चवीचवीने.. : तुकतुकीततैवानीज भूषण कोरगांवकर [email protected]

Advertisement

मुसळधार पाऊस आणि अतोनात श्रम. अशात समोर आलेला गरमागरम टपरीवरचा चहा म्हणजे अमृतच! प्रवासाची, फिरायची, चालायची आवड असली तरी ट्रेकिंगच्या फंदात मी फारसा पडत नाही. कधी नव्हे ते कर्नाळ्याच्या या ट्रेकमध्ये सामील झालेलो. हे काचेचे ग्लास इतके लहान असतात की एकाने काही माझं समाधान झालं नव्हतं. नाइलाजाने उठणार तोच एक आवाज कानावर आला.. ‘I love Indian chai. I want to have two more cups. May I?’ आमच्या भारतीय ग्रुपमध्ये पूर्णपणे मिसळून गेलेला, आवडीने वडापाव खाणारा हसतमुख तैवानीज मुलगा विचारत होता.

पुढे त्याच्याशी नीट ओळख झाली आणि समजलं की, गेलं वर्षभर तो मुंबईत अगदी आमच्या समोरच्याच इमारतीत राहतोय. टोलेजंग टॉवर झाल्यापासून आमच्याच बिल्डिंगमधल्या अर्ध्याहून अधिक लोकांना मी ओळखत नाही. त्यामुळे या मुलाशी ओळख नव्हती यात मला काहीच आश्चर्य वाटलं नाही. आता ती झालीये याचा आनंद मात्र झाला.

Advertisement

लिन चुंग चिन हे त्याचं तैवानीज नाव. ‘फॅबियन’ हे इंटरनॅशनल नाव. त्यांच्या देशात अनेक जण अशी दोन नावं घेतात. कारण देशाबाहेर त्यांची मूळ नावं कुणालाच नीट उच्चारता येत नाहीत. त्याच्या फूडीपणाची चुणूक मिळालीच होती. त्यामुळे पुढल्या रविवारी त्याच्याकडून चहाचं आमंत्रण आल्यावर ते नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. मी ठरल्यानुसार संध्याकाळी साडेपाच वाजता त्याच्या घरी पोहोचलो.

‘दिलेल्या वेळेच्या एक मिनिट आधीच आलेला तू पहिला भारतीय आहेस.’ चुंग प्रसन्न हसत म्हणाला.

Advertisement

‘एक रस्ता क्रॉस करण्यात कशाला उशीर होईल?’ मीही हसलो.

‘पण होतो. शेजारच्या डेस्कवरून माझ्या डेस्कवर पोचायलाही उशीर होतो.’ आता भारतीयांच्या तक्रारींचा पाढा सुरू होणार! आपल्यातल्या उणिवा आपल्याला माहीत असतात; पण त्यांची उजळणी झालेली काही वाईट नाही. मसाला चहाचे वाफाळते कप, तैवानमधून आणलेली चीज भरलेली बिस्किटं आणि कोलंबीच्या फ्लेवरच्या रताळ्याच्या चिप्ससारखं उत्तम खाणं समोर आल्यावर तर अजिबातच नाही.

Advertisement

‘भारतीयांचं कुठलं कुठलं वागणं तुझ्या डोक्यात जातं?’ मी पिन मारली.

‘वेळ आणि नियम न पाळणं.. कधी स्वार्थासाठी, तर कधी काहीही कारण नसताना उगाच खोटं बोलणं.. रस्त्यावरच्या पशुपक्ष्यांना खायला घालणं आणि त्यांना माणसासारखं ऐदी आणि आळशी करून ठेवणं..’

Advertisement

भूतदयावादी असलो तरी चुंगच्या बोलण्यातल्या मिश्किल टिप्पणीने मला हसू आलं. त्याची यादी अजून संपलेली नव्हती.

‘..स्वत: डोळे फाडून बघत राहतील आणि आपण स्माइल दिलं तर नजर चुकवून दुसरीचकडे बघतील. पण ते एक वेळ परवडलं, काही काही जण तर जुजबी ओळखीवर कुठलेही पर्सनल प्रश्न विचारायला लागतात.. बाकी त्यांची कल्पनाशक्ती मात्र सॉलिड असते हा. आणि बऱ्याचदा ते आपल्याच विश्वात मग्न असतात..’

Advertisement

मी क्षणभर चपापलो. कारण मीसुद्धा फक्त हसण्यात आणि खाण्यातच मग्न होतो.

‘पण मला भारत आणि भारतीय लोकं खूप आवडतात. त्यांची धंद्यातली अक्कल कमाल असते. घासाघीस करावी तर ती भारतीयांनीच. आणि कुठल्याही गोष्टीची कॉस्ट कमी कशी करता येईल हे त्यांना बरोब्बर माहीत असतं..’

