जें दिठीही न पविजे..डॉ. संतोष भास्कर क्षीरसागर

Advertisement

ज्येष्ठ चित्रकार व मराठीत विशेषत: अमूर्त चित्रकलेविषयी सैद्धांतिक लेखन करणारे प्रभाकर कोलते यांच्या लेखांचे संकलन असलेल्या अनुनाद प्रकाशनाच्या ‘दृक्चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन २७ फेब्रुवारीला होत आहे, त्यानिमित्ताने..

कोलते सरांच्या ७४ व्या वाढदिवशी, आम्ही सरांकडे जमलो असताना, सरांच्या लेखांचे एक पुस्तक करावे ही कल्पना रवींद्र जोशी या आमच्या मित्राने आमच्यासमोर मांडली. या कोविड काळातही अविरत काम करून आज माझ्या हातात ‘दृक्चिंतन’ या पुस्तकाची एक प्रत ठेवली. ती पाहून मला आनंद झाला आणि समाधान वाटले. चित्रकलेविषयीचे गंभीर आणि सखोल चिंतन असणारे हे पुस्तक चित्रकलेसह साहित्य विश्वातही निश्चितच मूल्यात्मक भर घालणारे आहे. अर्थातच ‘दृक्चिंतन’ हे पुस्तक केवळ चित्रकलेशी संबंधित असणाऱ्यांनाच नाही, तर कोणत्याही कलाक्षेत्रात काम करणारे कलावंत तसेच कला अभ्यासक आणि सुजाण वाचक यांना बहुआयामी चित्रभान देणारे ठरेल. आजही मराठी भाषेत अमूर्त चित्रकलेची सैद्धांतिक समीक्षा करणारी पुस्तके उपलब्ध नाहीत. अभिजात चित्रकलेपासून आपण दूर जात आहोत हेदेखील आपल्या लक्षातच येत नाही इतके आपण त्याबाबत उदासीन आहोत. या पार्श्वभूमीवर हे वास्तव बदलण्यासाठी काही ठोस उपाय करणे ही स्वत:ची नैतिक जबाबदारी मानून, गेली अनेक वर्षे प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते हे एखादा वसा घेतल्याप्रमाणे चित्रकलेविषयी नेमाने लिहीत आले आहेत. भारतीय व पाश्चात्त्य चित्रकार-शिल्पकार यांच्याविषयी तसेच स्वत:च्या चित्रनिर्मितीप्रक्रियेविषयी कोलते सरांनी अनेक अंकांमधून आणि वृत्तपत्रांतून वेळोवेळी लिहिलेल्या पन्नासहून अधिक लेखांचे संकलन करून रवींद्र जोशी यांनी ‘दृक्चिंतन’ हे पुस्तक संपादित केले आहे. लेखांची निवड आणि चित्रकलेच्या वर्तमानकालीन वास्तवाची झाडाझडती घेणारे ‘पार्श्वभूमी’ हे संपादकीय या पुस्तकाचे वैचारिक गांभीर्यच अधोरेखित करते. सारंग कुळकर्णी यांनी या विषयाला साजेसे केलेले ‘शीर्षक’ (शब्दचिन्ह), पुस्तकाची मांडणी-संकल्पना, तसेच दृक् जाणिवांच्या समृद्धीसाठी केलेले दृष्यानुभावाचे प्रयोग या पुस्तकाचे निराळेपण सूचित करतात. ‘अनुनाद प्रकाशन’चे  कुंदन रुईकर यांनी हे वेगळेपण समजून-उमजून पुस्तकाची देखणी निर्मिती केली आहे.

Advertisement

प्रतिभावान नाटककार महेश एलकुंचवार यांनी सरांच्या प्रतिभेची नोंद घेणारा लेख खास या पुस्तकासाठी लिहिला आहे, जो वाचकांना या पुस्तकाचे बहुमूल्यत्व दाखवून देईल.   मायाजालावर सहज उपलब्ध असणारी चित्रे ‘साभार’ न घेता त्या- त्या चित्रकारांच्या, त्यांच्या वारसदारांच्या तसेच संग्रहालयांच्या कायदेशीर परवानग्या घेऊनच प्रकाशित केली आहेत. कलाकारांच्या हक्काबाबतचं ठेवलेलं हे भान  खचितच महत्त्वाचं आहे. चित्रकारांविषयी लिहिलेल्या या सर्व लेखात कोलते या चित्रकारांकडे एक माणूस म्हणून  आत्मीयतेने  पाहतात. या सगळय़ा चित्रकारांचे जगणे, त्यांनी वेळोवेळी जपलेली किंवा धुडकावून लावलेली मूल्ये, त्यांच्या धारणा, त्यांनी निवडलेले मार्ग आणि त्याचे भोगलेले परिणाम, त्यांचा अविरत सुरू असलेला जीवनऊर्जेचा शोध, त्या ऊर्जेची चित्रातील अभिव्यक्ती आणि त्यांचे चित्रभान, या साऱ्याविषयी लिहिताना कोलते सर त्या-त्या चित्रकारांच्या जगण्याशी एकरूप होऊन, समरसून लिहितात आणि तेही इतक्या सहजतेने की, प्रत्येक चित्रकाराचे जगणे जणू कोलते सर स्वत: जगले असावेत असे वाटते.

