जिंदगी का क्या भरोसा..प्रभाकर बोकील

Advertisement

वर्तमानपत्रातला आनंद वर्माच्या श्रद्धांजलीचा फोटो, त्याची पीळदार मिशी नसल्यामुळे प्रथम ओळखू आला नाही. वर्षभरापूर्वी कुसुमभाभींचा श्रद्धांजलीचा फोटो पाहून असंच मन चरकलं होतं. तेव्हा आनंदला भेटायला गेलो होतो.. आता जस्मीनला भेटायला निघालो..

पुण्यात वाढलेला, शिकलेला उद्योजक आनंद वर्मा. चाळीस वर्षांपूर्वी त्याचा बंगला डिझाइन करण्यापासून बांधकाम पूर्ण होईपर्यंत, मी मुंबईहून रोज पुण्याला जायचो. त्या दरम्यान बाहेर न जेवण्याची कुसुमभाभींची ताकीद असायची. त्यांच्या हातचं रुचकर जेवण त्यांच्या जुन्या घरीच व्हायचं. भरपूर गप्पा व्हायच्या. कुठल्याही विषयावर. देवआनंदचा ‘पंखा’ असल्यामुळे आनंदनं ‘हम दोनो’ कित्येकदा पाहिला, देवआनंदच्या ‘डबलरोल’साठी. कॅप्टन आनंद आणि मेजर वर्मा! चित्रपटातल्या मेजर वर्मासारखी पीळदार मिशी आनंदनं तेव्हापासून प्रयत्नपूर्वक जोपासलेली. म्हणून मी त्याला ‘मेजर वर्मा’ म्हणू लागलो. आनंद उंचापुरा अन् कुसुमभाभी तशा ठेंगण्याठुसक्या. त्या इंदूरच्या असल्यामुळे संवाद मराठी-हिंदीत व्हायचा. ‘‘इन्हें आप मेजर कहते हैं, मैं तो वैसे भी ‘मायनर वर्मा’ हूँ भाईसाब!’’ असं म्हणत कुसुमभाभी स्वत:च्या ठेंगणेपणावर खळखळून हसल्या होत्या.

Advertisement

‘‘लेकिन असली ‘मायनर वर्मा’का आगमन तो अब होनेवाला हैं!’’ लग्नानंतर बारा वर्षांनी पहिलं बाळ होणार असल्याची बातमी आनंदनं मिश्कील हसत दिल्यावर कुसुमभाभी लोभस लाजल्या होत्या. बंगल्याचं नाव ठेवलं ‘साक्षी’. तिथे राहायला गेल्यावर त्यांना गोड मुलगी झाली. नाव ठेवलं ‘जस्मीन’, पण कुसुमभाभी तिला म्हणत ‘तितली’. फुलासारखी नाजूक, पण फुलपाखरासारखी अस्थिर. ‘‘अख्खा दिन घरमें इधरउधर घुमती रहती हैं.. एक दिन ये घर पराया होकर अपने घर उड जाएगी!’’ त्या म्हणत.

बंगला झाल्यावर लगेच नगर रस्त्यावर आनंदच्या फॅक्टरीचं बांधकाम सुरू झालं. बांधताना काही तांत्रिक मुद्दय़ावर आम्हा दोघांत गैरसमज होऊन आमचे संबंध विस्कटले, दुरावले, ते दोन वर्षांपूर्वी कुसुमभाभींनी फोन करेपर्यंत.

Advertisement

‘‘भाईसाब, मैं कुसुमभाभी बोल रही हूँ.. पहचाना?’’

तो आवाज ऐकल्यावरच ती मधली पस्तीस-छत्तीस वर्ष विरघळून गेली.

Advertisement

‘‘देखो भाईसाब, मेजरसाबकी पचहत्तरवी सालगिरह हम रिश्तेदार-दोस्तोंके साथ मना रहे हैं. छोटासा फंक्शन रखा हैं, तुमच्या ‘साक्षी’ बंगल्यातच. मी मुद्दाम तुमचा नंबर मिळवून फोन केलाय. जरूर यायला पाहिजे भाभींना घेऊन. जस्मीनभी आ रही हैं बंगळूरुसे. कितने सालोंमे आप मिले नही. आपके ‘साक्षी’में खाना नही खाया, याद हैं? कबतक गलतफहमीसे दूर रहेंगे हमसे? अब जिंदगीका क्या भरोसा भाईसाब?’’ असं म्हणत पूर्वीसारख्याच मनसोक्त गप्पा मारत खळखळून हसल्या.

