जरा विसावू या वळणावर..


लंडनच्या चकचकीत रस्त्यावर टॅक्सी येऊन थांबली. दार उघडून मी आत बसत असतानाच एक उत्साही, मधाळ स्वर कानावर पडला.

Advertisement

ऊर्जिता कुलकर्णी

लंडनच्या चकचकीत रस्त्यावर टॅक्सी येऊन थांबली. दार उघडून मी आत बसत असतानाच एक उत्साही, मधाळ स्वर कानावर पडला. ‘‘गुड मॉर्निग! सच अ ग्रेट डे!’’ सत्तरीतले ड्रायव्हर आजोबा मनमोकळं हसत, माझ्याकडे पाहत बोलत होते. त्यांनी लगेच अदबीनं विचारलं, ‘‘आपण ज्या मार्गानं जातोय, त्या वाटेत पाच मिनिटं थांबलो तर चालेल का?’’ मी चालेल म्हटलं.  इष्टस्थळी पोहोचायला बराच वेळ लागणार होता. आजोबा तर मला आवडलेच होते. आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यातून कळलं की ते मूळचे इथलेच. बायको, चार मुलं यांचा संपन्न परिवार. आजोबांचं भेटवस्तूंचं मोठं दुकान होतं. एके दिवशी दुकानावर भरदिवसा दरोडा पडला.  डिसेंबर महिना, ख्रिसमसची तयारी सुरूहोती. त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब दुकानातच होतं. तेव्हा दोन कॉलेजवयीन मुलांनी दुकानात शिरताच अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात आजोबा सोडल्यास बाकीचे सगळे  कुटुंबीय मृत्युमुखी पडले. कॅमेऱ्यात त्या प्रसंगाची नोंद झाली होती, त्यानुसार तपासही सुरू झाला. मात्र आजोबांचं जग काही क्षणांत उद्ध्वस्त झालं होतं. एकाच दिवशी त्यांना संपूर्ण परिवाराला मूठमाती द्यावी लागली.

Advertisement

त्या घटनेनंतर कित्येक दिवस आजोबा सैरभैर झाले होते. तेव्हा त्यांनी काही समदु:खी गट, समुपदेशन यांची मदत घेतली. एकदा कर्क रोग झालेल्या मुलांना सदिच्छा भेट असा कार्यक्रम त्यांच्या गटानं ठरवला होता. आजोबाही तिथं गेले. मुलांसाठी काही खेळ, त्यांना चालेल असा केक, असं सगळं घेऊन. त्यांचं मन उदासच होतं, पण त्या एका दिवसानं त्यांचं पुढचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. वेगवेगळ्या प्रकारचे कर्क रोग असलेली ती मुलं होती. अगदी एकसारखी, निस्तेज दिसणारी. अनेकांचं डोकं पूर्ण तुळतुळीत. तरीही चेहरे हसरे, डोळ्यांत चमक आणि कमालीचा उत्साह! हे पाहून आजोबा विचारात पडले. त्या सगळ्या मुलांचे उपचार चालू असले तरी त्यांना काय झालंय हे त्यांना ठाऊक होतं. आजाराच्या वेदना ही लहानगी कशी सहन करत असतील? शिवाय यातून आपण वाचलोच नाही तर?, हा विचार येत नसेल का? असं सगळं त्यांच्या मनात येत असतानाच एक सात वर्षांची मुलगी त्यांच्या हाताला धरून, त्यांनी दिलेला खेळ खेळण्यासाठी त्यांना आग्रह करू लागली. आजोबा भारावल्यागत तिच्यासह खेळत राहिले आणि अनेक दिवसांनी मनापासून, खळखळून हसले. त्या सगळ्या मुलांचे निरोप घेतानाचे, आनंदी चेहरे त्यांच्या मनात ठसले ते कायमचेच. एक अनोखी ऊर्जा घेऊनच ते तिथून परतले. तेव्हा त्यांनी तो भयानक प्रसंग मागे टाकायचा निग्रह केला! कारण त्यांना दिसत राहिला, रुबिक क्यूब खेळणारा रॉन, ज्याला गणितात संशोधन करायचं होतं.  झाडांची मनापासून काळजी घेणारी, झाडांशी रोज बोलणारी तीन-चार मुलं, गोड आवाजात विनोद सांगणारी स्टेला, तिला मोठी होऊन ‘स्टॅन्ड-अप’ करायचं होतं, असे कितीतरी. आपल्याला असणारा आजार गंभीर आहे, कदाचित जीवघेणा आहे, हे माहीत असलं तरीही त्याला हरवण्यासाठी, ती सगळी मुलं सज्ज होती. केवळ इच्छाशक्तीच्या बळावर. आपण मात्र रडतखडत जगतोय त्याबद्दल आजोबांना प्रचंड शरम वाटली, स्वत:ची चीडही आली. इथून त्यांचा नवीन प्रवास सुरू झाला. दुकान तर बंदच झालं होतं. राहतं घर पुन्हा जिवंत करण्याच्या मागे ते लागले. शेजारीपाजारी जाऊन लोकांना भेटू लागले. त्यांना आवश्यक ती मदत करू लागले. चरितार्थासाठी टॅक्सी चालवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामागचं एक कारण म्हणजे रोज नवनवीन माणसांना भेटता येईल हे. मात्र प्रत्येकाला ते आपली ही गोष्ट आवर्जून सांगायचे. ही गोष्ट सांगताना माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचणारे आजोबा म्हणाले, ‘‘चल, येतेस? इथेच जायचंय!’’ मी त्यांच्यामागे गाडीतून उतरले. आजोबा एका दफनभूमीत शिरले. तिथे निद्रिस्त असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना अभिवादन करून, काहीच घडलं नाही इतक्या सहजतेनं मला म्हणाले, ‘‘तुला भूक लागलीये का? इथे एक चांगलं कॉफी शॉप आहे!’’

