पुणे12 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
भारताची सर्वात महत्वाकांक्षी अंतराळ मोहीम संपूर्ण यशस्वी व्हावी, यासाठी देशात ठिकठिकाणी प्रार्थना केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे अनेक मंदिरांमध्ये पूजा, यज्ञ, होम, अभिषेक केले जात आहेत. पुण्याजवळ असलेले आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या श्रीखंडेरायाला देखील बुधवारी दुपारी चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी, या भावनेने साकडे घालण्यात आले.
ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची असलेली भारताची चांद्र मोहीम बुधवारी सायंकाळी यशाच्या टप्प्यात आहे. सार्या जगाचे लक्ष या चांद्रयान मोहिमेने वेधून घेतले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा जगातला पहिला देश ठरणार आहे. तसेच ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या पंक्तीत बसायचे भारताचे स्वप्न साकार होणार आहे. त्यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या या चांद्रयान मोहिमेला अंतिम टप्प्यात परमेश्वरी आशीर्वाद मिळावेत, या भावनेने जेजुरी गडावर श्रीखंडेरायाला विधिवत मंगल अभिषेक घालून पूजा करण्यात आली. याप्रसंगी जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्याकरिता बुधवारी दुपारी जेजुरी गडावर खंडेरायाला अभिषेक घालण्यात आला. विधिवत पूजा करून ही मोहीम यशस्वी करण्याकरिता प्रार्थना करण्यात आली. यावेळी देवसंस्थानचे विश्वस्त मंडळातर्फे विश्वस्त अनिल रावसाहेब सौंदडे यांचे हस्ते अभिषेक करण्यात आला, अशी माहिती जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. चांद्रयान मोहिमेच्या प्रत्यक्ष लॅंडिंगच्या अंतिम घटिका सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटांनी सुरू होणार आहेत. त्याआधी जेजुरी गडावर हे धार्मिक विधी संपन्न करण्यात आले.