औरंगाबाद21 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
अजंता-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ग्लोबल आडगाव’ चित्रपटातील कलाकार अशोक कानगुडे याला आपल्या कसदार अभिनयासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दितील हा पहिलाच पुरस्कार मिळाल्याचा अत्यानंद होत असल्याची प्रतिक्रिया अशोक कानगुडे याने ‘दिव्य मराठी डिजीटल’शी बोलताना दिली.
मराठवाड्यातील नावलौकिक प्राप्त निर्मिती संस्था सिल्वरओक फिल्म्स आणि इंटरटेनमेंन्ट प्रस्तुत मनोज कदम निर्मित व अमृत मराठे सहनिर्मित आणि आंतरराष्ट्रीय सन्मानप्राप्त लेखक-दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे लिखित व दिग्दर्शित ‘ग्लोबल आडगाव’ या सिनेमाची यावर्षी चित्रपट महोत्सवांमध्ये समीक्षक, प्रेक्षक आणि आयोजकांकडून चर्चा होते आहे.
बालपणापासून अभिनयाची आवड
गेवराई सारख्या छोट्या शहरातून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून अशोकचा प्रवास सुरू झाला. बालपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे शाळेमध्ये बालनाट्यामध्ये अशोक सहभाग घ्यायचा, त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात अशोकने वेगवेगळ्या एकांकिकेत, नाटकात काम करत आपली अभिनयाची आवड जपली. आणि मग पुढे चालून या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अशोकने नाटकातला अभिनयाचा मार्ग मालिकेकडे वळवला.
समीक्षकांकडून भरभरून कौतुक
सुप्रसिद्ध मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलं मधील अशोकची मंगळुची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली, त्याचबरोबर जय जय स्वामी समर्थ या मालिकेमध्ये देखील अशोकने दमदार अभिनय करत आपल्या भूमिकेचा ठसा उमटवला. आणि सध्या ग्लोबल आडगाव मधील अशोकने साकारलेला बजा प्रेक्षकांना प्रचंड भावतो आहे अशोकच्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडून, समीक्षकांकडून भरभरून कौतुक होते आहे.
या चित्रपटांमध्ये झळकणार
घर बंधू बिर्याणी, पाणी, एकलव्य, अवनी की किस्मत, दंगे, रुद्र, पारधाड या येणाऱ्या आगामी सिनेमांमध्ये देखील अशोकच्या महत्त्वाच्या भूमिका बघायला मिळणार आहेत. अजंता-एलोरा चित्रपट महोत्सवातील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेतेचा पुरस्कार हा अशोकच्या अभिनय प्रवासातील पहिला पुरस्कार आहे.
शेतीची झालेली दुर्दशा
ग्लोबल आडगाव या सिनेमामधून शेती, माती, ग्रामसंस्कृती त्याचबरोबर ग्लोबलायझेशनच्या विळख्यात अडकलेला शेतकरी, ग्लोबलायझेशनमुळे शेतीचे झालेले नुकसान अशा महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. शेतीची झालेली दुर्दशा सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षक बघत असताना प्रेक्षक आपल्या डोळ्यातील पाण्यांना थांबू शकत नाही.
यांच्या उपस्थितीत संपन्न
औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या आठव्या अजंता-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता समारंभ संगीत नाटक अकादमीच्या डॉ. संध्या पुरेचा, महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, ज्यूडी ग्लाडस्टोन गाडेकर, अविनाश ढाकणे, के एम. प्रसन्ना, धरित्री पटनायक, दीप्ती नाखले, सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नंदकिशोर कागलीवाल , ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक अशोक राणे, ज्ञानेश झोटिंग, संयोजक शिव कदम, नवीन बगाडीया, कमल सोनी, राजेंद्र राजपाल, निलेश राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शेती करत अभिनयाची आवड जोपासतोय
अशोक कानगुडे ‘दिव्य मराठी डिजीटल’शी बोलताना म्हणाले, मला हा पुरस्कार बज्या या पात्रासाठी मिळाला आहे. लेखक-दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे, सिल्व्हर ओक फिल्म्स अँड एंटरटेनमेंटचे निर्माते मनोज कदम, सह-निर्माते अमृत मराठे यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळेच मला हा पुरस्कार मिळाला. सिल्व्हर ओक नवीन चित्रपटांना बळ देण्याचे काम करत आहे. आत्तापर्यंत 40 नाटकांमध्ये काम केले मात्र अभिनयासाठी माझे हे पहिलेच पारितोषिक आहे. मी बीडच्या गेवराईचा असून सध्या शेती करत अभिनयाची आवड जोपासत आहे.