पुणे38 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
लोकसभा निवडणुकीला एक वर्ष उरलेले असताना जागावाटपावरून आताच दावे-प्रतिदावे केले जात आहे. अशात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. आज पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक असल्याचे आम्ही वेगवेगळ्या निवडणुकीत दाखवून दिले आहे. त्यामुळे विधानसभा, महापालिका निवडणुकीत कोणाला, कुठे, किती मते मिळाली आहेत याबाबतचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल.
पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये लाकडाचे सामान असलेल्या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अजित पवार यांनी शनिवारी दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच, नुकसानीचा आढावा घेतला. आग विझवण्यासाठी योगदान दिलेल्या अग्निशमन, पोलिस, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे त्यांनी कौतुक केले व आभार मानले.
नंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लोकसभेचा कालावधी एक वर्ष राहिला असल्याने पोटनिवडणूक होणार नाही, असे वाटत होते. मात्र, आतील गोट्यातून मिळालेल्या माहितीनुसार बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जागावाटपाबाबत अद्याप चर्चा बाकी
अजित पवार म्हणाले, राज्यात सध्या काही जण दर्जाहीन वक्तव्य करत आहे, याबाबत सर्वच पक्षांनी विचार करण्याची गरज आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सहा जागांवर लोकसभेला उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशाप्रकारे त्यांना त्यांच्या पक्षाचे मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, त्याप्रमाणे इतरही काही पक्षातून कोण म्हणते 22 जागा लढणार, 23 ठिकाणी उमेदवार उभे करणार, त्यामुळे कोण काय म्हणते त्यांना बोलू दे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकत्रित बसून चर्चा करतील. त्यानंतरच जागावाटप जाहीर करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक असल्याचे आम्ही वेगवेगळ्या निवडणुकीत दाखवून दिलेले आहे. त्यामुळे मनपाच्या निवडणुकीत, आमदारकीच्या निवडणुकीत कोणाला कुठे किती मते मिळाली आहेत, याबाबतचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल. रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या तीन वर्षाच्या नियुक्ती 9 मे रोजी झालेल्या आहेत. आता संस्थेच्या विभागवार पदाधिकारी नियुक्त केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आगीची नुकसान भरपाई द्या!
पुण्यातील टिंबर मार्केट येथे भीषण आगीची घटना घडून कोट्यावधी रुपयांचे अनेकांचे नुकसान झालेले आहे. यामध्ये घातपाताची कोणती घटना असेल तर त्याची चौकशी केली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना सरकारकडून मदत दिली पाहिजे, असे मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केले.