चवीचवीने.. : गणपतीच्यें ‘गॉड’शेंभूषण कोरगांवकर
गणपतीचे पाच दिवस हटकून शाकाहारी जेवणाचे. त्यामुळे तमाम मांस-मत्स्यप्रेमी जनता नाराज असली तरी माझ्यासारखे सर्वप्रेमी खूश असतात. कारण असंख्य मोसमी भाज्या, कापं, रायती, कोशिंबिरी, चटण्या यानिमित्तानं चाखायला मिळतात. फराळ आणि गोडधोड तर विचारूच नका. या सगळ्यात ऋषीची भाजी तर प्रचंड लाडकी. कारण ही एकच गोष्ट अशी आहे की जी संपूर्ण वर्षांत फक्त एकदाच बनते. घरी गणपती येत नसल्यामुळे गावी गेलो नाही तर शेजारी आणि मित्रांच्या घरीच आमचा गणपती साजरा होतो. गेली कित्येक वर्ष दुपारी ‘हायवे गोमंतक’फेम पोतनीस कुटुंबीयांकडे आणि रात्री पाल्र्याला गिरीश पटवर्धनकडे ही जेवणं ठरलेली. पोतनीसांकडे केळीच्या पानावर खास गोंयच्या पद्धतीचं आणि गिरीशकडे कोकणस्थी पारंपरिक. काकीचं खतखतं, मुगा गाठी, अंबाडीची भाजी, कापं आणि गिरीशकडची वाटली डाळ आणि मसालेभात म्हणजे अहाहा! हा एक दिवस असा आहे की मला किमान दोन पोटं असती तर किती छान असं वाटत राहतं. कारण इतरही अनेक घरी धावत्या भेटी द्यायच्या असतात आणि प्रत्येक घरी काही ना काही खासियत वाट पाहत असते. वीणा मुर्कीभावींच्या हातचं सुंडल, भारती पारिखचे छप्पनभोग, अमोल गायकवाडची ऋषीची भाजी, अमि कामदारच्या घरचे चटपटे स्नॅक्स आणि बाकीच्या तमाम घरांतून मिळणारे उकडीचे मोदक.. या अशा दीड दिवसातल्या असंख्य भेटी गेल्या काही वर्षांतल्या. लोक हौसेचे गणपती बसवत गेले आणि आमची घरं वाढत गेली.

Advertisement

लहानपणी मात्र या दिवसांत मी फक्त अमेंबल आणि जाधव या दोनच घरी असायचो. हे आमचे जुने शेजारी. त्यातून अमेंबलांचा गणपती एकच दिवसाचा. त्यामुळे तो दिवस माझा मुक्काम पूर्ण वेळ तिथेच. हे चित्रापूर सारस्वत समाजाचं मंगलोरी कुटुंब. मराठी लेखकांच्या वर्णनांमुळे मासेखाऊ सारस्वत आपल्याला माहीत आहेत. पण हे त्यांच्या परिघाबाहेरचे. पारंपरिकरीत्या शुद्ध शाकाहारी सारस्वत. त्यांच्यामध्ये गणपतीच्या आधी गौरीची पूजा होते. तिचा नैवेद्यही खास. त्यातल्या करंज्या (न्हेवऱ्यो) नेहमीच्या पारंपरिक आकाराबरोबरीनेच त्रिकोणी, चौकोनी, षटकोनी, गोल अशा वेगवेगळ्या आकारांत बनायच्या. लहानपणी त्या पाहायला आणि खायला भारी मजा यायची. त्यांच्या अळुवडय़ाही वेगळ्याच लागायच्या. कारण ते बेसनाऐवजी भिजवलेले तांदूळ आणि तूरडाळ वाटून लावायचे. शिवाय खोट्टे म्हणजे फणसाच्या पानात घालून वाफवलेल्या इडल्या, खोळंबो, घश्शी, उपकरी, सुक्कें, फोड्यों, पंचकदाय या सगळ्याची सौम्य, सुगंधी चव अजूनही जिभेवर आहे. आज मी पालेभाजी आवडीने खात असलो तरी त्या वयात ती जबरदस्तीने पोटात ढकलायची गोष्ट होती. पण अमेंबलांच्या नैवेद्यातली मिक्स पालेभाजी मला प्रचंड आवडायची. यावर आजी आणि आई दोघी वरवर खूश व्हायच्या; पण मागाहून वैतागायच्या. ‘त्यांच्या घराकडे जाव्न बरो आवडीन खाता..’ असं कुजबुजायच्या.