कॉफी घेताना आजोबांच्या चेहऱ्याकडे, डोळ्यांकडे माझं लक्ष होतं. त्यांचं मनापासून हसणं, बोलणं, यातलं काहीही कृत्रिम नव्हतं. कॉफीकडे एकटक पाहत ते म्हणाले, ‘‘हे कसं शक्य झालं असं वाटत असेल ना तुला? माझ्या  लक्षात आलं, की मी तो प्रसंग रोज जसाच्या तसा जगतोय! त्याच्या वेदना अनुभवतोय. त्या घटनेपाशी अडकून राहणं ही माझी इच्छा झालीय, मी त्यात बंदी झालोय! आणि ही मुलं मात्र मुक्त आहेत. जितकं आयुष्य आहे ते मनापासून आनंदानं जगतायत. आणि मी मात्र धडधाकट असूनही रोजचा दिवस कसाबसा ढकलतोय. हे एकटेपण, चीड, दु:ख मीच साठवून ठेवतोय. कशासाठी? या प्रश्नाने मी खाडकन जागा झालो.  तूच सांग, राग, दु:ख याचा त्रास कोणाला सर्वाधिक होतो? अर्थात ते अनुभवणाऱ्याला, त्यात अडकू न पडणाऱ्याला! म्हणूनच मी ठरवलं, की उरलेलं आयुष्य मस्त जगायचं. जितका   आनंद देता आणि घेता येईल तेवढा घ्यायचा. त्या सगळ्यांची आठवण येणारच, मी त्या आठवणींना सोबत घेऊन प्रत्येक दिवस संपूर्ण आणि वर्तमानात जगणार! तूही लक्षात ठेव.’’

