मनोहर पारनेरकर samdhun12@gmail.com
आयुष्यभर शुद्ध कलेची उपासना करणाऱ्या बीथोवनने ‘द बॅटल सिंफनी’ नावाची निखालस ‘चालू’ रचना निर्माण केली. उच्च कलेचा हा महान प्रचारक असलं पोटभरू संगीत रचण्यास कसा तयार झाला त्याची ही शोककथा..
आयुष्यभर बीथोवनने शुद्ध कलेची उपासना केली. जगाला तो सतत सांगत आला की, ‘कलेचा उद्देश लोकांचं मनोरंजन करणं नसून, मानवी जीवन समृद्ध करणं हा आहे.’ तो उद्देश साध्य व्हावा म्हणून, जरी आम जनतेला कोणतं संगीत आवडतं हे त्याला पूर्णपणे माहीत होतं, तरी त्याने तसं संगीत कधी रचलं नाही. जनतेने कोणतं संगीत ऐकावं असं त्याला वाटत होतं तेच त्याने रचलं. असं असूनही या अलौकिक कलावंताच्या वादळी सांगीतिक कारकीर्दीत एक वेळ अशी आली की त्याने नि:संकोचपणे आपल्या कलामूल्यांशी प्रतारणा केली. ‘द बॅटल सिंफनी’ नावाची निखालस चालू रचना त्याने निर्माण केली. उच्च कलेचा हा महान प्रचारक असलं पोटभरू संगीत रचण्यास कसा तयार झाला त्याची ही शोककथा आहे.
मुळात ‘द बॅटल सिंफनी’ला सिंफनी म्हणणं चुकीचं आहे. वस्तुत: ती दोन भागांत विभागलेली अति सुमार ऑर्केस्ट्रा रचना आहे. बीथोवनच्या कलाजीवनातला हा काळ अंध:कारमय होता असंच म्हणावं लागेल. त्याची ‘थर्ड सिंफनी’- जी ‘द इरॉइका’ (वीरता) म्हणून ओळखली जाते, आणि जिचा पहिला प्रयोग १८०५ साली झाला, तिचा नेपोलियनशी संबंध आहे असा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात नशिबाने घेतलेल्या एका विचित्र वळणामुळे फ्रान्सशी अधिक सरळ आणि स्पष्ट संबंध होता तो ‘द बॅटल सिंफनी’चा! हा संबंध समजून घ्यायचा असेल तर प्रथम ‘द थर्ड सिंफनी’चा नेपोलियनशी संबंध कसा लावला गेला हे जाणून घेतलं पाहिजे.
फ्रेंच क्रांतीच्या धोरणांवर बीथोवनचा दृढ विश्वास होता. त्याचबरोबर तो नेपोलियनचा मोठा चाहताही होता. सुरुवातीस ‘द इरॉइका’ ही त्याची पथदर्शी रचना नेपोलियनला समर्पण करण्याचा त्याचा इरादा होता. पण नेपोलियनने जेव्हा १८ मे १८०४ रोजी स्वत:ला फ्रान्सचा सम्राट घोषित केलं तेव्हा बीथोवन खवळला. त्याचा पिआनोचा शिष्य आणि कामातला जोडीदार फर्डिनॅंड रीअस याला म्हणे तो संतापाने भविष्य वर्तवल्यागत म्हणाला, ‘हा नेपोलियन क्षुल्लक मानव निघाला. आता तो जनतेला पायदळी तुडवणार आणि जुलूमशहा होणार.’ असं म्हणून त्याने म्हणे ‘द इरॉइका’च्या मूळ प्रतीच्या समर्पण पृष्ठावरचं नेपोलियनचं नाव साफ खोडून टाकलं.