‘अब जिंदगीका क्या भरोसा?’ या कुसुमभाभींच्या प्रश्नातच उत्तर होतं. गेलंच पाहिजे.. मी ठरवलं खरं, पण मनात असूनही काही महत्त्वाच्या कारणामुळे माझं त्या समारंभाला पुण्याला जाणं झालंच नाही. रुखरुख लागून राहिली..  ती जास्तच लागली, कारण नंतर त्यांच्या निधनाचीच बातमी आली. आता तर जायलाच हवं म्हणून निघालो. कुसुमभाभी ‘नसताना’ आनंदच्या सांत्वनासाठी ‘साक्षी’त पोहोचलो तेव्हा ‘सांत्वन-बैठक’ संपत आलेली होती. समोरच्या टेबलावर गुलाबांचा हार घातलेली कुसुमभाभींची हसतमुख तसबीर. त्यांचं हसणं विसरणं अशक्यच. तसबिरीला नमस्कार केला. बाजूलाच खुर्चीवर बसलेला.. हा आनंद? निस्तेज, सुरकुतलेला चेहेरा, डोक्यावर विरळ, पांढरे झालेले केस. कानाला श्रवणयंत्र. मात्र पांढऱ्याशुभ्र झाल्या तरी पूर्वीचा ‘पीळ’ टिकवून असलेल्या मिशांमुळे ओळखलं! बाजूला बसलेल्या वयस्क माणसाशी आनंद बोलत होता. दुसऱ्या बाजूला बसत आनंदला नमस्कार केला. त्यानेही नमस्कार केला. चेहऱ्यावर अनोळखी भाव. मनातली जुनी अढी अजून आहे, की खरंच ओळखलं नसेल त्यानं मला? काळानुरूप आपल्यातही होणारे बदल आपल्याला जाणवत नसतात. नसेल ओळखलं कदाचित. जस्मीन असली इथं, तरी इतक्या वर्षांनी तिला कसं ओळखणार? तितक्यात पलीकडच्या खोलीतून एक तरुणी एका वयोवृद्ध स्त्रीला निरोप द्यायला बाहेर दरवाजापर्यंत आली. मी बघतच राहिलो.. थेट कुसुमभाभी! ही कुसुमभाभींची ‘तितली’?

Advertisement

‘‘माफ करा, मी आपल्याला नाही ओळखलं.’’

आनंदच्या प्रश्नानं मी भानावर आलो. ओळख सांगितल्यावर, आनंद हबकलाच. दोन्ही हात हातात घेत म्हणाला, ‘‘माय गुडनेस.. मी नाही ओळखू शकलो. आय अ‍ॅम एक्स्ट्रीमली सॉरी!’’

Advertisement

‘‘इट्स ओके! पण हे अचानक कसं झालं? वर्षभरापूर्वी तुझी पंचाहत्तरी होती तेव्हा फोनवर बोलल्या होत्या कुसुमाभाभी..’’

‘‘काय सांगू.. कसला रोग नाही, हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं नाही.. रात्री झोपेतच गेली. मी जवळच गाढ झोपलेला. ती ओरडली असेल, मदत मागितली असेल, पण कानाला यंत्र नव्हतं ना! डॉक्टर सकाळी म्हणाले, की रात्री तीन ते चारच्या दरम्यान हार्ट अ‍ॅटॅक येऊन ती गेली. मला पत्ताच नाही! पन्नास वर्ष तिनं माझी काळजी घेतली. माझी ‘बायपास’ झाली तेव्हा पहाडासारखी माझ्यामागे उभी राहिली. अन् स्वत: अशी न सांगताच एकटी निघून गेली!’’ आनंद आवंढा गिळत स्तब्ध झाला.

Advertisement

‘‘जस्मीन कुठाय?’’

‘‘अरे, आत्ता बाहेर आली होती त्या बाईजींना सोडायला.. तीच!’’

Advertisement

‘‘वाटलंच मला.. किती भाभींसारखी दिसतेय! कळल्यावर धावत आली असेल.’’

‘‘येणार कुठून? ती इथेच असते. आता हेच तिचं घर. लग्न होऊन ‘तितली’ उडून गेली तिच्या घरी. सगळं सुरळीत चालू असताना सहा महिन्यांपूर्वी जावई अन् त्याचे आई-वडील कार अपघातामध्ये गेले. तेव्हापासून जस्मीन आणि तिचा मुलगा ईशान इथंच असतात. खरं सांगू, तेव्हा कुसुमजी आतून मोडली, ती परत कधी उभीच राहिली नाही. तिचा परतीचा प्रवास खरा तिथेच सुरू झाला.’’ आनंदला बोलवेना. तो हुमसत राहिला. मी त्याच्या हातावर थोपटत राहिलो. शांत झाल्यावर आनंदनं बाजूच्या गृहस्थांशी ओळख करून दिली, ‘‘हा माझा पहिलीपासूनचा शाळेतला, कॉलेजमधला सख्खा मित्र, किशोर सारडा. सत्तर वर्षांची आमची दोस्ती!’’