Advertisement

चुंगने आता गिअर बदलला होता- ‘आणि तुमची संस्कृती आणि फूड म्हणजे तर.. किती प्रकारचं वैविध्य आहे तुमच्याकडे! एक मराठी फूड म्हटलं तरी केवढे ते प्रकार!’

चुंगला आमच्या वांद्रे पूर्व भागातली ‘यॉचचा’, ‘स्मोक हाऊस डेलि’, ‘एलपीक्यू’ अशा रेस्टॉरंट्सइतकीच ‘हायवे गोमंतक’, ‘अमेय’, ‘सदिच्छा’, ‘सिद्धिविनायक’ ही मराठमोळी रेस्टॉरंट्सही प्रिय आहेत.

Advertisement

गप्पांच्या नादात साडेसात वाजले. त्याच्या पुढच्या खाण्याची वेळ झाली. दर दोन तासांनी खाणं ही चुंगची सवय आहे. (दररोज दीड तास व्यायाम हीसुद्धा!)

‘जास्त काही करत नाहीये. पटकन् होईल. तैवानीज कधी खाल्लं नसशील ना?’ त्याने विचारलं.. ‘आमच्या खाद्यसंस्कृतीवर चायनीज प्रभाव असला तरी जपानी, पोर्तुगीज, डच यांनीही इथे राज्य केल्यामुळे त्यांच्या पाककलेचा अंशही अधूनमधून दिसून येतो. छोटीशी झलक घेऊन जा.’

Advertisement

मी थांबलो.

अवघे दोन पदार्थ. पण त्यांची चव अशी काही अभूतपूर्व होती की तिला तोडच नाही. अर्ध्या गोष्टी त्याने आधीच तयार करून फ्रिजमध्ये ठेवलेल्या असल्यामुळे मेहनत आणि वेळ दोन्ही कमी. मांसाहारी बाओ (मोमो)- ज्यात त्याने खिम्यासोबत जेलीसारख्या दिसणाऱ्या तिखट पदार्थाचे तुकडे घातले होते. त्या जेलीची खासियत खाल्ल्यानंतर लक्षात आली. आणि गोड पदार्थ तर कच्चा आणि तळल्यावर दोन्ही प्रकारे निव्वळ अतुलनीय होता.

Advertisement

त्या दिवसानंतर तो इथून जून २०२० मध्ये कायमचा ‘ताईपे’ला निघून जाईपर्यंत मी त्याच्या घरी आणि त्याने माझ्या घरी अनेक जेवणं झोडली. काही घरगुती पाटर्य़ामध्ये तर त्याने एका वेळेस दहा-दहा लोकांसाठी फार मेहनत घेऊन अफाट चवीचे अनेक चायनीज, तैवानीज पदार्थ एकहाती रांधले. पण पहिल्या दिवशी खाल्लेले हे दोन पदार्थ करायला तुलनेत सोपे, खूप वेगळं वा परकं साहित्य नसलेले आणि तरीही रुचकर असल्यामुळे त्यांच्या रेसिपीज् खास तुमच्यासाठी.

तैवानीज बाओ

Advertisement

आवरणासाठी : एक वाटी कणीक, एक वाटी मैदा, एक वाटी गरम पाणी, एक चमचा तिळाचं तेल एकत्र करून चांगलं मळून घ्यायचं. बोटचेपं होईस्तोवर ते मळावं लागतं. नंतर एक तास ते झाकून ठेवून द्यायचं.

सारणासाठी : किसलेलं आलं, गाजर, बारीक चिरलेली कांद्याची पात, मीठ, साखर, मिरपूड, सोया सॉस, तिळाचं तेल आणि आपल्या आवडीच्या मांसाचा खिमा (किंवा कोलंबीचे किंवा टोफूचे तुकडे) मिसळून पंधरा मिनिटं मुरवत ठेवायचं.

Advertisement

तिखट जेली क्यूब्ससाठी : कांद्याची चिरलेली पात, ठेचलेलं आलं, असतील त्या भाज्या, चिकनची हाडं, असल्यास बेकनचे तुकडे आणि पाणी हे मिश्रण चवीपुरतं मीठ, साखर घालून किमान तासभर उकळून मग गाळून घ्यायचं. थंड झाल्यावर त्यात जिलेटीन पावडर (एका वाटीला दीड चमचा) घालून पुन्हा गॅसवर ठेवायचं. तिखट आवडत असेल तर यात ओल्या लाल किंवा हिरव्या मिरच्यांचे छोटे तुकडे टाकायचे. पाच मिनिटं उकळून थंड करून फ्रिजमध्ये सेट करायला ठेवायचं. चांगलं घट्ट झालं की बाहेर काढून त्याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यायचे.

