मुंबई31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
तरुणांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेऊन काही निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. तरुणांना विविध क्षेत्रांत रोजगार मिळावा, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण मिळावे म्हणून यंदा अधिक भर देण्यात आला आहे. विशेषतः ग्रामीण भागामधून जो शहराकडे येणारा ओढा आहे तो कमी व्हावा व ग्रामीण भागातच प्रशिक्षण व उद्योग-व्यवसायाला चालना मिळावी यासाठी भरीव प्रयत्न या अर्थसंकल्पात दिसून येतात. शासकीय सेवेत ७५ हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. अर्थव्यवस्थेतील सर्व घटकांना व महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक विभागांना सामावून घेण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. वस्त्रोद्योग आयटीआयपासून मधुमक्षिका पालनापर्यंत आणि ग्रामपंचायतींपासून महानगरपालिकेपर्यंत हा आवाका आहे.
आज रोजगाराचा कल पाहता खासगी क्षेत्रातून सर्वात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते. त्यासाठी उद्योगांना गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होणे ही या काळात अत्यंत महत्त्वाची बाब ठरत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या आणि शक्ती उपलब्ध आहे. त्यात अनेकांना रोजगार नाही; मात्र त्याच वेळी हजारो उद्योगांना लाखो कुशल तरुणांची आवश्यकता असूनही ते उपलब्ध होत नाहीत. ही दरी भरून काढण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण, आयटीआय दर्जावाढ इत्यादींचा समावेश या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे, हे चांगले आहे.
कुशल युवाशक्ती प्रशिक्षण हीच कौशल्याची गुरुकिल्ली. म्हणूनच असे संतुलन राखण्याचे कौशल्य युवकांमध्ये प्रशिक्षणातून येईल अन् रोजगारही सहज वाढेल.
कार्यसंस्कृती रुजवणे महत्त्वाचे महाराष्ट्रातील तरुणांमध्ये उत्तम कार्यसंस्कृती रुजण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. कामातील गुणवत्ता, कौशल्य, दृष्टिकोन, प्रामाणिकपणा या बाबी व्यक्तिमत्त्वात रुजण्यासाठी शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था यांना विशेष परिश्रम घ्यावे लागतील. सर्वसमावेशक विकासासाठी दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर अशा घटकांसाठी विशेष धोरण योजना व निधीची आवश्यकता भासेल. त्यामुळे अशा निधीत वाढ होणे अपेक्षित होते.
– } यजुर्वेंद्र महाजन प्रेरक व्याख्याता तथा दीपस्तंभ फाउंडेशन प्रमुख, जळगाव