Advertisement

‘‘आम्ही हक्कानं भांडतो, चुकलं की झापतो, टिंगलटवाळी करतो. आमची दोस्ती टिकली, कारण आनंद नेहमी फक्त दुसऱ्यांना ऑर्डर सोडणार, इतरांनी याचं ऐकायचं! याला आता तेच सांगतोय, निदान आता तरी दुसऱ्याचं ऐकायला शिक. भाभींनी याला सांभाळलं पन्नास वर्ष. आता या प्राण्याला कोण सांभाळणार? याचा इगो, स्वभावाचा पीळ अजून टिकून आहे. याच्या मिशीसारखा!’’ सारडा वातावरण जरा हलकं करत हसत म्हणाले.

आनंद मनमोकळं हसला अन् उठत म्हणाला, ‘‘हां.. बस्स झालं. निघ आता.. तुला नगरला जायचंय. उशीर होईल.’’

Advertisement

‘‘उठू नकोस. मी नक्की जातो..’’ हसत म्हणत सारडा बाहेर पडले.

‘‘खरंच किती इगो जपतो नाही का आपण! फुटकळ कारणांनी, उगाच तत्त्वाचा बाऊ करत एकमेकांना किती सहज दुखवत असतो, दुरावत असतो. चाळीस वर्ष या घरात वावरताना, कितीदा तुझी आठवण आली. कुसुम नेहमी म्हणायची, ‘पैसाअडका काही नाही जपलं तरी चालेल, आपली माणसं जप आनंद..’ खरंच, तेवढं जमलं पाहिजे. संध्याछाया दिसतात तेव्हा हे कळायला लागतं. उशीर झाला तरी जाण्यापूर्वी या गाठी सोडवल्या पाहिजेत.’’

Advertisement

‘‘तुझ्या पंचाहत्तरीला नाही येऊ शकलो. अन् भेटण्यासाठी हा प्रसंग आला.’’ मी म्हणालो.

‘‘पण भेटलास.. बरं वाटलं. थोडी उमेद येते रे जगण्याची.’’

Advertisement

‘‘खरं आहे. बरं, निघू आता? आता कुसुमभाभी नसताना सांभाळायचं स्वत:ला. जमेल ना?’’

‘‘जमलंच पाहिजे. जस्मीनसाठी.. चल, मी येतो गेटपर्यंत. एका जागी बसून पाय आखडलेत.’’

Advertisement

दाराजवळ जाताना त्यानं बाहेर आलेल्या जस्मीनशी माझी ओळख करून दिल्यावर ती म्हणाली, ‘‘ममा हमेशा आपकी तारीफ करती थी. अब तो आप इन्हे मिलने आओगे ना? वैसे भी जिंदगीका क्या भरोसा..’’

गेटपाशी थांबत आनंद म्हणाला, ‘‘परिस्थितीनं अकाली प्रौढ झालीय. बोलते तेव्हा कुसुमची आठवण येते. कुसुमनंच ठेवलं घराचं नाव. ‘साक्षी’. तेव्हा भविष्य कुठं माहिती असतं? या घराची स्वप्नं रंगवणारी कुसुम आज निघून गेलीय. अन् इथं जन्मलेली जस्मीन, हे घर सोडून उडून गेलेली ‘तितली’ पुन्हा इथं मुक्कामाला आलीय ही अशी. ‘कभी खुद पें, कभी हालातपे, रोना आया.. बात निकली तो, हर इक बातपे रोना आया..’’ अश्रू लपवायला आनंदनं मान फिरवली.

Advertisement

‘‘ही कॅप्टन आनंदची व्यथा. युद्धात एक पाय गमावलेला मेजर वर्मा स्वत:ला कसं समजावतो आठवतंय ना?’’

पटकन माझ्याकडे वळून पाहात, स्वत:ला सावरत आनंद म्हणाला, ‘‘एक टांग तो हैं!’’

Advertisement

‘दॅट्स लाईक अ गुड बॉय!’’ म्हणत मी निरोप घेतला.

नंतर एका भेटीत आनंद म्हणाला होता, ‘‘जस्मीन आता ईशानबरोबर माझीही आई झालीय!’’

Advertisement

आज जस्मीनचं सांत्वन मी कुठल्या शब्दांत करणार होतो[email protected]

The post जिंदगी का क्या भरोसा.. appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement