नाशिकएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
गेल्या अनेक दिवसापासून पक्षाच्या कुंपणावर असलेल्या माजी खासदार वसंत पवार यांच्या कन्या अमृता यांना भाजपने आपल्या पक्षात दाखल करून घेत आगामी येवला विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनामधून माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये वरकरणी नाकेबंदी सुरू केल्याचे दिसत असले तरी , या खेळीमधून एकाच दगडात अनेक पक्षी मारले जात असल्याचे चित्र आहे.
मविप्र संस्थेचे भविष्याचे राजकारण, येवला , निफाड विधानसभा मतदार संघासोबत नाशिक लोकसभा मतदारसंघात पवारांची ‘पॉवर’ भाजपासाठी वापरण्याची ही खेळी आहे.
माजी खासदार पवार यांचे शरद पवार यांच्याशी कायम कौटुंबिक नाते राहिले आहे. पुढे हेच नाते पवार यांच्या पत्नी नीलिमा व कन्या अमृता यांनी देखील कायम ठेवले. मात्र सिनेट निवडणुकीमध्ये नीलिमा यांनी थेट अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत उमेदवारीची दावेदारी केल्यानंतर अचानक सर्व वारे फिरल्याचे बोलले जाते.
२०१९ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अमृता यांनी जवळची मैत्रीण तथा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या किमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा छुपा प्रचार केल्याची ही चर्चा होती. स्थानिक पातळीवर भुजबळ यांच्याशी फारसे संबंध मधुर नसल्याचा हा परिणाम असल्याचेही बोलले गेले. अशातच गेल्या वर्षी झालेल्या मविप्र निवडणुकीमध्ये केवळ भुजबळच नव्हे तर खुद्द शरद पवार यांनीही प्रतिस्पर्धी पॅनलमधील नितीन ठाकरे यांना आशीर्वाद दिला व पवार कुटुंबाच्या हातातील सत्ता गेली.
राष्ट्रवादीच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून नितीन ठाकरे नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढतील अशी चर्चा सुरू झाल्यानंतर आता आपल्या हातात फार काही लागत नाही हे जोखून गेल्या चार ते पाच महिन्यापासून राजकीय विजनवासाचा सामना करणाऱ्या पवारांनी अखेर भाजपाचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, आमदार अॅड. राहुल ढिकले आदी उपस्थित हाेते.
घाेलपांची कन्याही भाजपमध्ये
माजी मंत्री बबन घाेलप यांची कन्या तनुजा यांनी भाजपात प्रवेश केला. भविष्यात देवळाली विधानसभा मतदारसंघातून त्यांची दावेदारी मानली जात आहे.
येवला की नाशिक ‘मध्य’
पवार यांचा जिल्हा परिषदेचा गट हा येवला विधानसभा मतदारसंघांमध्ये येतो. निफाड मधील लासलगाव अन्य भागामध्ये पवार यांचे प्राबल्य असल्यामुळे भुजबळ विरोधात त्यांना उतरवले जाऊ शकते. दलित व मुस्लिम बहुल असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात पवार यांचे निवासस्थान असून येथे ८५ हजाराहून मराठा समाजाच्या एकगठ्ठा मतांवर आहे. त्याचाही फायदा या मतदारसंघातून करून घ्यायचा प्रयत्न आहे.