पुणे40 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
वितस्था ही केवळ नदी नसून जम्मू-काश्मीरची संस्कृती, सांस्कृतिक वारसा असून जीवनवाहिनी आहे. साहित्यिकांचे प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ काश्मिरी नाटककार, कथाकार, निर्माते, साहित्य अकादमी पुरस्कारविजेते प्राण किशोर कौल यांनी शनिवारी वितस्था महोत्सवात केले.
वितस्था नदीच्या तसेच जम्मू-काश्मीरच्या संस्कृतीचा अधिक खोलवर अभ्यास होऊन हा इतिहास अभ्यासकांनी जगासमोर आणावा, अशी अपेक्षा काश्मिरी संस्कृतीचे अभ्यासक आणि वितस्था महोत्सवाचे नॉलेज पार्टनर सिद्धार्थ काक यांनी व्यक्त केली.
पुणे विद्यापीठात महोत्सव
केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वितस्था महोत्सवाअंतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, संस्कृती मंत्रायल आणि साहित्य अकादमीच्या सहयोगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू झाला.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव, आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाच्या सल्लागार गौरी बसू, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी, वितस्था महोत्सवाच्या स्थानिक समन्वयक चित्रा देशपांडे, विद्यापीठाचे डॉ. संतोष परचुरे उपस्थित होते.
साहित्यकृतींची देवाण-घेवाण
प्राण किशोर कौल म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रत्येक प्रदेशाचा सांस्कृतिक वारसा जपत साहित्यिकांच्या साहित्यकृतींची देवाण-घेवाण व्हावी यासाठी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल इस्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन्सची स्थापना होणे गरजेचे आहे. वितस्था नदीच्या तिरी अनेक ऐतिहासिक घटना घडल्या, अनेक युद्धे लढली गेली आहेत. अनेक शायर, कवी, कथाकार यांचे साहित्य फुलले-जडणघडण झाली.
साहित्यामागचा इतिहास
सिद्धार्थ काक म्हणाले, अभ्यासकांनी जम्मू-काश्मीरची संस्कृती दर्शविणाऱ्या स्थानिक पातळीवरील साहित्याचाही अभ्यास करून त्याचे वैशिष्ट्य, साहित्य निर्मितीमागील इतिहास अभ्यासून या लोकसाहित्याचे जतन करणे आवश्यक आहे. अशा लोकसाहित्यातून पुढील पिढीला महान वारसा आणि संस्कृती कळण्यास मदत होईल. हा ठेवा अमूल्य आहे.