गणेश गाडेकर | छत्रपती संभाजीनगर40 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
औरंगपुऱ्यातील जि. प. मैदानावरील विसर्जन विहिरीतील कचरा. छाया : रवी खंडाळकर
- पालिकेच्या उघड्या विहिरी वर्षभरातच बनतात डंपिंग वेल
नवीन ६० फूट खोल अन् २५ फूट व्यासाची विहीर खोदण्यासाठी सरासरी ४ लाख रुपये खर्च येतो. असे असताना महानगरपालिका एका विहिरीमधील गाळ, कचरा काढण्यासाठी तब्बल ८ लाख रुपये खर्च करणार आहे. गणपती विसर्जनासाठी या विहिरींचा वापर होतो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या आडून महानगरपालिका पैशांची कशी उधळपट्टी करते, याचा हा उत्तम नमुना म्हणावा लागेल.
शहराचा विस्तार लक्षात घेता महानगरपालिकेने विविध भागात गणेश विसर्जनासाठी नऊ विहिरींची व्यवस्था केली आहे. यामध्ये भीमनगर भावसिंगपुरा, जिल्हा परिषद मैदान औरंगपुरा, स्वामी विवेकानंदनगर, हडको एन १२, हर्सूल येथील स्मृतिवन उद्यान, संतोषीमातानगर, मुकुंदवाडी, सातारा परिसर, देवळाई तलाव या ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व विहिरींच्या स्वच्छतेसाठी निविदा प्रक्रिया महानगरपालिकेने केली असून कामे सुरू झाली आहेत.
गणपती बसण्यापूर्वी काम होईल का?
आजपासून १२ दिवसांनंतर गणपतीचे आगमन होणार आहे. अनेक विहिरींमध्ये अद्यापपर्यंत स्वच्छतेचे काम सुरू झालेले नाही. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील दीड दिवसाच्या गणपती विसर्जनापर्यंत विहीर स्वच्छतेचे काम पूर्ण होणार का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. काम पूर्ण न झाल्यास नागरिकांना या वर्षीदेखील गणपती विसर्जनासाठी अडचणी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
शहरातील आठ विहिरींमधील काढणार गाळ
औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावरील विहिरीसाठी ७ लाख ९८ हजार, शिवाजीनगर ५ लाख ९७ हजार, भीमनगर १ लाख ९९ हजार, हडको एन-१२ मधील विहिरीसाठी ७ लाख ८६ हजार रुपये, हर्सूल स्मृतिवन विहिरीसाठी ५ लाख ४८ हजार रुपये, संतोषीमातानगर ३ लाख ३ हजार रुपये, मुकुंदवाडी ५ लाख ६९ हजार रुपये, तर सातारा आणि देवळाई तलावातील स्वच्छतेसाठी ७ लाख ६० हजार रुपये खर्च करण्यात येत आहे.
थेट सवाल
विहिरीतील गॅसमुळे खर्च वाढतोय
या विहिरींमध्ये ओला-सुका कचरा असल्याने त्यात विविध वायू असतात, स्वच्छ करण्यासाठी सेफ्टी किट्स वापराव्या लागतात. स्वच्छतेसोबतच विसर्जनाच्या दिवशी विहिरीजवळ मंडप, बॅरिकेड्स, टेबल, खुर्च्या आदी खर्च ठेकेदाराला करावा लागणार आहे. त्यामुळे रक्कम अधिक दिसते.
– राजेंद्र वाघमारे, ड्रेनेज विभागप्रमुख, मनपा
थेट सवाल – जी. श्रीकांत, आयुक्त, महानगरपालिका
प्रश्न – ४ लाख रुपयांमध्ये नवीन विहीर तयार होत असताना केवळ स्वच्छतेसाठी पालिकेकडून ८ लाख रुपये खर्च का केला जातो?
– ४ लाख रुपयांमध्ये नवीन विहीर होतच नाही. मला एवढ्या कमी किमतीत खोदून दाखवा.
प्रश्न – दरवर्षी विहिरींची स्वच्छता करावी लागते, विहिरी अस्वच्छ होणार नाहीत, यासाठी ठोस काही का केले जात नाही?
– खरे तर विहिरींमध्ये गणेश विसर्जन होऊच नये, या मताचा मी आहे. याबाबत बैठकीत चर्चा करू आणि पुढील दिशा ठरवू.
प्रश्न – विशिष्ट कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठीच हा खटाटोप आहे का?
– असे काही नाही. महापालिकेत वेळेत बिल मिळत नाही, बिलासाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे बिलासाठी वाट पाहण्याची क्षमता असलेलेच कंत्राटदार ही कामे घेतात.