मुंबई9 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
भाजप महाराष्ट्रात दंगलीचे राजकारण करत असल्याच्या चंद्रकांत खैरे यांच्या टीकेवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तिखट पलटवार केला आहे. चंद्रकांत खैरे यांचे वय वाढले. पण त्यांची राजकीय अक्कल वाढली नाही. त्यामुळे ते भाजपवर बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे ते म्हणालेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा आरोप केला होता. भाजप महाराष्ट्रात दंगलीचे राजकारण करत आहे. यापूर्वी राज्यात 7 दंगली झाल्या. हे सर्व भाजपचे कारस्थान होते. मुस्लीम व दलित मतदार उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या मागे उभे राहू नये म्हणून भाजप त्यांना भडकावण्याचे काम करत आहे, असे खैरे म्हणाले होते.
चंद्रकांत खैरे यांच्या या टीकेला प्रवीण दरेकर यांनी तिखट प्रत्युत्तर दिले. दरेकर यासंबंधी म्हणाले, चंद्रकांत खैरे यांचे वय वाढले, पण त्यांची राजकीय अक्कल काही वाढली नाही. ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. देशात दलित व आदिवासींना मानसन्मान देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
चंद्रकांत खैरे आऊटडेटेड नेते झालेत. त्यांना खासदारकी हवी आहे. उद्धव ठाकरे यांच्या चरणी निष्ठा दाखविल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही. त्यामुळे ते असे बोलत आहेत, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
खैरेच दंगली घडवून जिंकले
चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी दंगली घडवल्या. मारझोड, हाणामारीही केली. त्यांच्यात कोणतीही नैतिकता नाही. संभाजीनगरच्या प्रत्येक निवडणूक त्यांनी दंगली घडवून जिंकली. त्यामुळे त्यांनी नाकाने कांदे सोलण्याचे काम करू नये, असेही दरेकर यावेळी म्हणाले.
शरद पवार वैफल्यग्रस्त, राऊतांचे डिपॉझिट जप्त होणार
विरोधक राज्यात ईडीचे सरकार असल्याची टीका करतात. पण ई म्हणजे एकनाथ शिंदे व डी म्हणजे देवेंद्र फडणवीस हे दोघेही विकासाचे राजकारण करतात. यामुळेच दुसऱ्या पक्षातील नेते आमच्याकडे येत आहेत. शरद पवार वैफल्यग्रस्त झाले असून, ते भेदरले आहेत. संजय राऊत यांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असेही प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले.