‘’जागर : मलाबार युद्धसराव आणि चीन!कृष्ण कौशिक – [email protected]
भारतीय उपखंडात विशेष महत्त्व असलेल्या मलाबार नौदल युद्ध सरावाचा पहिला टप्पा २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान पॅसिफिक महासागरातील ग्वाम बेटाच्या किनारी भागात पार पडला. भारताबरोबरच अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड गटातील चारही देशांनी मलाबार नौदल युद्धसरावामध्ये भाग घेतल्यामुळे हा थेट चीनला सूचक इशारा आहे. यंदा या सरावाचं २५वं वर्ष आहे. या युद्धसरावाचं नेमकं महत्त्व काय आहे, भारतासाठी हा नौदल युद्धसराव का महत्त्वाचा आहे आणि त्यातून चीनच्या विस्तारवादी भूमिकेला नेमका कसा शह बसणार आहे हे समजून घेणं आवश्यक आहे.

Advertisement

मलाबार युद्धसराव नेमका आहे काय?

सुरुवातीच्या काळात हा युद्धसराव फक्त द्विपक्षीय होता. यामध्ये भारत आणि अमेरिका ही दोनच राष्ट्रे सहभागी होत होती. मात्र आता तो चार देशांच्या संयुक्त युद्ध कार्यक्षमतेचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरला आहे. भारताचे संयुक्त सेनादलप्रमुख जनरल बिपिन रावत यांनीच सांगितल्याप्रमाणे क्वाडचा मुख्य हेतू सर्व सहभागी राष्ट्रांसाठी आंतरराष्ट्रीय समुद्रामध्ये संचार करण्याचं स्वातंत्र्य निश्चित करणे, त्यासाठी प्रयत्न करणे हाच आहे.

Advertisement

मलाबार हा खऱ्या अर्थाने एक बहुपक्षीय नौदल युद्धसराव आहे. याची सुरुवात १९९२ मध्ये झाली. त्यानंतर १९९५ आणि १९९६ या दोन वर्षांत आणखी दोन वेळा भारत आणि अमेरिकी नौदलांकडून संयुक्तपणे मलाबार नौदल युद्धसराव करण्यात आला. पण त्यानंतर मात्र २००२ पर्यंत त्यात मोठा खंड पडला होता. याच काळात भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकाराने १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे अणुचाचणी घेतली होती. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताचं सामथ्र्य सिद्ध झालं असलं, तरी त्यातून अनेक देशांची नाराजीदेखील भारतानं ओढवून घेतली होती. त्यात अमेरिकेचादेखील समावेश होता.

हे ताणले गेलेले संबंध पुढे २००२च्या सुमारास काहीसे निवळले. त्यानंतर पुन्हा हे दोन्ही देश मलाबार नौदल युद्धसरावात सहभागी झाले. तेव्हापासून दरवर्षी हा युद्धसराव केला जातो. २००७ मध्ये पहिल्यांदा या सरावामध्ये भारत आणि अमेरिकेव्यतिरिक्त जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांनीदेखील भाग घेतला. गेल्या आठ वर्षांपासून म्हणजेच २०१४ सालापासून भारत, अमेरिका आणि जपान हे तीन देश दरवर्षी या युद्धसरावात सहभागी होत आहेत.

Advertisement

दोन टप्प्यांत युद्धसराव

गेल्या वर्षी हा युद्धसराव दोन टप्प्यांमध्ये पार पडला. त्यातला पहिला टप्पा बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमच्या समुद्रकिनारी घेण्यात आला. तर दुसरा टप्पा नोव्हेंबर महिन्यात अरबी समुद्रात पार पडला. त्याआधी २०१९ मध्ये जपानच्या समुद्रकिनारी हा सराव करण्यात आला होता. तर २०१८ मध्ये फिलिपिनच्या समुद्रामध्ये सराव करण्यात आला.

Advertisement

मलाबार युद्धसरावात प्रामुख्याने प्रत्यक्ष युद्धसदृश परिस्थितीतील वातावरण गृहीत धरून त्या अनुषंगाने निर्णय आणि त्यावर कृती यांचा सराव केला जातो. गेल्या वर्षी याच प्रकारातील ‘दुहेरी वाहक’ पद्धतीचा सराव करण्यात आला. त्यामध्ये भारताची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य आणि अमेरिकन नौदलाची निमित्झ ही युद्धनौका सहभागी झाली होती. या दोन प्रमुख युद्धनौकांबरोबरच दोन्ही देशांकडून इतर जहाजे, अजस्र पाणबुडय़ा आणि लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला होता.

गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीदेखील अनेक नौदल युद्धमोहिमांचा सराव झाला. पाण्याच्या पृष्ठभागावरून आणि पाण्यातील युद्धसदृश परिस्थितीतील सराव, जहाजांचा शोध आणि क्षेपणास्त्र डागण्याच्या प्रक्रियेचादेखील सराव चार देशांच्या नौदलांनी केला. यातून क्वाड गटातील या सर्व देशांच्या नौदलांमधील समन्वय आणि परस्पर सहकार्यातून वाढणारी कार्यक्षमता दिसून आली.

Advertisement

या वर्षी सरावात कोणत्या गोष्टींचा समावेश होता?

यंदाच्या मलाबार युद्धसरावामध्ये अनेक क्लिष्ट पण तितक्याच थरारक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. नौदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यामध्ये पृष्ठभागावर, हवेत आणि पाण्यात अशा तीनही पातळ्यांवर मारा करण्याच्या क्षमतांची चाचणी घेतली गेली. तसेच, युद्धसदृश परिस्थितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या कल्पक निर्णयांचीदेखील अंमलबजावणी केली गेली. अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या सरावांमधून चारही देशांच्या नौदलांमध्ये एखादी संयुक्त नौदल कारवाई करण्यासाठीचा समन्वय आणि परस्पर सामंजस्य वाढण्यास मदत होते. तसेच, क्वाडमधल्या चारही देशांमध्ये असलेली धोरणात्मक एकात्मता होण्यासदेखील मदत होते, अशी भूमिका भारतीय नौदलाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

Advertisement

चारही देशांच्या अजस्र् युद्धनौका!

यंदाच्या मलाबार नौदल युद्ध सरावामध्ये भारताकडून आयएनएस शिवालिक ही बहुउद्देशीय स्टेल्थ युद्धनौका, आयएनएस कदमत ही पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि पी८आय हे दीर्घ पल्ल्याची गस्तक्षमता असणारं विमान या युद्ध सरावामध्ये सहभागी झालं. अमरिकेकडून या सरावात यूएसएस बॅरी, यूएसएनएस रॅप्पाहॅनॉक, दी यूएसएनएस बिग हॉर्न आणि पी८ए हे गस्ती विमान सहभागी झाले. जेएस कागा, जेएस मुरासमी आणि जेएस शिरानुई या अजस्र युद्धनौका जपानकडून सहभागी झाल्या. त्यांच्यासोबत पी१ हे गस्ती विमान आणि एक पाणबुडीदेखील जपानी नौदलाच्या ताफ्यात होती. क्वाड गटातला चौथा देश असणाऱ्या ऑस्ट्रेलियन नौदलाकडून या सरावामध्ये एचएमएएस वारामुंगा ही युद्धनौका उतरवण्यात आली.

Advertisement

मलाबार नौदल युद्धसरावाचा विस्तार

प्रारंभी फक्त भारत आणि अमेरिका हे दोनच देश मलाबार नौदल युद्ध सरावामध्ये सहभागी होते. मात्र, २०१५मध्ये पहिल्यांदा जपान कायमस्वरूपी सदस्य म्हणून या सरावात सहभागी झाला. तेव्हा मलाबार सराव द्विसदस्यीयवरून त्रिसदस्यीय झाला. पण गेल्या वर्षीची घटना ही या सराव प्रक्रियेतला मैलाचा दगड ठरली! १० वर्षांत पहिल्यांदाच गतवर्षी क्वाड गटातले सर्वच्या सर्व देश या सरावात सहभागी झाले होते. २०२०च्या मलाबार युद्ध सरावामध्ये ऑस्ट्रेलियादेखील सहभागी झाला होता.

Advertisement

२००७ मध्येदेखील हा युद्ध सराव दोन टप्प्यांत घेण्यात आला होता. त्यातला पहिला टप्पा पश्चिम पॅसिफिक महासागरातील ओकिनावा बेटाजवळ पार पडला. तेव्हा पहिल्यांदाच भारतीय किनारपट्टीव्यतिरिक्त इतर ठिकाणी हा सराव झाला. याच वर्षी सप्टेंबरमध्ये सरावाचा दुसरा टप्पा विशाखापट्टणमजवळच्या समुद्रात पार पडला. या सरावात भारत आणि अमेरिका या दोन पूर्णवेळ सदस्यांसोबतच जपान, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या देशांचं नौदलदेखील सहभागी झालं होतं. मात्र, त्याच्या पुढच्याच वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये सत्तापालट झाला आणि या देशाने मलाबार युद्ध सरावामध्ये सहभागी होणं थांबवलं.

