नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या २२ व्या सामन्यात चेन्नईच्या संघानं बंगळुरूला २३ धावांनी पराभूत केलं आहे. या हंगामातील सलग चार सामने गमावल्यानंतर चेन्नईनं पहिला विजय नोंदवला आहे. या सामन्यात बगंळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं २० षटकात दोन विकेट्स गमावून २१७ धावा केल्या. प्रत्युरात मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघाला २० षटकात ९ विकेट्स गमावून १९३ धावापर्यंत मजल मारता आली.
महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे दोन दिग्गज एकमेकांसमोर उभे ठाकणार अन् चाहत्यांच्या आनंदाला उधाण नाही येणार असे होणार नाही. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर सीएसके विरुद्ध आरसीबी सामना मैदानावर सुरू होता, तर तो प्रेक्षकांमध्येही सुरू होताच. पण, सलग चार पराभव पत्करलेल्या सीएसके ने जोरदार मुसंडी मारून आयपीएल २०२२मध्ये अखेर विजयाची चव चाखली अन् सीएसके च्या चाहत्यांनी जल्लोष करत स्टेडियम दणाणून सोडले. रॉबिन उथप्पा व शिवम दुबे या जोडीने चौकार-षटकारांची आतषबाजी करून सीएसके च्या विजयाचा मजबूत पाया रचला. या दोघांचे शतक झाले असते तर आणखी मजा आली असती. दिनेश कार्तिकने फटकेबाजी करून सीएसके ची धाकधुक वाढवली होती, पण लक्ष्य अधिक असल्याने तोही अपयशी ठरला. शिवम दुबे सामनावीराचा मानकरी ठरला.
ऋतुराज गायकवाड १७ व मोईन अली ३ झटपट माघारी परतल्याने चेन्नईची अवस्था २ बाद ३६ अशी झाली. रॉबिन उथप्पा व शिवम दुबे यांनी दमदार खेळ केला. ८१ धावांवर असताना उथप्पाला जीवदान मिळाले. उथप्पा व दुबे यांनी आरसीबी विरुद्ध तिसऱ्या विकेटसाठीही सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. याआधी केन विलियम्सन व मनीष पांडे यांनी २०१८ मध्ये १३५ धावा चोपल्या होत्या. उथप्पा ५० चेंडूंत ४ चौकार व ९ षटकारांसह ८९ धावांवर बाद झाला. दुबे व उथप्पा यांची १६५ धावांची भागीदारी ही आयपीएलमधील तिसऱ्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी कुमार संगकारा व कॅमेरून व्हाईट यांची २०१२ साली नोंदवलेली १५७ धावांचा विक्रम मोडला. दुबे ४६ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह ९५ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईने ४ बाद २१६ धावा केल्या. माहीश थिक्सानाने प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या आरसीबी च्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद केले. फॅफ ड्यू प्लेसिस (८) व अनुज रावत (१२) माघारी परतल्यावर विराट कोहली मैदानावर आला, परंतु तो ३ चेंडूंचा पाहुणा बनला. मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर तो (१) दुबेच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ग्लेन मॅक्सवेलला जीवदान मिळाले, परंतु रवींद्र जडेजाने त्याचा त्रिफळा उडवला. मॅक्सवेलची पत्नी विनी रमण स्टेडियमवर उपस्थित होती. मॅक्सवेल ११ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २६ धावांवर बाद झाल्याने आरसीबी ची अवस्था ४ बाद ५० अशी झाली. पदार्पणवीर सुयष प्रभुदेसाई व शाहबाज अहमद यांनी धावांची गती कमी होऊ दिली नाही. या दोघांनी ३३ चेंडूंत ६० धावा जोडल्या.
चेन्नईच्या खेळाडूंकडूनही झेल सुटले, परंतु गोलंदाजांनी त्याची लगेच भरपाई केली. थिक्सानाने या सेट झालेल्या फलंदाजांना बाद केले. प्रभुदेसाई १८ चेंडूंत ३५ धावांवर, तर अहमद २७ चेंडूंत ४१ धावांवर थिक्सानाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाले. आरसीबीला ३० चेंडूंत ७७ धावा करायच्या असताना १६ षटकाचा पहिला चेंडू वनिंदू हसरंगाने षटकार खेचला, परंतु रवींद्र जडेजाने चतुराने पुढच्याच चेंडूवर त्याची विकेट घेतली. याच षटकात आकाश दीपचा अफलातून झेल अंबाती रायुडूने पकडला. इथून बंगळुरूचा विजय अशक्यच वाटत होता, पण दिनेश कार्तिक मैदानावर असल्याने चाहत्यांना अजूनही आस होती. ६ धावांवर असताना कार्तिकचा सोपा झेल सोडणे मुकेश चौधरीलाच महागात पडले. त्याच्या १७व्या षटकात कार्तिकने २३ धावा कुटल्या.
१८ चेंडूंत ४८ धावा आरसीबीला करायच्या होत्या, परंतु त्यांच्याकडे कार्तिकशिवाय फलंदाजीत दुसरा सक्षम पर्याय नव्हता. ८ विकेट्स गमावल्यामुळे त्यांच्यावर अधिक दडपण होते. तिक्सानाने ३३ धावांत ४, जडेजाने ३९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. १८व्या षटकात ड्वेन ब्राव्होने सीएसकेला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. कार्तिक १४ चेंडूंत २ चौकार व ३ षटकरांसह ३४ धावांवर जडेजाकरवी झेलबाद झाला. इथेच आरसीबीचा खेळ खल्लास झाला. आता केवळ औपचारिकता राहिली होती. आरसीबीने ९ बाद १९३ धावा केल्या. चेन्नईने २३ धावांनी सामना जिंकला.