अहमदनगर7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
उद्योगक्षेत्रांत महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा ठाकरे पिता-पुत्रांचा कट उद्योगक्षेत्रानेच उधळून लावल्याचे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. असा आरोप भाजपचे आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी गुरुवार (19 जानेवारीला) केला.
दावोस परिषदेच्या पहिल्याच सत्रात महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करून जागतिक उद्योगक्षेत्राने महाराष्ट्राला पसंतीची पावती दिली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास दाखविला आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रा.शिंदे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या वर्षी में महिन्यात झालेल्या परिषदेकडे तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली, तर आदित्य ठाकरे यांनी या परिषदेच्या निमित्ताने स्वित्झर्लंडची पिकनिक पार पाडली होती, असा टोलाही त्यांनी मारला.
महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा खोटा प्रचार करून उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रचाराची राळ उठवली व उद्योगविश्वात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मात्र, ठाकरे कुटुंबाचे आरोप धादांत खोटे व केवळ राजकीय वैफल्यातून होत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले. आता दावोस परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या प्रतिसादामुळे ठाकरे पितापुत्रांचा महाराष्ट्रास बदनाम करण्याचा कट उधळला गेला आहे.
गेल्या वर्षीच्या परिषदेत आदित्य ठाकरे यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या करारानुसार ते उद्योग राज्यात यावेत यासाठी ठाकरे सरकारने काहीच पाठपुरावा केला नाही, उलट याच काळात महाराष्ट्राची बदनामी करून उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा कट आखला, असा आरोप प्रा.राम शिंदे यांनी केला.
शिंदे-फडणवीस सरकारने जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राविषयीचा विश्वास पुन्हा निर्माण केला आहे. सवलतींची हमी, मंजुरीची वेगवान प्रक्रिया आणि दर्जेदार पायाभूत सुविधा तसेच उद्योगांसमोर अडथळे आणणाऱ्या प्रवृत्तींना वेसण घालण्याची हमी सरकारने दिल्यामुळेच राज्यात पुन्हा उद्योगस्नेही वातावरण तयार झाले आहे. ठाकरे सरकारच्या काळात उद्योगक्षेत्रास लागलेली घरघर आता थांबली असून, विकासाची वाटचाल नव्या दमाने सुरू झाली आहे.असे त्यांनी सांगितले.