पातळीवरील धावपटूनं पोलिसात भरती होण्याची इच्छा प्रभातजवळ व्यक्त केली. ‘माणदेशी स्पोटर्स अॅकॅडमी’मध्ये रीतसर प्रशिक्षण घेतलेली २२ वर्षांची नम्रता आज मुंबई रेल्वे पोलीसमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. ‘माझ्या गावातली मी पहिली स्त्री कॉन्स्टेबल आहे. युवा विकास केंद्रात आल्यामुळे लहान वयात माझं लग्न होणं टाळता आलं. आज मी मिळवती असल्यामुळे स्वत:चे निर्णय घेणं, कुणाशी विवाह करावा, या व इतर बाबतीतही निवड करणं, हे साध्य करू शकले,’ असं नम्रता अभिमानानं सांगते.
ऊसतोड कामगाराची मुलगी असलेली हॉकीपटू काजल आटपाडकर हिनं ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय स्पर्धेत २०१९ व २०२० मध्ये रौप्य पदक मिळवलं आहे. पाच बहिणी व एक भाऊ असलेली १८ वर्षांची काजल सध्या हरियाणा येथे शासकीय अकॅडमीमध्ये सराव करत आहे. लहानपणी विमानाकडे कुतूहलानं बघून, विमानात बसल्यावर जमीन कशी दिसत असेल, असा विचार करणारी काजल आता अनेक वेळा विमानानं प्रवास करून भरारी घेत आहे. वैष्णवी सामंत हीदेखील सुवर्णपदक मिळवलेली खेळाडू आहे. आपल्या अनुभवाबद्दल ती सांगते, ‘खेडेगावात मुलींना घराबाहेर जास्त वेळ राहायची परवानगी नसते. माझ्या आईवडिलांना शेजारपाजारचे अनेकदा सुनवायचे की, ‘मुलीला कशाला बाहेर पाठवता?’ माझं खेळातील यश पाहून आज तेच लोक त्यांच्या मुलींना बाहेर जाऊन खेळण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रोत्साहित करताहेत. विविध स्पर्धांतील बक्षिसांची रक्कम घरात दिल्यामुळेही आमच्याकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन हळूहळू बदलतोय, ही बाब मला सुखावणारी आहे.’
गेलं दशकभर ‘माणदेशी चॅम्पियन्स’नं सुमारे ८,००० मुलामुलींना विविध खेळांत प्रशिक्षित केलं आहे. यातले ३ जण आंतरराष्ट्रीय स्तरावर, ५० राष्ट्रीय पातळीवर, तर १०० हून अधिक जण राज्य व जिल्हा पातळींवर खेळले आहेत. गेली काही वर्षं सातारा, सांगली, सोलापूर येथील सुमारे ६० जिल्हा परिषदांनी चालवलेल्या शाळांतून १५० हून अधिक क्रीडा शिक्षक तयार करून ग्रामीण क्रीडा प्रशिक्षकांची एक फळी तयार करण्यासाठी प्रभात सध्या प्रयत्नशील आहे.
प्रभात सांगतो, ‘खेळांमध्ये भाग घेतल्यानं मुलामुलींचा आत्मविश्वास वाढतो. त्यांच्यात चिकाटी, समूहात काम करण्याची मनोवृत्ती वाढते. प्रामुख्यानं खेळांमुळे त्यांना त्यांची ओळख मिळते. खेळांमध्ये प्रावीण्य मिळवून प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यामुळे काही मुलींना सर्वप्रथम जी ओळख मिळाली, ते मी पाहतोय आणि मीसुद्धा माझ्याबाबतीत ते अनुभवलेलं आहे. अशा अनेक कुटुंबांत ज्यांना मुली नकोशा होत्या, मुलगेच हवे होते, ती कुटुंबं आज अभिमानानं मुलींबद्दल बोलताहेत हे मला खूप महत्त्वाचं वाटतं.’
सकस आहार, खेळण्यासाठी पुरेशी साधनं, साहित्य व प्रशिक्षक या गोष्टींवर सातत्यानं लक्ष केंद्रित करून २०२४ मध्ये भरवल्या जाणाऱ्या ऑलिंपिक्समध्ये माणदेशी खेळाडूंना भारताचं प्रतिनिधित्व मिळावं, असा ध्यास त्यानं सध्या बाळगला आहे. त्यासाठी त्याला शुभेच्छा!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.