अमरावती3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मोर्शी येथून जवळच असलेल्या दापोरी जामठी शेत शिवारातील जुगार अड्ड्यावर अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली. या धाडसत्रात सहा जुगाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून 6 लाख 52 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान अमरावतीच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना मोर्शी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिसांच्या मते जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालात 1 लाख 98 हजार 200 रुपयांची रोख आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा जुगार पकडण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून प्रत्यक्षात दिवसभरात तेथे किती रुपयांची उलाढाल होत असेल, याबाबत वेगवेगळे कयास लावले जात आहेत.
सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दिवसांपासून मोर्शी पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोहन प्रकाश निपाने नामक युवकाने दापोरी नजीकच्या जामठी शेत शिवारात जुगार अड्डा थाटला होता. मोहन निपाने याने काही जुगाऱ्यांना एकत्रित करून मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या सालबर्डी ते डोंगर यावली दरम्यानच्या शिवारात हा अवैध धंदा सुरु केला होता. दापोरी येथील नितीन विघे यांच्या शेतात बावन पत्त्याचा जुगाराचा खेळ सुरू असल्याची गुप्त माहिती सोमवारी अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्यानंतर त्यांनी धाड टाकून सहा आरोपींना घटनास्थळावरून अटक केली. कारवाईवेळी एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रखबिर दारासिंग टाक (वय 33 वर्ष, रा तळेगाव, ता आष्टी, जि. वर्धा) अजहरोद्दीन सलीमोददीन (वय 37, वर्ष, रा ब्राम्हणवाडा थडी, ता. चांदुर बाजार) पंकज दादाराव भोरखडे (वय 40 वर्ष, रा डोंगर यावली, ता. मोर्शी), नुरअली शमसेर अली (वय 44 वर्ष, रा. धरम काट्याचे जवळ अमरावती), विजय दिलीप मोरे (वय 32 वर्ष, रा. साई कॉलनी मोर्शी), संदीप सुरेश जहकर (वय ३१ वर्ष, रा रामजीबाबा नगर मोर्शी), मोहन प्रकाश निपाने (रा. मोर्शी, फरार जुगार चालक) यांच्या ताब्यातून रोख रक्कम एक लाख 98 हजार 200 रुपये, 7 मोटरसायकली व 6 मोबाईल संच आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 6 लाख 52 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशीकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी
मोर्शी डॉ. निलेश पांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नितीन चुलपार, सहायक फौजदार संतोष मुंदाने, हवालदार बळवंत दाभणे व रवींद्र बावणे, शिपाई दिनेश कनोजीया व पंकज फाटे, चालक हर्षद घुसे यांनी केली.