‘मार्गिका’ या कथेत शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांमागील गंभीर समस्यांच्या अनेक बाजू दिसतात.
ओंकार फंड rtonkarfund@gmail.com
वसंत वाहोकार यांचा ‘चाफा लावीन तिथे लाल!’ हा कथासंग्रह विजय प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. त्यांच्या ‘वंशवेल’, ‘खेळिया रे’, ‘ओले हळदीचे ऊन’ या संग्रहांनंतर आता वाचकांच्या भेटीला ‘चाफा लावीन तिथे लाल!’ हा कथासंग्रह आला आहे. या कथासंग्रहाद्वारे वसंत वाहोकार यांनी ग्रामीण जीवनातील मानवी संबंध, त्यांतील ताणतणाव, कौटुंबिक समस्या, गावपातळीवर वेगाने घडणारे आर्थिक, सामाजिक बदल आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांसारख्या अनेक विषयांची यातील १६ कथांतून मांडणी केली आहे.
या कथासंग्रहात ग्रामीण परिसरात घालविलेला भूतकाळ आणि वर्तमान नागरी जीवन यांच्या कचाटय़ात अडकलेल्या मनुष्याचे दर्शन घडते. वसंत वाहोकार यांनी या कथासंग्रहात ग्रामीण भाग कशा प्रकारे आधुनिक होत आहे हे दाखविले आहे. खेडेगावातील घरांपर्यंत सिमेंटचे रस्ते झाले. गावोगावी अनेक कारखाने झाले. गावांचा भौतिक विकास झाला, परंतु नात्यांतली आपुलकी संपून स्वार्थ तेवढा उरला आहे. नागर जीवनातील माणूस आज आपल्याच विश्वात रमला आहे. त्याला स्वत:साठी आणि आपल्या माणसांसाठी वेळच नाही. सगेसोयरे, भावाभावांमध्ये दरी कशी निर्माण होते, त्यांच्यातील आपुलकीचा बंध कसा तुटतो, हे ‘विहीर’, ‘मार्गिका’ इत्यादी कथांमध्ये मांडले आहे. ‘मार्गिका’ या कथेत शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांमागील गंभीर समस्यांच्या अनेक बाजू दिसतात. शेतकरी आत्महत्या करून हे जग सोडून जातो खरा, पण त्याच्या कुटुंबीयांना पुढचं सगळं सहन करावं लागतं. मुलांचं शिक्षण, घेतलेलं कर्ज यांसारख्या
सर्व समस्यांना बाईला एकटीने तोंड द्यावं लागतं. या समस्यांवर उत्तम भाष्य ‘मार्गिका’ या कथेत केलेलं आहे. ‘अहो! अनंत अपराधी’ आणि ‘स्वप्नांवरून हत्ती’ या कथांमध्ये आई-वडील आणि मुलं यांच्यातील नात्यांचं वर्णन आहे. नवरा-बायको आणि त्यांच्यातील नात्याच्या गुंतागुंतीचं व तडजोडींचं दर्शन कथासंग्रहात घडतं.
कथासंग्रहात वाहोकरांनी ग्रामीण-शहरी प्रश्नांसोबत सामाजिक आणि आर्थिक बाबींनादेखील स्पर्श केला आहे. माणूस कधी कधी आर्थिक परिस्थितीसमोर हतबल होतो. समाज त्याचं मुळापासून शोषण करत असतो. ‘आले देवाजींच्या मना’ या कथेत या शोषणाचं दर्शन घडतं. देवामी हे पात्र शहरात राहत असूनसुद्धा त्याला गावाविषयी ओढ आहे. गावी त्याची जमीन, बांधलेलं मंदिर असतं. देवामी शहरात राहत असल्यामुळे त्याने हे सर्व सांभाळण्याची जबाबदारी सगेसोयरे व गावकऱ्यांकडे दिलेली असते. हे गावकरी व जवळचीच माणसं देवामीचा द्वेष व शोषण कशा प्रकारे करतात हे कथेत विस्ताराने वाचावयास मिळते. लैंगिक आकर्षणामुळे कमी वयातील मुलींवर त्यांच्या नकळत झालेले अत्याचार, वयात आलेल्या मुलींमध्ये झालेल्या शारीरिक बदलांकडे हपापल्यासारखे बघणाऱ्या पुरुषी कावेबाज नजरा, त्यातली विकृती हे सारं वसंत वाहोकरांनी अचूकपणे व सूक्ष्मतेने ‘पाड’ आणि ‘गढूळ’ या कथेत मांडलं आहे. वैचारिक कुचंबणा, त्यातून येणारे नैराश्य, पदरी पडलेलं दारिद्रय़, गावांचं बदलतं रूप, नात्यांतले वादविवाद, व्यवस्थेखाली दबलेला शेतकऱ्यांचा आवाज आणि त्यांच्या आत्महत्या तसेच यासारख्या आणखी बऱ्याच गंभीर मुद्दय़ांना ‘चाफा लावीन तिथे लाल!’ हा कथासंग्रह स्पर्श करतो.
वसंत वाहोकार यांच्या कथांचा विशेष म्हणजे त्यांनी कथा मांडताना घटनांची बांधणी अशा प्रकारे केली आहे की वाचकाचे कुतूहल आणि रोचकता वाढत जाते. परिणामी कथा हळूहळू वाचकासमोर फुलत, खुलत जाते. पात्रांचं चित्रण आणि कथांचं निवेदन इतकं प्रवाही आहे, की कथांतील भावभावना अधिकच तीव्रतेने जाणवतात. वाहोकरांनी मुख्यत्वे प्रमाणभाषेतच कथांचं निवेदन केलेलं आहे. पण पात्रांचे संवाद मात्र वऱ्हाडी बोलीतले आहेत. त्यामुळे कथा वाचताना वेगळीच मजा येते. मार्मिक पात्रचित्रणातून वऱ्हाडातील माणसं आकार घेतात. परंपरेच्या जाचामुळे शारीरिक, मानसिक त्रास सहन करणारा माणूस, मानवी जीवनातील स्वार्थ, त्यातून जन्म घेणारी विकृती याचं लेखकाने सूक्ष्मपणे घडविलेलं दर्शन हे या कथासंग्रहाचं वैशिष्टय़ होय. यातल्या कथा वाचकांना अधिकाधिक विचार करण्यास प्रवृत्त करतात. संपूर्ण कथासंग्रह हा वाचकांसाठी एक पर्वणी आहे.
‘चाफा लावीन तिथे लाल!’ – वसंत वाहोकार, विजय प्रकाशन, नागपूर,
पाने- २४८, किंमत- ३५० रुपये.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.