चांदवड18 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
घरफोडीप्रकरणी चांदवड पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयितांसमवेत पोलिस अधीक्षक सविता गर्जे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव, उपनिरीक्षक सुरेश चौधरी व कर्मचारी.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी एकाच रात्रीत चांदवड शहरातील सहा दुकानांमध्ये झालेल्या घरफोडीप्रकरणी दोघा संशयितांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली असून त्यांना चांदवड न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चांदवड शहरातील चांदवड-मनमाडरोड परिसरातील रेणुका कलर वर्ल्ड, झांबरे पैठणी, श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, इंदुमती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, जाधव आणि कंपनी अॅग्रो मॉल या दुकानांसह साहेबराव भागूजी गुंजाळ यांच्या घरात दि. २७ मे २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन एकूण ४५ हजार १७० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. तर गौतम किराणा एजन्सी या दुकानात चोरीचा प्रयत्न केला होता.
याबाबत चांदवड पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी भ्रमणध्वनीची माहिती, सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे तपासचक्रे फिरवून सेंधवा, मध्य प्रदेश येथून संशयित जितू हरसिंग आर्य (२३, रा. खामपानी, ता. नेवासा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) व दिलीप रुमालसिंग जाधव (२२, रा. नवलपुरा ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलिस हवालदार मन्साराम बागूल, पोलिस नाईक संतोष दोंदे, प्रदीप आजगे यांच्या विशेष पथकाने केली. दोघा संशयितांना न्यायालयाने दि. २४ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस हवालदार मन्साराम बागूल करीत आहेत.