…आणि ऑस्ट्रेलियाचं नौदल पुन्हा सहभागी झालं!

Advertisement

२००८पासून ऑस्ट्रेलियन नौदलानं मलाबार युद्ध सरावामध्ये सहभागी होणं बंद केलं होतं. पण २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाचादेखील या सरावात समावेश झाला आणि जागतिक पातळीवर एक महत्त्वाचा संदेश दिला गेला. हा संदेश होता चीनला! जागतिक स्तरावर आपलं लष्करी सामथ्र्य सातत्याने वाढवणाऱ्या आणि विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या चीनला अशा प्रकारे एकत्रित नौदल सराव करून क्वाड गटातल्या चारही देशांनी सूचक इशाराच दिला. याआधीदेखील चीनच्या याच आक्रमक विस्ताराला आळा घालण्यासाठी भारताने मलाबार युद्ध सरावामध्ये इतर नव्या देशांना समाविष्ट करून घेण्यात रस दाखवला नव्हता. तसेच, ऑस्ट्रेलियानेदेखील इतर देशांसोबतच प्रामुख्याने चीनला प्रवेश नाकारण्याच्या याच कारणामुळे युद्ध सरावातून काढता पाय घेतल्याचंदेखील जाणकार सांगतात. पण, चीनचे क्वाडमधील चारही देशांशी असलेले संबंध ताणले गेल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियासह हे चारही देश या युद्ध सरावाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले. पूर्व लडाखमध्ये गेल्या १५ महिन्यांपासून आगळीक करणाऱ्या चीनला यातून एक ठाम संदेश देण्यात आला.

यासंदर्भात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलेली भूमिका पुरेशी बोलकी ठरावी. राजनाथ सिंह म्हणाले होते, ‘अमेरिकेचे गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री यांच्याशी झालेल्या द्विस्तरीय चर्चेमध्ये आम्ही इंडो-पॅसिफिक भागामधील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा केली. यामध्ये आम्ही शांतता, स्थैर्य आणि या भागातील सर्वच देशांसाठी समृद्धीविषयी आमची बांधिलकी व्यक्त केली. आमचे यावरदेखील एकमत झाले आहे की या भागामध्ये नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था, कायद्याचा आदर करणं, आंतरराष्ट्रीय समुद्रामध्ये मुक्त संचाराचं स्वातंत्र्य असणं आणि संबंधित देशांची अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राहणं नितांत आवश्यक आहे. आमचं सामरिक सहकार्य याच ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी बांधील आहे!’ भारताच्या याच भूमिकेविषयी स्पष्टीकरण देताना माजी रिअर अ‍ॅडमिरल सुदर्शन श्रीखंडे एकदा म्हणाले होते, की ‘क्वाडने इतर सर्व गोष्टींप्रमाणेच एका गोष्टीसाठी प्रयत्न करणं नितांत आवश्यक आहे. चीनला आवर घालण्यामध्ये क्वाड महत्त्वाची भूमिका निभावू शकते.’

Advertisement

क्वाड गटातील देशांशी भारताचे संबंध

मलाबारप्रमाणेच क्वाड गटातील इतर देशांबरोबर भारत इतरही अनेक प्रकारच्या लष्करी सरावांमध्ये सहभागी आहे. गेल्या वर्षी भारतीय नौदलाने अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाबरोबर लष्कराच्या समुद्री प्रवासासंदर्भातील काही सराव केले होते. चारही देशांच्या नौदलामध्ये सामरिक परिस्थितीतील सहकार्य वृद्धिंगत होण्यासाठी हे सराव केले जातात.

Advertisement

करोना आणि युद्ध सराव!

गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ जगभरात करोनाचं संकट थैमान घालत आहे. मात्र, क्वाडच्या युद्ध सरावांना करोनादेखील थांबवू शकला नाही. गेल्या वर्षी झालेल्या मलाबार नौदल युद्ध सरावाप्रमाणेच याही वर्षी करोनाचे सर्व नियम कठोरपणे पाळण्यात आल्याचं नौदलाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Advertisement

(अनुवाद – प्रवीण वडनेरे)

(द इंडियन एक्स्प्रेस)

Advertisement

The post ‘’जागर : मलाबार युद्धसराव आणि चीन! appeared first on Loksatta.Source link

Advertisement