मात्र या चित्रकारांच्या चित्राविषयी लिहिताना सर वस्तुनिष्ठपणे केवळ चित्रातील घटकांच्या आधारे चित्राची समीक्षा करतात. चित्राविषयी, त्याच्या रूपाविषयी नेमक्या शब्दात त्यांचा विचार मांडतात आणि नंतर चित्र आणि चित्रकाराचा जीवनानुभव यांच्यातील सहसंबंधाच्या शक्यतेचे सूतोवाच करतात. कोलते स्वत: चित्रकार असल्यामुळे अवकाश, आकार, रंग, रेषा, ताल, तोल आणि पोत आदी घटकांच्या आधारे ते चित्रातील सौंदर्य नेमकेपणाने दाखवून चित्र पाहण्याची एक दृष्टी या समीक्षेतून आपल्याला देतात. ‘चित्राला अर्थ नसतो, चित्राला रूप असतं,’ असे चित्र समजून घेण्यासाठीचे अनेक मूलमंत्र कोलते जाणीवपूर्वक देऊन जातात. चित्राचे ‘ते’ रूप उलगडून दाखवताना त्यातील अमूर्ततेची उकल देखील ते सहजपणे करू शकतात. जें दिठीही न पविजे। तें दिठीविण देखिजे। जरी अतींद्रिय लाहिजे। ज्ञानबळ।। (ज्ञानेश्वरी अध्याय ६/३३.)

Advertisement

 माझ्या मते, कोलते त्यांच्या अितद्रिय ज्ञानबळाच्या आधारे जे आपल्या सामान्य दृष्टीला दिसत नाही, ते डोळ्यांशिवाय कसे पाहावे याचा ‘डोळोसा’ या लेखांमधून घेतात आणि अनभिज्ञ चित्रभाषेशी आपली सोयरिक करतात. अरुपाचे रूप पाहण्याची ताकद सरांच्या दृष्टीत आहे आणि जे दिसले-अनुभवले आहे ते शब्दातून थेट मांडून दाखवण्याचे प्रातिभही त्यांच्या ठायी आहे.  मॉदिलियानीच्या चित्रांबाबत सांगताना सर लिहितात, ‘‘त्याच्या अधिकांश व्यक्तीचित्रणातील डोळे त्यातल्या बुबुळांविना नग्नच वाटतात. जणू चंद्रिबबाविना रिक्त अवकाशाचे तुकडेच.’’  अशासारख्या कितीतरी प्रतिमा सर योजतात तेव्हा सरांचे साहित्यिक भान सिद्ध होते. साध्या भाषेत थेट अभिव्यक्ती हा सरांच्या लेखनाचा बाज आहे. त्यांनी योजलेल्या प्रतिमा अतिशय दृष्यात्मक आणि अर्थपूर्ण आहेत.

गुणावत, डोळोसा घेत, गुंतवते झाले, चैत्रिक भान, रंगराशी अशा अनेक अर्थपूर्ण नवनवीन शब्दनिर्मितीची त्यांची प्रतिभा विलक्षण आहे.  ‘विशुद्ध कलेचा स्वामी’, ‘आकाशाला आधार देणारा शिल्पात्मा’, ‘अमूर्तानुभवाचा आद्य चित्रकार’, ‘अकल्पिताचा स्वामी’, अशा अनेक लेखांच्या केवळ शीर्षकांमधून त्या- त्या कलावंताच्या कलेचे मर्म, त्याचे कलाविश्वातील स्थान किंवा योगदानच सरांनी सहजपणे अधोरेखित केले आहे. ‘रिक्त असणे म्हणजे कोणत्याही क्षणी काहीही करण्याचे सकल संपूर्ण भान असणे.’ किंवा ‘पाण्यातल्या माशाला श्वास कसा घ्यावा याची जन्मत:च उमज असते तशी ही प्रतिभा कलावंताकडे उपजतच असावी लागते.’ अशी त्यांच्या लेखांतील काही वाक्ये आपल्याला अंतर्दृष्टी देतात. ‘माझा चित्रविषयक दृष्य-विचार सातत्याने सुरूच असतो. परंतु चित्र निर्मितीचा विचार मात्र मी चित्रातूनच करतो, चित्र रंगवतानाच करतो.’ यांसारखे सरांचे स्वत:ची चित्रनिर्मितीची प्रक्रिया सुस्पष्टपणे सांगणारे विचार अमूर्त चित्रकलेविषयीच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारे आहेतच; त्याशिवाय चित्रकलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभिजात चित्रकलेचे दृष्यभान जागे करणारे आहेत.

Advertisement

संगीत- नृत्य-नाटय़-साहित्य-चित्र-शिल्प-चित्रपट आदी कला एकमेकांशी आंतरिक संबंध राखून असतात, हे भान आपल्याला अजूनही पुरेसे आलेले नाही आणि ही परिस्थिती खेदजनक आहे. आपापल्या कलांचे छोटेछोटे स्वतंत्र कप्पे करून, निर्मिलेल्या साचेबद्ध कलाकृतीला सर्वश्रेष्ठ समजून, समाधानी असण्याच्या वृत्तीने आपले फार मोठे नुकसानच होते. दृष्यकलेतील एखादेच अक्षरऋषी र. कृ. जोशी एखादी कविता दृष्य स्वरूपात कशी छापली जावी याचा प्रत्यक्ष अनुभव देऊ पाहतात, पण खुल्या वृत्तीच्या अभावामुळे समाज तसा अनुभव घेऊच शकत नाही ही आपली ऐपत. दृक्कलेच्या विद्यार्थ्यांच्या आणि कलासक्त प्रेक्षकांच्या दृक् जाणिवांची समृद्धी व्हावी यासाठी कोलते यांनी दिलेले हे एक ‘सर्जन देणे’ आहे. या पुस्तकाचा योग्य उपयोग करून घेऊन आपण आपली ‘ऐपत’ वाढवली नाही तर आपणच करंटे ठरू. कारण ‘ऐपत’ वाढली तरच ‘पत’ वाढते, नपेक्षा..

The post जें दिठीही न पविजे.. appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement