मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. ठाण्यात राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे. नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाला लागलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदेचे मोठे छायाचित्र असल्याने ठाण्यात चर्चांना उधाण आले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका ऐन तोंडावर आलेल्या असताना आता शिंदे गटाच्या गळाला राष्ट्रवादीचा नेता लागल्याची शक्यता आहे. याबाबत मोठ्या चर्चा सध्या ठाण्यात रंगल्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे. राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर्स. या बॅनर्सवरील काही गोष्टी पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहेत.
आणखी पदाधिकारी गळाला लागणार
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यावरही त्यांनी पकड मजबुत करायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नजीब मुल्लाच नव्हे तर मुंब्रा परिसरातील आणखी काही नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
बॅनरवर काय?
ठाणे शहरात लागलेल्या काही बॅनरवर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची छायाचित्रे आहेत तर काही बॅनरवर अजित पवार यांचा मोठा बॅनर आहे. मुंब्र्यात लागलेल्या बॅनरवर मात्र शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका गंभीर प्रकरणात पालकमंत्री असताना एकनाथ शिंदेनी नजीब मुल्ला यांना मदत केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. या मदतीची परतफेड करण्यासाठी ते शिंदे गटात जातील. अशा चर्चा रंगल्या आहेत.
राष्ट्रवादीला नुकसान
नजीब मुल्ला राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिंदे गटात गेल्यास राष्ट्रवादीला मोठे नुकसान होणार आहे. नजीब मुल्ला शिंदे गटात आल्यास मुंब्र्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला खिंडार पाडण्यास शिंदे गट यशस्वी होईल.