अहमदनगर5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सलग दोन आठवड्यांपासून अकोले तालुक्यातील आदिवासी भागांतून पाठ फिरवलेल्या पावसाने दोन दिवसांपासून पावसाने पुनरागमन केले. आता जोरदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजता संपलेल्या २४ तासांत भंडारदरा धरण पाणलोटाच्या घाटघर येथे तब्बल ७ इंचाहून अधिक म्हणजेच १८८ मिलिमीटर पाऊस झाला.
१ जून २०२३ पासून एकूण ५ हजार ३५८ मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे आदिवासीबहूल भागांतून शेतांमधील सुकू लागलेली भातशेती व खाली माना टाकू लागलेले भातपीक भात खाचरातून पाणी साचून ते वाहते झाल्याने तरारून उठली. पावसामुळे भातपिकांना संजीवनी मिळाली असून आदिवासी शेतकऱ्यांसह शेतमजुरांना दिलासा मिळाला.
भंडारदऱ्यातील पाणलोटात पावसाचे पुनरागमन झाले असले तरीदेखील घाटघर परिसरात झालेल्या पावसाच्या तुलनेत इतरत्र पावसाचे प्रमाण कमीच राहिले. मागील २४ तासांत रतनवाडीत १७ (एकूण ४८३५) मिलिमीटर, पांजरे येथे २० (एकूण ३७७०) मिलिमीटर, वाकी येथे १० (एकूण २२९१) मिलिमीटर, भंडारदरा २३ (एकूण ३०७१) मिलिमीटर व निळवंडे धरणावर २९ (एकूण ४८१) मिलिमीटर पाऊस झाला. तर परिसरातून बंद पडलेले धबधबे पुन्हा कोसळू लागले. सह्याद्रीमधील डोंगरावरून शेकडोंच्या संख्येत धबधबे ओसंडून वाहत आहेत. हे विलोभनीय निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
शुक्रवारी भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर परिसरातून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरूच असून भंडारदरा जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. हरिश्चंद्रगड परिसरात मुळा खोऱ्यातही पावसाचे कमबॅक झाले. यामुळे राहुरीच्या मुळा धरणात कोतूळ जवळील मुळा नदीपात्रातून ६६१ क्युसेकहून अधिक विसर्ग सुरू आहे. मुळा धरणाचा पाणीसाठा २१०७३ दलघफू ८१.०५ टक्के झाला असून धरणातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान देण्यासाठी कालव्यांतून १७०० क्युसेकने विसर्ग देण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १०५८६ दलघफू ९५.९० टक्के ठेवण्यात आला असून निळवंडे धरणाचा पाणीसाठा ६८८८ दलघफू ८२.७९ टक्के असा ठेवण्यात येत आहे. निळवंडे धरणातून १६०० क्युसेकने ओव्हरफ्लोचे पाणी प्रवरा नदीपात्रातून ओझर येथील साठवण तलावात जमा होत आहे. तेथून कालव्यांतून १२०८ क्युसेकने भंडारदरा धरण लाभक्षेत्रात शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. आवर्षण प्रवण असलेल्या देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा १००४ दलघफूवर ९४.७२ टक्के पोहोचला. पण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार शुक्रवारपासून कालव्यांतून १५ क्युसेकने विसर्ग देण्यात येत आहे.