बीथोवनच्या प्रस्तुत रचनेचं लोकमान्य नाव जरी ‘द बॅटल सिंफनी’ होतं, तरी त्याने तिला दिलेलं टोपणनाव ‘वेलिंग्टन व्हिक्टरी’ होतं. डय़ूक ऑफ वेलिंग्टन (१७६९-१८५२) याने विटोरिया, स्पेन येथे नेपोलियनच्या सेनेचा पराभव केला, त्या विजयाला त्याने दिलेली ही सलामी होती. तमाम ब्रिटिश सेनापतींमध्ये सर्वात गाजलेला वीर डय़ूक ऑफ वेलिंग्टन हा होता. शिवाय नेपोलियनचा यमदूतही तोच होता. त्याने नेपोलियनविरुद्धच्या अनंत लढायांचा वॉटरलू मैदानावर १८१५ साली त्याला हरवून अंत केला. आपल्या रचनेला वेलिंग्टनच्या विजयाचं टोपणनाव देण्याच्या खवचटपणात भर म्हणून बीथोवनने ही सिंफनी फ्रान्सच्या परंपरागत शत्रूला- ब्रिटिश राजपुत्राला- भविष्यातील राजा जॉर्ज चौथा (१७६२-१८३०) याला अर्पण केली. डय़ूक ऑफ वेलिंग्टनविषयी वाचकांना रोचक वाटावी अशी दुसरी गोष्ट म्हणजे १७९९ साली जेव्हा तो साधासुधा आर्थर वेल्स्ली होता (त्याला डय़ूकचा किताब १८१४ साली देण्यात आला.) तेव्हा त्याने श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतानचा पराभव केला आणि १८०३ साली आसईच्या लढाईत मराठय़ांचा!
आता आपण मुख्य मुद्दय़ाकडे वळू. बीथोवनने ‘द बॅटल सिंफनी’ ही रचना केलीच कशी, याची विलक्षण कथा इथे सांगितली पाहिजे. व्हिएन्नास्थित जर्मन शोधक योहान मेल्ट्झेल (१७७२-१८३८) याच्या मागणीवरून त्याने या उघड उघड बाजारू रचनेची निर्मिती केली. मेल्ट्झेलच्या तीन शोधांचा बीथोवनशी थेट संबंध होता- पॅनहार्मोनिकॉम, कानाला लावायचा कर्णा आणि मेट्रोनोम. पैकी पहिलं यंत्र एक प्रचंड संगीतपेटी होती, ज्यातून वाद्यवृंदातली सर्व वाद्यं वाजवता येत. ‘द बॅटल सिंफनी’च्या रचनेत बीथोवनने या पेटीचा वापर करावा अशी कल्पना होती. पण त्याने अज्ञात कारणासाठी ते केलं नाही. मेल्ट्झेलने कर्णा खास कर्णबधिर झालेल्या बीथोवनसाठी बनवला होता. पण तो कधी चाललाच नाही. मेट्रोनोम हे घडय़ाळाच्या पद्धतीने चालणारं तालयंत्र होतं. रचनेच्या ठेक्यात मिनिटाला जितक्या मात्रा असतील तितक्या ते दाखवायचं. हे यंत्र वापरणारा पहिला रचनाकार होता बीथोवन. आज कैक वर्ष विजेवर चालणारे मेट्रोनोम सर्वत्र उपलब्ध आहेत.
‘द बॅटल सिंफनी’चा पहिला प्रयोग १९ ऑक्टोबर १८१४ रोजी व्हिएन्ना येथे सादर करण्यात आला. त्या कार्यक्रमास सहा हजारच्या आसपास श्रोते हजर होते. त्यांच्यात अनेक युरोपियन देशांच्या राजांचा आणि राजदूतांचा समावेश होता. या मान्यवरांचं त्यावेळी शहरात हजर असणं याला एक कारण होतं. नेपोलियनचा अंतिम पराजय झाल्यावर युरोपियन देशांच्या सीमा पुन्हा आखणं आणि त्यांचे आपापसात नवे करार होणं हे काम क्रमप्राप्त झालं होतं. त्यासाठी व्हिएन्ना कॉंग्रेसने आंतरराष्ट्रीय अधिवेशन भरवून या मंडळींना निमंत्रित केलं होतं.
‘द बॅटल सिंफनी’चा प्रयोग अपेक्षेप्रमाणे दणदणीत झाला यात नवल ते काय? गल्ला तुडुंब भरावा यादृष्टीनेच तर ती रचली होती. एकतर रचनेचा विषय तत्कालीन होता. शिवाय तो अधोरेखित व्हावा म्हणून बीथोवनने त्यात तोफांचे आणि बंदुकींचे बार, नगाऱ्यांचा गडगडाट असे अनेक आवाज अंतर्भूत केले होते. त्यामुळे प्रयोग भरपूर गोंगाटमय झाला. विचारवंत एडवर्ड सैद याने आपल्या काळात आणि वेगळ्या संदर्भात ज्याचं वर्णन onomatopoeic mimicry (ध्वन्यनुकारी नक्कल) असं केलं आहे, त्याचा हा अत्यंत वाईट नमुना होता. भरीस भर म्हणजे इंग्लंडची राष्ट्रगीतं आणि ‘For hels a jolly good fellow’ हे लोकप्रिय समूहगीत (ज्याची चाल मुळात फ्रेंच होती.)- या सुरावटीसुद्धा त्याने रचनेत घुसवल्या होत्या. त्यामुळे या रचनेची पातळी अधिकच घसरली होती. भाविकतेने थबथबलेल्या या रचनेचं व्हिएन्नाच्या नागरिकांनी मिटक्या मारत स्वागत केलं यात नवल नाही. या प्रयोगानंतर बीथोवनची स्वदेशी आणि परदेशी भरभरून वाहवा झाली. शिवाय जन्मात प्रथमच तो श्रीमंत नाही, तरी निदान कर्जमुक्त तरी झाला. पण त्याचबरोबर हा थोर माणूस दु:खीही झाला. का, ते आपण समजू शकतो.