Advertisement

या सगळ्याच प्रसंगातून आजोबांनी मोठा मूलमंत्र जाणीवपूर्वक ठळक केला होता. मागचं सोडायचं आणि आनंदानं पुढे जायचं. मागचा प्रिय, अप्रिय प्रसंग, एखादी मागच्या आयुष्यात घडलेली घटना, त्या वेळेस उमटलेल्या भावभावना, विचार मागे सोडून देणं हे खरंच अवघड आहे, नाही का? या क्षणी सहज म्हणून आपण विचार केला, तर आपल्या मनासमोर अशा कितीतरी बाबी मुक्तहस्ते फेर धरतील. विचारांचं वारूळ उठेल. ज्या क्षणी आपण मुळात हा मागचा विचार आणला, तिथे आपली आताच्या क्षणाशी फारकत घेतली जाईल. तीही आपल्या नकळत. या क्षणी असणारे विचार,  भावना, सगळंच पुसलं जाऊन, तिथे मणामणांची ओझी जाणवायला लागतील. तेव्हा लक्षात येईल, नको, पुन्हा तेच सारं नको! तरीही मन म्हणा, मेंदू म्हणा तिथेच रेंगाळत राहील! असं का? एक साधं उदाहरण, आपल्याला घरात नवीन वस्तू आणायच्या म्हटलं, की त्यांची उपयुक्तता, गरज, त्याला लागणारा पैसा, याबरोबरच एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे, त्यासाठी आपल्याकडे जागा आहे का? उपयोगात नसलेल्या वस्तू समोर आल्या की लक्षात येतं, आपण अकारण त्यांचा संचय केलाय. आपल्या मनाचं, विचारांचंही तसंच. इथे मात्र आपण अतिशय कद्रू असतो. नको नको ते अक्षरश: कवटाळून ठेवतो आणि त्याचा वेळोवेळी त्रास करून घेण्यात, अनेक रात्री टक्क जागं राहून काढण्यात आपल्याला अजाणतेपणे फार भूषण वाटतं. किंवा ‘मी किती सोसलंय’, ‘मला अमुक एक आजार झाला होता. त्यात काय त्रास झाला ते तुम्हाला काय माहीत!’ किंवा ‘अमुकतमुक वेळेला माझी परिस्थिती कशी होती हे तुम्हाला कळूच शकत नाही’, ‘माझ्या आयुष्यातली अमुक एक व्यक्ती निघून गेली. त्यानंतर तर माझं जगणं असह्य़ झालं होतं’ इथपासून ते गुदरलेले प्रसंग, उद्भवलेली व्यक्तिगत किंवा सार्वत्रिक परिस्थिती, त्याला तोंड देताना झालेली दमछाक किंवा सपशेल झालेली हार, मोडलेला कणा, गमावलेला आत्मविश्वास, हे सगळंच बोचकं उराशी कवटाळून आपल्यातला हरेक जण वावरत असतो.  कळतं, की हे सोडून द्यायचंय, येणार क्षण नवा म्हणत त्याला कवेत घ्यायचंय. तरीही जमत का नाही? त्यामागे अनेक कारणं किंवा कारणमीमांसा आहेत. पैकी महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्याला जसजसे अधिकाधिक ओळखू लागतो, आपल्यातल्या बऱ्यावाईट बाबी स्पष्ट दिसायला लागतात, क्षमता कळतात, तसे स्वत:ला अधिकाधिक आवडू लागतो. तिथे आपल्या मनात स्वत:ची एक प्रतिमा तयार होत राहते. तिला धक्का लागणं हे आपल्यासाठी असह्य़ असतं. शिवाय बदल आवडतो असं आपण कितीही वरवर म्हणत असू, तरीही, मुळात तो आपल्याला खरंच पटतो का? हे स्वत:ला विचारणं उत्तम. हा बदल म्हणजे स्थळ-काळ-परिस्थिती-व्यक्ती म्हणून आपण, आपल्या आजूबाजूची माणसं आणि जग, या सर्वंकष अर्थानं घेतला, तर गोंधळून, गडबडून जायला होतं. आपण नेमके कोण आहोत, खरंच जो विचार करतोय तेच आहोत का? असे प्रश्न पडायला लागतात. म्हणूनच मागचं आहे ते पुढे रेटणं, धरून बसणं त्या मानानं सोपं असतं. तिथे आपण आपल्याला काही काळ का होईना, गवसलेले असतो किंवा आपला तसा समज असतो.

यात पुन्हा ज्या व्यक्ती स्वत:लाच मनोमन कमी लेखत राहतात त्यांच्यासाठी तर त्यांची अशी स्वत:ला आवडणारी प्रतिमा आणि त्याच्या अवतीभवतीचं सगळंच फार महत्त्वाचं होऊन जातं. म्हणजे एखादी व्यक्ती, जिच्यावर प्रचंड प्रेम आहे, किंवा आपला तेजीत असलेला कामधंदा, किंवा राहती जागा, किंवा मित्रांचा गोतावळा, असं सगळंच. भूतकाळातल्या नकोशा बाबींत आपण कसे योग्य हे ठरवण्याची आपल्याच मनात सतत गरज निर्माण होऊन जाते. त्यातूनच प्रचंड राग, एखाद्याबाबत अढी, द्वेष, इष्र्या, दु:ख, हतबलता अशा नकारात्मक भावना, त्याच वेळेस स्वत:विषयी आपण केवळ अशी दु:खं अंगावर घेत जगायला म्हणूनच जन्माला आलोय किंवा आयुष्य खडतरच आहे, वगैरे भ्रामक भिंती उभ्या करतो. त्यांना आधार देतो त्या या धरून ठेवलेल्या अगणित प्रसंगांचा.

