पुणे8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
“माझ्या मनात स. प. महाविद्यालयाच्या अनेक सुंदर आठवणी आहेत. अनेक चांगले मित्र, उत्तम शिकवणारे शिक्षक, अनेक अनुभव अशा विविध गोष्टी मला या महाविद्यालयाने दिल्या आहेत. आज झालेला हा सत्कार अतिशय हृदय, मनापासून आणि प्रेमाचा असा सत्कार आहे. घरी सत्कार होणे म्हणजे काय असते याची प्रचिती आज होत आहे, ” अशी भावना मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी व्यक्त केली.
शिक्षण प्रसारक मंडळी आणि स. प. महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असणारे फणसळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे झालेल्या सोहळ्यात शिक्षण प्रसाक मंडळी’चे अध्यक्ष सदानंद फडके यांच्या हस्ते फणसळकर यांना शाल, श्रीफळ व कॉफीटेबल बुक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षण प्रसाक मंडळी’चे उपाध्यक्ष गजेंद्र पवार, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड एस के जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, प्रभारी प्राचार्य सुनील गायकवाड, माजी प्राचार्य व माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष दिलीप शेठ, उपाध्यक्ष रमेश पाटणकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमात फणसळकर यांनी महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना फणसळकर म्हणाले, ” विद्यार्थ्यांनो तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, काहीही काम करा, पण काम असे करा की, तुमच्याबाबत आणि तुमच्या कामांबाबत इतरांना खात्री असली पाहिजे. तसेच एखादी गोष्ट आपल्याला शक्य होईल की नाही, अशी शंका मनात आणून कोणत्याही गोष्टीची सुरूवात करू नका. ती गोष्ट होणारच आहे, अशी खात्री बाळगून ती गोष्ट करा, त्यामध्ये निश्चितच यश मिळेल. आयुष्य घडवताना, प्रत्येकाचे काही उद्दिष्ट ठरविलेले असतात. तुम्ही उद्दिष्टांचा विचार न करता, तिथपर्यंत पोहचण्याचा जो प्रवास आहे, त्याचा आनंद घ्या.”
फडके म्हणाले, “माजी विद्यार्थ्यांचे यश हीच आमची खरी संपत्ती आहे. भरघोस यश देणारे माजी विद्यार्थी अखंडपणे महाविद्यालयात घडत राहो, अशी आम्ही महाविद्यालयाचे व्यवस्थापन म्हणून नेहमीच अपेक्षा करतो. आगामी काळात राष्ट्रसमोर जी संकटे येणार आहेत, त्यांना सामोरे जाणारे सक्षम अधिकारी तयार होणे हे गरजेचे आहे. असाच एक सक्षम अधिकारी म्हणून फणसळकर यांची ओळख आहे.. “
काही लोकं खुर्ची’ने मोठी होतात, तर काही लोकं खुर्ची’ला मोठे करतात, फणसळकर हे त्यापैकीच एक,असे अॅड जैन म्हणाले.
याप्रसंगी पोलीस दलाच्यावतीने माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी तर फणसळकर यांच्या प्राध्यापिका असलेल्या तारा थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.