मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी छगन भूजबळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्या शेतकऱ्यांच्या संसाराची होळी झाली आहे आणि इकडे नेते रंग उधळत आहेत असा टोलाही छगन भूजबळ यांनी लगावला.आज सकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार छगन भुजबळ यांनी कांदा, द्राक्ष यांसह राज्यातील सर्वच पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यावरून छगन भुजबळ यांनी मदत मिळावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावेळी त्यांनी गुजरातच्या सरकारचा संदर्भ दिला आहे.
मदत आपण का करू नये?
महाराष्ट्रापेक्षा गुजरात लहान आहे. पण त्यांच्या सरकारने कांदा पिकाला अनुदान देणार आहे. त्यांनी वाहतुकीसाठी अनुदान दिले आहे. तर दुसरीकडे निर्यातीसाठीसुद्धा अनुदान दिले आहे. याशिवाय आपल्या पेक्षा कांदा पीक त्यांच्याकडे फारच कमी असतांना ते मदत करत आहे तर आपण का करू नये अशीही मागणी भुजबळ यांनी केली आहे.
कांद्याला अनुदान द्या
राज्यात नाफेडकडून केली जाणारी खरेदी ही बाजारसमितीत जाऊन केली जात नाही. परस्पर कंपनीच्या माध्यमातून बाहेरच्या बाहेर खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचा मुद्दा मांडत भुजबळ यांनी कांदा पिकाला अनुदान मिळालेच पाहिजे अशी मागणी केली आहे.
शेतकरीप्रश्नी विरोधक आक्रमक
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरीप्रश्नी विरोधक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, द्राक्षे, गहू पिकांच्या नुकसानाबाबत तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी करत विरोधकांनी केली. इतर सर्व प्रश्नांच्या आधी तातडीने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असा स्थगन प्रस्ताव विरोधकांनी सभागृहात मांडला.