सॉस : आल्याचे पातळ लांब तुकडे आणि चिंकीयेंग विनेगर एकत्र करायचं. ते मिळालं नाही तर सोया सॉस, मिरपूड, चिली सॉस, साधं विनेगर, असल्यास राइस वाइन हे मिश्रण घ्यायचं.

Advertisement

कृती : पीठ पुन्हा एकदा मळून त्याच्या किंचित जाडसर पुऱ्या लाटून घ्यायच्या. मधला भाग जास्त जाड आणि सभोवार पातळ अशा. त्यात सारण आणि जेलीचे तुकडे भरून त्याला हातानेच मोदक, करंजी किंवा नुसताच गोळ्याचा आकार द्यायचा. कुकरमध्ये शिट्टी न लावता वाफवून घ्यायचं. (मटण/ बीफ खिमा वापरलात तर पंधरा ते वीस मिनिटं किंवा पोर्क/ चिकन खिमा / कोलंबी / टोफू- दहा मिनिटं). तुकडा तोडताच आतली जेली विरघळून त्याचा रस तयार झालेला असतो. खाताना हा रस, मांसाचा स्वाद, आल्याचा झणका आणि वरून आपण घातलेला सॉस याचा जो काही मेळ तयार होतो तो पूर्ण तृप्ती देणारा असतो.

कांद्याची पात आणि आलं ही जोडगोळी चुंगच्या मांसाहारी स्वयंपाकात वेगवेगळ्या स्वरूपात भरपूर वापरली जाते.

Advertisement

फ्राइड  मिल्क केक

मोठय़ा पातेल्यात दीड कप (सायीसकटच्या) दुधात अर्धा कप साखर आणि दोन चमचे अमूल बटर घालून हे मिश्रण मंद आचेवर ठेवायचं. दुसऱ्या भांडय़ात अर्धा कप कॉर्नस्टार्च घेऊन त्यात अर्धा कप दूध घालून ते नीट ढवळून घ्यायचं. एकही गुठळी राहता कामा नये. हे मिश्रण त्यात हळूहळू ओतायचं. आता मोठय़ा पळीने सतत ढवळत राहायचं. पंधरा मिनिटांच्या आत पळीवाढा गोळा जमून येतो. एका ट्रेमध्ये तिळाच्या तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण गरम असतानाच ओतून थंड करत ठेवायचं. थंड झालं की फ्रिजमध्ये दोन तास सेट व्हायला ठेवायचं. बाहेर काढून त्याच्या आयताकृती वडय़ा पाडायच्या. या वडय़ा अशाच खायला सुरेख लागतात. डुगडुगणाऱ्या, तरीही एकसंध. मी दोन मटकावल्या. पण चुंगने पुढे अजून एक प्रोसेस केली. एक कप मैदा, पाव कप पिठीसाखर, एक चमचा अमूल बटर, किंचित मीठ आणि एक कप दूध घेऊन चांगलं ढवळून घ्यायचं. आता हे तुकडे या मिश्रणात बुडवून, ब्रेड क्रम्समध्ये घोळवून उकळत्या तिळाच्या तेलात मंद आचेवर डीप फ्राय करायचे. वरून कुरकुरीत, आतून नरम असे तोंडात विरघळणारे मिल्क केक झटपट तयार. वेलची, दालचिनी किंवा कुठलाही एसेन्स नसल्यामुळे ते भारतीय किंवा पाश्चात्त्य न वाटता काहीतरी वेगळे असल्याचे जाणवतात.

Advertisement

चुंगच्या मते, अन्न म्हणजे निव्वळ भूक भागवायचं साधन नाही, तर ते करणं, खाणं आणि खिलवणं ही एक मोठी साधना आहे. एकटय़ाच्या स्वयंपाकासाठी त्याचा भारतातला महिन्याचा खर्च पंधरा ते वीस हजार रुपये होता. यात बाहेर खाण्याचे पैसे धरलेले नाहीत. तो दारू-सिगारेट घेत नसल्यामुळे तोही खर्च यात नाही. असा भरभरून खाणारा आणि खाण्यावर भरभरून प्रेम करणारा सडसडीत चुंग पुन्हा भारतात नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. कारण ‘I am missing India’ असं त्याचं म्हणणं. ‘इथली कुठली गोष्ट सगळ्यात जास्त मिस करतोयस?’ असं विचारल्यावर क्षणात उत्तर येतं- ‘धमाल, अतरंगी माणसं; मसाल्यांचे वास आणि आलं ठेचून घातलेला टपरीवरचा गोड-दुधाळ चहा!’

(छायाचित्रे : शर्मिला नाईक, लिन चुंग चिन)

Advertisement

The post चवीचवीने.. : तुकतुकीत appeared first on Loksatta.Source link

Advertisement