छत्रपती संभाजीनगर15 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
छत्रपती संभाजीनगर वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कासोडा लवकी रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीमध्ये खून करून मृतदेह फेकल्याची माहिती आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हा अनोळखी मृतदेह कोणाचा याचा तपास पोलिस करीत आहे.
कासोडा येथील भिकन हिवाळे यांचे गट नंर 144 मध्ये शेत जमीन आहे नेहमीप्रमाणे ते आज शेतात गेल्यानंतर विहिरीची पाणी पातळी पाहण्यासाठी विहिरीत डोकावले. यावेळी त्यांना पाण्यावर काहीतरी तरंगत असल्याचे दिसून आले. त्यांनी निरखून पाहिल्यानंतर पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ गावचे पोलिस पाटील यांना खबर देऊन सविस्तर माहिती सांगितली. माहिती मिळताच पोलिस पाटलांनी घटनास्थळ गाठून घडलेला प्रकार एमआयडीसी वाळुज पोलिसांना कळवला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक गौतम वाबळे यांच्यासह फौज फाटा हिवाळे यांच्या विहिरीवर दाखल झाला. एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाला कळविल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढला. पोलिसांनी सदरील मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला आहे.
मृतदेहाच्या चेहऱ्यावर जखमा
मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही आत्महत्या नसून खून असल्याचे प्रथमदर्शी माहिती पोलिसांनी कळविले आहे. मात्र मयत व्यक्ती हा कोण याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
वर्षभरापूर्वीही घडली होती घटना
वाळूज औद्योगिक परिसरात वारंवार अशा घटना घडत आहेत. वर्षभरापूर्वी एका चारचाकीमध्ये अशाप्रकारे मृतदेह आणून या परिसरात फेकून दिला होता. या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे आज पुन्हा एकदा समोर आले आहे त्यामुळे अशा घटनांना आळा कसा घालता येईल यावर विचार करण्याची वेळ आली आहे.