या सगळ्या जुन्या आठवणी जागवायला आणि त्यांच्या रेसिपी नोंदवायला मी परवाच त्यांच्या घरी गेलो. पपमा आणि चित्रा अमेंबल माझी वाट पाहत होत्या. ९१ वर्षांच्या मीरा अमेंबल म्हणजे पपमा या त्यांच्या घरच्या आधारस्तंभ. वडिलांच्या आईला ‘पपमा’ किंवा ‘अन्नम्मा’, आईच्या आईला ‘अम्मम्मा’ आणि पणजीला ‘पंजम्मा’ असे त्यांच्या भाषेत म्हणतात. सध्या वयपरत्वे पपमा काही करत नसल्या तरी ‘कधी कुठली रेसिपी विसरले की मी हिलाच विचारते,’ चित्रा म्हणाली. कोंकणीमध्ये सगळ्यांना ‘अरे-तुरे’ करायची पद्धत आहे. त्यामुळे इथे सासू-सासरे सगळेच एकेरी होऊन जातात. ‘पण खूप पूर्वी आमच्यात पण मोठय़ा माणसांना ‘तुम्मी’ म्हणायची पद्धत होती रे..’ चित्राने स्पष्ट केलं. ‘बोल, तुला तेव्हाचे कुठले कुठले पदार्थ आठवतात? आणि कुठल्या रेसिपी सांगू?’ एकेक रेसिपी ऐकताना जुने दिवस तर आठवलेच; पण त्यांच्या सहजतेने आणि साधेपणाने मजा आली. ‘पदार्थ चविष्ट होण्यासाठी भाराभार जिन्नस भसाभस घालायची गरज नसते,’ हे माझं मत पुन्हा एकदा पक्कं झालं.

Advertisement

कारात अंबाडे सुक्कें

(कारली-अंबाडीची सुकी भाजी)

Advertisement

चार मोठय़ा कारल्याच्या चकत्या करून त्यात मीठ घालून ठेवायचं. थोडय़ा वेळाने त्या पिळून घ्यायच्या. सात-आठ अंबाडी चेचून घ्यायची. या दोन्ही भाज्या कूकरला लावून एक-दोन शिट्टय़ा काढायच्या. तीन चमचे धणे, दोन चमचे उडीद डाळ, पाव चमचा मेथी आणि आठ सुक्या ब्याडगी मिरच्या हे जिन्नस कोरडे भाजून त्यात दीड वाटी ओलं खोबरं आणि हळद घालून सरबरीत वाटण करून घ्यायचं. मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करून त्यात हे वाटण घालून एक उकळी काढायची. मग शिजलेल्या भाज्या टाकून अजून एक वाफ. मीठ, गूळ घालून ढवळायचं.. भाजी तय्यार! ऐकायला साधी, पण चवीला भारी अशी ही रेसिपी वापरून इतर अनेक भाज्या बनतात. अंबाडी नसते तेव्हा वाटणात चिंच घालायची. (ही रेसिपी ऐकताच पुष्पाआत्तेच्या ‘उडदा-मेथी’ची आठवण आली. त्याबद्दल लवकरच.)

अमेंबलांच्या फोड्यों म्हणजे भाज्यांच्या भज्या तर कितीही गट्ट केल्या तरी समाधान व्हायचं नाही.

Advertisement

फोड्यों

शक्यतो मोसमी, लोकल भाज्या घेण्याकडे कल असतो. सुरण, रताळी, बटाटा, परवर, कंटोळी, कच्ची केळी, पिकलेली लांब केळी, कारली यातील मिळतील त्या पाच भाज्यांचे अर्धा सें. मी. जाडीचे काप करून घ्यायचे. त्यांना लाल तिखट, मीठ, हिंग चोळून थोडा वेळ ठेवायचं. याला पाणी सुटतं. ऐन वेळेस ज्वारी किंवा तांदूळ यापैकी जे सहज हाताशी येईल ते पीठ मिसळून तेलात भज्यांप्रमाणे तळून घ्यायचं.

Advertisement

‘बस्स.. एवढेच पदार्थ? सुरण खाजतो म्हणून चिंच वगैरे लावत नाहीत?’ मी विचारलं.

‘डीप फ्राय केलं की काही खाजत नाही,’ चित्रा म्हणाली, ‘सुरणाची एक वेगळी डिश आहे. त्यात कांदा असतो म्हणून गणपतीला करत नाही, पण एकदम टेस्टी लागते.’

Advertisement

सुरण कोसंबिरी

सुरणाचे अगदी बारीक तुकडे करायचे. कढईत सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. काही जण किसून घेऊन तो कीस तळतात. पण ते खूप तेलकट होतं. त्यामुळे तुकडे केलेले बरे. हे तळलेले तुकडे, अगदी बारीक चिरलेला कांदा, मीठ, ओलं खोबरं आणि ठेचलेल्या हिरव्या मिरच्या नीट मिसळून घ्यायचं. वरून लिंबू पिळायचं. हीच रेसिपी सुरणाऐवजी उडदाचे लाल पापड भाजून त्याचा चुरा वापरूनही करतात.

Advertisement

‘तुमच्यामध्ये कांदा, लसूण तसा कमीच वापरतात ना?’

‘हो. पण सॉन्ग, भुत्ती, तळासणी, तंबळी असे आमचे जे प्रकार आहेत त्यात मात्र कांदा किंवा लसूण पाहिजेच,’ चित्रा म्हणाली, ‘परत त्याच्यातही काही रूल्स आहेत. तू तळासणी खाल्लीयेस ना?’

Advertisement

‘ती ठेचलेली भाजी ना?’ आमच्याकडे पूर्वी स्वयंपाकाला येणारी विजू त्यांच्या घरी कित्येक वर्ष असल्यामुळे त्यांच्या पद्धतीच्या भाज्या अधूनमधून करायची. तिची ही भाजी झटपट व्हायची आणि फारच रुचकर लागायची.

तोंडलीची तळासणी

Advertisement

तोंडलीचे दोन्ही बाजूंचे देठ कापून ती अर्धवट ठेचून घ्यायची. त्यात मीठ, लाल तिखट आणि किंचित पाणी घालून कूकरला एक शिट्टी काढायची. तेलावर लसणीच्या पाकळ्या ठेचून फोडणीला टाकायच्या. त्या लालसर होताच शिजलेली तोंडली टाकून एक वाफ काढायची.

‘ओह.. म्हणजे या भाजीत हळद, हिंग, जिरं-मोहरी, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, खोबरं काहीच नसतं..’ मला आठवलं.

Advertisement

‘हो. लसूण असेल तर मग आम्ही बाकी काहीच घालत नाही. कारण लसणीचा फ्लेवर इतका स्ट्रॉंग असतो की बाकीच्या गोष्टींची चव दबली जाते. शिवाय पूर्वीच्या लोकांचं असं लॉजिक होतं की, लसूण आणि हळद दोन्ही ंल्ल३्र२ीस्र्३्रू आहेत. त्यामुळे दोन्ही एकत्र वापरले तर त्यांचा परिणाम कमी होतो.’

‘कमी होतो की नाही, माहीत नाही. पण एक असताना दुसरीचं काय काम?’ पपमा हसत म्हणाल्या, ‘कसलाच अतिरेक करायचा नाही आणि काहीच फुकट घालवायचं नाही, हे खरे आमचे रूल्स.’