Advertisement

यात प्रेमात हरलेले तर फारच पुढे. एखादी व्यक्ती आयुष्यात आली म्हणून आयुष्य सुंदर झालं, त्याला अर्थ आला, असं आपण आयुष्याकडे पाहायला लागलो, तर अर्थातच ती व्यक्ती कोणत्याही कारणानं आयुष्यातून वजा झाली की ते निर्थक वाटणारच. त्याचं साधं कारण आपल्याला, त्या व्यक्तीशिवाय आयुष्य जगायची सवय राहिलेलीच नसते. मागचं सोडून देणं यात मनाला, मेंदूला भारी मेहनत होते. सुरुवातीला तर जे घडलंय ते नाकारण्याची आपली वृत्ती असते. म्हणजे, ‘छे! असं घडलंच नाहीये’ हे आपल्याला वाटतं. यात आपल्याला हवं तेच घडणार आहे, अजूनही, वगैरे वाटत राहतं. लहान मुलं नाही का, आपलं खेळणं तुटलं, फुटलं की ते कसं तुटलं म्हणून तासन्तास रडत बसतात. समजावलं तरीही त्यांना समजत नाही, तेच खेळणं हवं म्हणून हटून बसतात. तसंच. नंतर असतो तो प्रचंड राग. हे ‘असं झालंच कसं? मीच का? माझी चूकच नाहीये. अमुक एका व्यक्तीमुळे, परिस्थितीमुळे झालं,’ वगैरे दूषणं देणं, इत्यादी. यांच्यापुढची अवस्था म्हणजे, तडजोड. सगळ्याच बाबतीत. इथे आपण काय समोर आहे, काय घडलंय हे न पाहता, स्वत:ला जे हवंय ते उत्तर मिळवण्यासाठी, ‘हे असं असेल तर? तसं झालंच नसेल तर?’ किंवा ‘काय हरकत आहे पुन्हा एकदा तेच करून पाहायला?’ असं म्हणत पुन्हा त्याच गर्तेत अडकण्याची शक्यता असते. कारण इथे अजूनही आपण ते मागचंच धरून बसलेले असतो. इथे अनेक व्यक्ती उगाचच फार चांगलं वागण्याचा निष्फळ प्रयत्न करतात.  म्हणजे उगाच जाऊन समाजसेवेसाठी एक दिवस देणं. एक भाबडी आशा म्हणजे अशानं अचानक चमत्कार होऊन जे मागचं डोक्यात धरलंय ते सुरळीत होईल. जी बिनबुडाची असते. हे फार लवकर लक्षात येतं, कारण या पुढची अवस्था म्हणजे नैराश्य. इथे नाही म्हणायला जे घडलंय तो भूतकाळ आहे किंवा त्या विचार-भावनांचा उपयोग नाही हे लक्षात येतं. आपण जे घडू शकणार नाहीये त्याचा अट्टहास धरतोय हेही समजत असतं. तरीही ते ठसठसत मनात जिवंत असतं. याबरोबर अनेकदा भीती, शंका, सगळ्याबाबत अविश्वास हे सुरू होतं. काही व्यक्ती मात्र सुस्पष्टपणे समोर येऊन हे इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतात. ‘निराश वाटतंय, उदास वाटतंय. मला मदत करा, बाहेर काढा.’ मात्र खरंच यातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या व्यक्ती वेगळ्या आणि केवळ स्वत:कडे लक्ष दिलं जावं म्हणून उगाचच लोकांचा खांदा ओला करणाऱ्या वेगळ्या. त्यांना ही स्थिती काही काळ आवडू लागते. विशेषत: जेव्हा आजूबाजूची माणसं आपलाच विचार करतायत हे लक्षात येतं. यात फार पुसट रेषा आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूचं कोणी असं म्हणत असेल, तर त्याला बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करत असताना हे जोखणं गरजेचं आहे की त्या माणसाला खरंच यातून बाहेर यायचंय का! याची साधी पट्टी म्हणजे ज्याला बाहेर यायचंय तो स्वत: चार नवीन गोष्टी करू पाहतो, मन रमवतो, ते विषय टाळायचा प्रयत्न करतो. ते अशक्य होतं, तेव्हा पुन्हा सांगतो. मात्र सोंग घेतलेली व्यक्ती केवळ रडत राहते.

 यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे झालंय, घडलंय त्याचा संपूर्ण, सर्वतोपरी स्वीकार. त्यासाठी दुर्दम्य इच्छा, पुन्हा उभं राहण्याची ऊर्मी, आपसूक यायला सुरुवात होते. म्हटलं तसं प्रयत्न करावे लागतातच. ते स्वीकारणं सहजासहजी घडतं असं नाही. तिथेही केवळ पर्याय नाही म्हणून स्वीकारणं आणि झालं, घडलं आता यात पुढे रस्ता बंद आहे, आता वेगळी वाट, वेगळी उमेद, असं म्हणून स्वीकारणं, यात प्रचंड फरक आहे.

Advertisement

आपल्या प्रत्येकाकडे एक जादूची कांडी असते, ती म्हणजे आपल्या असण्याचा, आपल्या जगण्याचा काहीतरी उद्देश आहे, तो नेमका काय आहे, याचा शोध घेण्याची. हा उद्देश लौकिकार्थानं कायम उदात्त वगैरे असला पाहिजे असं अजिबातच नाही. ‘माझ्याबाबत असं का?’ याऐवजी ‘माझ्याकडून आयुष्याला काय हवंय?’ हा उलटा प्रश्न सतत स्वत:ला विचारायची सवय करून घ्यावी लागते. ते काहीही असू शकतं. प्रत्येकाचं वेगवेगळं. हे समजलं किंवा याचा शोध चालू झाला की निराशा हळूहळू मागे पडायला लागते. मागची पाटीसुद्धा कोरी व्हायला लागते.

जाता जाता काही महत्त्वाच्या बाबी-

Advertisement

 हा  क्षण फार महत्त्वाचा, त्याचं मोल केवळ आपल्याला माहीत असतं. त्यामुळे त्यावर भरभरून प्रेम करू या.  कसलंही ओझं नकोच. जसं आपल्याला त्याचा त्रास आहे, तसाच इतरांना आहे. आपल्यामुळे कोणाच्या खांद्यावर, मनात ओझं नाही ना, हे प्रामाणिकपणे तपासू या.  झालं-गेलं, घडलं-बिघडलं, यावर आपलं नियंत्रण नाहीच.

 एखादी व्यक्ती, प्रेम किंवा काही खोलवरची नाती यांच्यामुळे त्रास झाला असेल, होत असेल तर त्यांना तिथेच सोडूया. म्हणजेच आपल्या मनातून त्या बंधांचं असणारं महत्त्व यापासून आपलीच फारकत होईल. जी नाती किंवा व्यक्ती किंवा प्रेम यांच्यासाठी आपण महत्त्वाचे असतो, आपलं अस्तित्व महत्त्वाचं, ते आपल्याला असं जाऊ देणारच नाहीत, ते शाश्वत सत्य!

Advertisement

 प्रत्येक क्षणी एक नवीन आकार घेण्यास, नवं नवं शिकण्यास आणि प्रगल्भ होण्यास तयार राहू या! लंडनचे ते आजोबा लक्षात ठेवले की झालं! या वर्षांची अखेर अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.  पुन्हा एक संपूर्ण नवीन, कोरं करकरीत वर्ष आपल्यासमोर उभं राहणार आहे. मंगेश पाडगांवकरांच्या शब्दांत विचारायचं तर कसं घालवणार त़े? कण्हत कण्हत की गाणं म्हणत? आयुष्य हे रोलर कोस्टरसारखंच असतं. कधी आनंद कधी दु:खं देणारं. अशा वेळी माझ्याच वाटय़ाला हे का किं वा मीच नालायक आहे, असा जप करत राहणं, म्हणजे आपल्याच विचारांच्या तुरुंगात स्वत:ला ढकलणं असतं. ‘माझ्याकडून आयुष्याला काय हवंय?’ या प्रश्नांचा वेध घेत उत्तर शोधत गेलात तर स्वत:च्याच कै देतून सुटका नक्की होऊ शकते. म्हणूनच वर्षांअखेरीच्या या वळणावर थोडं विसावून विचार करू  या.. कटू ते सारं मागे सारून नव्या वर्षांत स्वत:ला आनंदी करण्याचं पक्क ठरवू या.. कसं? ते सांगणारा खास लेख..   

[email protected]  

Advertisement

(लेखिका होमिओपॅथिक तज्ज्ञ, मानसोपचार व लैंगिक समस्याविषयक समुपदेशक आहेत. )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement