अमरावतीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
अमरावती महिलांनी एकत्र येऊन केलेल्या आंदोलनानंतर नजिकच्या रहाटगाव येथील देशी दारु दुकान महिनाभर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गुरुवारी दुपारी दिले. या आंदोलनामुळे जिल्हा कचेरीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होताय भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
गावच्या मध्यभागी असलेल्या या देशी दारु दुकानांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. किमान यापुढे तरी समाजाची हानी होऊ देऊ नका, असा आर्त स्वर जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना महिलांनी ऐकवला. काहींनी आपली आपबीती कथन करीत कुटुंबांची कशी हानी झाली, हेही सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करुन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सदर देशी दारु दुकान महिनाभर बंद ठेवण्याचे आदेश दिले