Advertisement

मला हे नियम मनापासून पटले.

‘गोडामध्ये तुमच्याकडची ती गुळाची खीर आठवते आणि तो ऊस, केळी घातलेला प्रसाद पण एकदम मस्त लागायचा. आणि हो, ते छोटे छोटे अमेझिंग राइस बॉल्स..’ मी म्हटलं.

Advertisement

‘राइस बॉल्स म्हणजे उंडलंकाळ. घे लिहून.’

उंडलंकाळ

Advertisement

दोन वाटय़ा पाणी उकळायला ठेवायचं. त्यात दोन चमचे तूप व किंचित मीठ घालायचं. पाणी उकळलं की दोन वाटय़ा सुवासिक तांदळाची पिठी टाकून ढवळून घ्यायचं. झाकून पाच मिनिटं मंद आचेवर दमू द्यायचं. पीठ गरम असेस्तोवर हाताला तूप लावून त्याचे खेळायच्या गोटय़ांच्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. हे गोळे नॉनस्टिक पॅनवर थोडय़ाशा तुपात मंद आचेवर खरपूस तळून घ्यायचे. आता दुसऱ्या भांडय़ात दीड वाटी ओलं खोबरं आणि एक वाटी गूळ गरम करत ठेवायचा. गूळ वितळल्यावर वेलची पूड, तूप आणि हे गोळे घालून सगळं एकत्र मिसळून गॅस बंद करायचा. उकडीच्या मोदकाच्या साहित्यात एक वेगळाच आणि चविष्ट पदार्थ तयार!

‘खरं तर उंडलंकाळ आम्ही गणपतीला करत नाही. पातोळ्यों, न्हेवऱ्यो, पंचकदाय, कढयलेले हें सगळें गणपतीच्यें गॉडशें रे!’ पपमा नकळत कोंकणीत शिरल्या.

Advertisement

‘गॉडशें म्हणजे गोडधोड..’ चित्रा म्हणाली, ‘गोड आणि गूळ दोन्हीला आमच्या भाषेत ‘गॉड’ म्हणतात. त्यामुळे कुणालाही डायबिटीस झाला की तो आता खूप ‘ॅ िऋीं१्रल्लॠ’ झालाय असा ज्योक आमच्यात कॉमन आहे.’

मी हसलो, पण लगेच माझ्या वाढणाऱ्या पोटाची जाणीव जागी झाली. वाटलं, ‘गॉड’वर भक्ती असो-नसो, ‘गॉड फियरिंग’ असण्यातच दूरगामी फायदा आहे. आणि ‘भीतीवर मात करा’ अशी शिकवण तर सुरूच असते. नियमित व्यायामासोबत ही भीती आणि मात आलटून पालटून सुरू ठेवली तर सगळंच आटोक्यात राहील. कसलाच ‘अतिरेक’ करायचा नाही, हा आपला नियमच आहे, नाही का?

Advertisement

ता. क. मागच्या लेखाला नेहमीसारखाच भरघोस प्रतिसाद मिळाला. पण ‘चिकन चिंतामणी’ हे नाव ऐकून काहींच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. हे फार वाईट झालं. माझा तो हेतू नव्हता. हे नाव माझ्याच डोक्यातून आलं असावं असाही काहींचा समज झाला. वास्तविक तमिळनाडूमधल्या हिंदू समाजाचा हा एक पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. गूगल केल्यास ते समजू शकेल. उगाच कुठल्याही गोष्टीत ‘नस्ते’ अर्थ शोधायला मजबूर करणारी परिस्थिती निवळो, हीच यंदा गणपतीच्या चरणी प्रार्थना.

[email protected]

Advertisement

(छायाचित्रे- दीपक अमेंबल)

 

Advertisement

The post चवीचवीने.. : गणपतीच्यें ‘गॉड’शें appeared first on Loksatta.Source link

Advertisement