मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
भाजपा पुरस्कृत गुंडांनी अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून केला आहे. तसेच हल्लेखोरांवर कारवाईची मागणीही केली आहे.
मात्र, आरोपींवर तेव्हाच कारवाई केली म्हणत आशिष शेलार आणि चित्रा वाघ यांनी ट्विट करत राऊतांना उत्तर दिले आहे.
राऊतांचे टविट काय?
खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देवेंद्रजी… हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? 5 मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत. असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.
आशिष शेलारांचे प्रत्युत्तर
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करून राऊत यांना उत्तर दिले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, प्रिय संजूभाऊ 6 मार्च रोजी झालेल्या या घटनेतील दोन्ही आरोपींना अवघ्या 12 तासांत अटक करण्यात आली. याशिवाय, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन अधिकारी आणि दोन हेडकॉन्स्टेबल यांना 8 मार्च रोजीच निलंबित करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच, बार्शी पोलिसांनी सदर युवतीला वैद्यकीय मदत मिळवून दिली. तिला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आता तिच्या प्रकृतीत बर्यापैकी सुधारणा झाली आहे. हे भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आहे, आरोपींचा बचाव करणारे महाविकास आघाडीचे नाही, असा टोलाही लगावला आहे.
नेमके प्रकरण काय?
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत 5 मार्च रोजी रात्री बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला होता. तिने अत्याचार केल्याची तक्रार दाखल करताच तिच्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात ती गंभीर जखमी झाली, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा विधान परिषदेतही उल्लेख झाला होता. यानंतर मात्र, तरुणीच्या कुटुंबियांनी दोषींना फाशी द्या, अन्यथा आम्हालाच इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे.
4 पोलिस निलंबित
दरम्यान या प्रकरणाचा ठपका ठेवत सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे यांनी चौघांना निलंबित केले आहे. यात एपीआय महारुद्र परजणे, बार्शी तालुक्यातील पीएसआय राजेंद्र मंगरुळे, डब्ल्यूपीएसआय सारिका बजरंग गुटकुल, बार्शी शहरचे अरुण हेड कॉन्स्टेबल भगवान माळी यांचा समावेश आहे.
चित्रा वाघ यांची टीका
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. त्या म्हणाल्या की, ओ सर्वज्ञानी…खोटी माहीती देत का जनतेची दिशाभूल करताय…? सगळ्या पुड्या संपल्या का तुमच्या आता महिलांवर आलात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
चित्रा वाघ पुढे बोलताना म्हणाल्या की, या प्रकरणात दोन्ही आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करत अटक झाली आता ही आरोपी जेलमध्ये आहेत ही वस्तुस्थिती असतांना का तुम्ही खोटी माहिती देत आहात. आरोपी भाजप पुरस्कृत म्हणता, अहो आरोपी भाजपचे काय पण कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही.103 दिवसांसाठी आत काय गेलात मती गुंग झाली तुमची…
पीडितांना जाती जातीत वाटणारे तुम्ही कोण ….?
चित्रा वाघ पुढे बोलताना म्हणाल्या की, आमच्यासाठी पीडिता ही फक्त मुलगी असते व या घटनेतील मुलगी सुरक्षित आहे तिची तब्येतही स्थिर आहे. सगळ्यात महत्वाचे तुम्ही पीडितेचा फोटो कसा काय viral केलात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे महिला आयोगाने त्यांना अजून नोटीस का पाठवली नाही, असा सवालही त्यांनी महिला आयोगाला विचारला आहे. आता कायदे शिकवणारे कुठे गेल असा टोला त्यांनी रुपाली चाकणकर यांना लगावला आहे.