गेले लिहायचे राहून : पारामृदुला भाटकर

Advertisement

मृदुला भाटकर या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती आहेत. प्रथम ११ वर्ष पुणे येथे वकिली केल्यानंतर त्यांनी १६ वर्ष शहर दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले. तसेच त्यांनी कोल्हापूर येथेही प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. मुंबई उच्च न्यायालयात १० वर्ष न्यायमूर्ती म्हणून त्यांचा कार्यकाल होता. ‘महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणा’च्या त्या अध्यक्ष असून ‘इंडियन लॉ सोसायटी, पुणे’ च्याही अध्यक्ष आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रं व मासिकांमधून कथा, ललित लेख आणि कविता लेखन के लं आहे. ‘कविता कोर्टातल्या आणि मनातल्या’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.

न्यायदानाचं काम अत्यंत जबाबदारीचं. सदसद्विवेकबुद्धीच्या आधारे कायदेपुराव्याचं विश्लेषण करणं ही या पदाची गरज. माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी ती निरपेक्षवृत्तीनं पार पाडताना तरल संवेदनशीलता कायम जपली. कोर्टात रोज घडणाऱ्या प्रसंगांतून मनावर उमटणाऱ्या तरंगांना त्यांनी कवितांचे शब्द दिले. अभिनेते रमेश भाटकर यांची पत्नी ही त्यांची दुसरी ओळख. एक यशस्वी वकील आणि पुढे न्यायमूर्ती म्हणून झालेली घडण, वाटेतले खाचखळगे आणि त्यातून बांधलेल्या खूणगाठी, आतापर्यंतच्या आयुष्यात आलेल्या विविध  अनुभवांना, मनातल्या पाऱ्याला शब्दरूप देणारं मृदुला भाटकर यांच्या ललित लेखनाचं हे  नवीन सदर दर पंधरवडय़ाने.

Advertisement

पाऱ्याच्या तापमापकाची जागा आता ‘डिजिटल थर्मामीटर’नं घेतलेली आहे.  पण  मला आठवतंय, माझ्या लहानपणी आम्ही काचेच्या निमुळत्या नळीत बंद केलेला पाऊण इंचाचा पाऱ्याचा फुगा असलेला थर्मामीटर वापरायचो. ताप असेल तर पाऱ्याची पुढे जाणारी काळी रेष बघायचो आणि ताप मोजायचो.  हा पारा आणि आपलं मन सारखंच!  नोकरी-शिक्षण-रीतीरिवाज-समाज या सगळ्या थर्मामीटर्समध्ये मन बंद करून ठेवायचं, की मग आपल्या जगण्याचा आलेख मोजता येतो. व्यवहाराच्या उष्णतेनं प्रसरण पावणाऱ्या मनात आजमावता येतो आपलाच त्या रेषेतला ताल आणि तोल!  लहानपणी एकदा थर्मामीटर लावून ताप पाहताना तो चुकून माझ्या हातातून निसटला आणि फुटला. तेव्हा एकाएकी राखाडी-चंदेरी रंगाच्या गोळ्याच गोळ्या माझ्या समोर पसरल्या. पारा कधी पोटात जाऊ नये, त्याची वाफही होते, तो विषारी असतो, असं सगळं बजावलेलं होतं, पण त्या चंदेरी गोळ्या दाबून बघण्याचा मोह अनावर होता. मग एक गोळी दाबली. ती फुटून तिच्या चार-पाच गोळ्या झाल्या, दुसरीही हातात धरण्याचा प्रयत्न केला तर तिच्याही गोळ्या झाल्या. मग खाली पसरलेल्या सगळ्या गोळ्या जवळजवळ सरकवून एकत्र केल्या, तर एक मोठ्ठा गोळा तयार झाला. मुळातच पाऱ्यानं हे असं निसरडं, पळणारं, ना पातळ-ना घट्ट असं का असावं? उदास, गूढ, राखाडी अन् शिवाय ओढ लावणारं चंदेरीही! अर्थात हे सारं काही थर्मामीटर फुटल्यानंतरचं..

