मुंबई32 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांची आज ईडीतर्फे चौकशी करण्यात येणार आहे. मात्र, ही चौकशी म्हणजे राजकीय दबावाचे षड्यंत्र आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला. तसेच, 2024नंतर ईडी कार्यालयात कोणाला पाठवायचे? त्यांना किती वेळ कार्यालयात बसवायचे?, याची यादी आम्ही लवकरच जाहीर करू, असा इशाराही संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
जयंत पाटील मजबूत मनाचे
संजय राऊत म्हणाले, जयंत पाटील हे मजबूत मनाचे, स्वाभिमानी व्यक्ती आहेत. ते ताठ मानेने ईडी चौकशीला सामोरे जातील. ईडीच्या दबावाला जयंत पाटील बळी पडणार नाहीत. विरोधक जेव्हा भाजपच्या म्हणण्यानुसार वागत नाही, त्यांच्या दबावाला बळी पडून काही करू इच्छित नाही, तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून त्यांचे गुडघे टेकवण्याचा प्रयत्न केला जातो. जयंत पाटील यांची ईडी चौकशी हा तसाच एक प्रकार आहे. मात्र, 2024ला सत्तांतर होईल तेव्हा ईडी कार्यालयात कोणाला पाठवायचे आणि किती वेळ बसवायचे, याची यादी आम्ही लवकरच जाहीर करू, असा इशारा संजय राऊतांनी दिला.
देशात सध्या लहरी राजा
2 हजारच्या नोटा चलनातून मागे घेण्यावरून संजय राऊत यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. संजय राऊत म्हणाले, देशाला एक लहरी राजा मिळाला आहे. लहरी राजा असेच निर्णय घेणार. 2024पर्यंत असे निर्णय आता आपल्याला सहन करावे लागणार.
हिंदुत्ववादी जनतेने मोदींना नाकारले
संजय राऊत म्हणाले, कर्नाटकमधील भाजपचा पराभव अत्यंत दारूण आहे. या पराभवातून भाजपने देशाची मानसिकता समजून घ्यावी. दक्षिणेत सगळ्यात जास्त हिंदुत्व आहे, कर्नाटकात सर्वाधिक हिंदूची मंदिरे, तेथील लोक श्रद्धाळू आहेत. तरीही त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांना सपशेल नाकारले आहे. भाजप हे सत्य स्वीकारत का नाही. यापुढे देशात भाजपच्या वाट्याला असाच पराभव येणार आहे.
पालिका निवडणुका का घेत नाहीत?
संजय राऊत म्हणाले, पराभवाच्या भीतीनेच मुंबई पालिका निवडणुका घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. भाजप ठाणे, मुंबईसह 14 पालिका निवडणुका घेण्याची हिंमत का दाखवत नाही. वाटल्यास पंतपर्धान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी तंबू ठोकून जेथे निवडणुका असतील तेथे बसावे. एकदाची निवडणूक होऊ द्या. मग दाखवून देऊ जनमत कोणाकडे आहे.
आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे बॅनर लावले आहेत. त्यावर संजय राऊत म्हमआले, भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे बॅनर लागलेल असेल तर त्याच चुकीचे काय आहे. लोकांचे प्रेम असेल तर त्यात आक्षेप घेण्याचे काही कारण नाही.
संबंधित वृत्त
कारवाई:IL&FS प्रकरणी जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे राज्यभरात निदर्शने
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता आपण ईडी कार्यालयात हजर राहणार आहोत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसशी (IL&FS) संबंधित गैरव्यवहाराचे हे प्रकरण आहे. या कंपनीने अनेकांना नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप केल्याप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान, जयंत पाटील यांचे नावही समोर आले आहे. वाचा सविस्तर