‘द बॅटल सिंफनी’ला बीथोवनचं ‘कलात्मक वॉटरलू’ म्हणता येईल का? तर एका अर्थाने- ‘हो.’ पण एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. नेपोलियनला वॉटरलूने कायमचं संपवलं, तसं बीथोवनच्या सिंफनीने त्याला संपवलं नाही. ही एकदाच घडलेली गोष्ट होती. त्यानंतर त्याने आपल्या कलेत पुन्हा अशी तडजोड कधी केली नाही. तो ठार कर्णबधिर झाल्यावरसुद्धा नाही. या प्रकरणात सर्वात दु:खदायक गोष्ट अशी की, जिथे व्हिएन्नातल्या श्रोत्यांनी बीथोवनच्या ‘द इरॉइका’ किंवा ‘फिफ्थ सिंफनी’सारख्या दर्जेदार रचना अव्हेरल्या, तिथे जी रचना तिच्या रचनाकारालासुद्धा निकृष्ट वाटत होती तिचं त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं.
सरतेशेवटी एक गोष्ट आपण नाकारू शकत नाही. एकदाच का होईना, पण बीथोवनने ‘द बॅटल सिंफनी’ रचून आपल्या कलात्मक मूल्यांशी निर्लज्जपणे बेइमानी केली. तुलना करायचीच झाली- आणि ती काहीशी गैरलागू असली तरी- सत्यजीत राय यांनी १९७५ चा धमाकेदार चित्रपट ‘शोले’ बनवावा, अशातला हा प्रकार होता!
तरीही बीथोवनला न्याय द्यायचा झाला तर त्याला लगेच ‘कलेचा विक्रेता’ वगैरे न ठरवता त्याच्या गुन्ह्यचं गांभीर्य कमी करणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या विचारात घ्यायला हव्यात. एका सहानुभूतीशील संगीत समीक्षकाने या श्रेष्ठ रचनाकाराच्या ‘द बॅटल सिंफनी’चं वर्णन ‘मीठ-भाकरीची रचना’ असं केलं आहे. जेव्हा मेल्ट्झेलने पैशाच्या मोबदल्यात रचना करून देण्याची बीथोवनकडे मागणी केली तेव्हा त्याची आधीच खालावलेली आर्थिक परिस्थिती नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रियन चलनाच्या अवमूल्यनाने अधिकच बिघडली होती. त्याच्या स्थगित झालेल्या कारकीर्दीला चालना मिळण्याची तातडीची गरज होती. अशा वेळी मेल्ट्झेलने केलेली मागणी त्याला दैवी कृपा वाटली असेल तर त्यात नवल नाही. एका संगीत समीक्षकाने या एकूण प्रकारावर थोडक्यात साक्षेपी भाष्य केलं आहे, ते पटण्यासारखं आहे. तो म्हणतो, ‘बीथोवनने तन-मन ओतून आपली कला जगाला अर्पण केली. पण जगाने त्याच्या बदल्यात त्याला काहीही दिलं नाही. कधी कधी त्याने हेतुपुरस्सर आर्थिक फायद्यासाठी काम केलंही असेल, पण अशा रीतीने मिळवलेला पैसा त्याने केवळ स्वत:साठी वापरला नाही, हेही तितकंच खरं आहे.’
जाता जाता एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. ‘द बॅटल सिंफनी’साठी मिळालेल्या पैशाचे बीथोवनने बॅंकेचे समभाग विकत घेतले होते. ते जवळपास सगळेच्या सगळे त्याने आपल्या पुतण्यासाठी लिहून ठेवले असल्याचं त्याच्या मृत्यूनंतर उघडकीस आलं.
The post जेव्हा बीथोवन ‘गल्लाभरू ’ होतो तेव्हा.. appeared first on Loksatta.