 म्हणूनच तर आता मला लिहावंसं वाटतंय. तारेवर कसरत करत सदैव जपून तोल सांभाळणाऱ्याला जमिनीवर कधीतरी कोलांटउडय़ा माराव्याशा वाटतात ना, अगदी तसंच! सव्वीस वर्ष सतत निकालपत्रं लिहिल्यानंतर जरा ‘असंच’ लिहून पाहू या म्हणून लिहावंसं वाटतंय. न्यायाधीश हा त्याच्या सबंध कारकीर्दीत एकटा असतो, कारण त्याला समाजात मिसळता येत नाही. त्यामुळे त्या सर्वापासून दूर राहणं ही त्या पदाची निकड असते. अशा वेळेस काही दरवाजे नक्कीच बंद होतात. कधी घुसमटही होते. न्यायाधीश म्हणून काम करताना माझ्याही वाटय़ाला तो सामाजिक एकटेपणा आलाच. मी त्यातून मार्ग शोधला होता कवितेचा, मोकळं होण्याचा. नोकरीच्या निमित्तानं आयुष्यभर ज्याची संगत सोबत लाभली तो कायदा हा फक्त डोळ्यांनी नाही, तर तो बुद्धी आणि मनानंही वाचायचा.. त्या सगळ्या प्रक्रियेत मनात बंद केला गेलेला पारा पहायचा.. त्याला शब्दांनी स्पर्श करायचा.. म्हणूनच लिहायला घेतलंय मी..

Advertisement

मनुष्यप्राण्यांना मुळातच आपल्याकडे जे आहे ते इतरांना दाखवायला आवडतं. छोटय़ा बाळांनाही आपण सांगतो, ‘‘एकच दात आलाय, दाखव दात कुठाय?’’ किंवा ‘‘करा विठ्ठल-विठ्ठल’’, ‘‘टाटा करा!’’, ‘‘फ्लाइंग किस द्या!’’, ‘‘बाबा म्हणा, बाबा..’’ मग ते चिमुकलंही ते सगळं करतं आणि आपला दाखवण्याचा प्रवास सुरू होतो. थोडं मोठं झालं की खेळणी दाखवायची, नवा फ्रॉक, नवे बूट यापासून ते मिळालेली प्रशस्तिपत्रकं, पदवी, घेतलेली गाडी, दागिने, घर, मोबाइल, लॅपटॉप, माझं रूप, माझे सिक्स पॅक्स, माझे डोळे आणि त्यात मनसुद्धा आलंच की! मन तर आपण सारखं दाखवतो आणि लपवतो, जपूनही ठेवतो. केवढी तरी मोठ्ठी जागा म्हणजे मन! बहिणाबाईंनी म्हटलंच आहे,

मन एवढं एवढं जसा जवसाचा दाना

Advertisement

मन केवढं केवढं मन आभाळात माईना

इतकं अप्रतिम मनाच्या लवचीकतेचं वर्णन किती नेमकं पकडलंय. तर हे मनातलं कुठे कुठे उगवलेलं, सांडलेलं, दडलेलं खूप काही शोधायचा प्रयत्न म्हणून लिहायचंय..

Advertisement

‘‘मॅडम, तुमचा तर नाटकाशी काहीच संबंध नाही. मग तुम्हाला सरांची (अभिनेता रमेश भाटकर) नाटकं, चित्रपट यात फारसा रस नसेल..’’ हा रमेशशी लग्न के ल्यानंतरच्या गेल्या २६ वर्षांत मला हमखास विचारला जाणारा प्रश्न. प्रथम अशा स्वरूपाचा प्रश्न ऐकला की मला वाईट वाटायचं. कालांतरानं मी उत्तरादाखल केवळ हसायचे. कारण  खरं तर नाटक हे माझंही पहिलं प्रेम होतं. मला माझ्या वयाच्या १६ ते १९ या वर्षी केवळ थिएटर करायचं होतं. या नाटक वेडाविषयी पुढे ओघानं येईलच. अशा वेळी रमेश मला म्हणायचा, ‘‘मृदुला, अगं मी नाटकात काम करतो. पण तुम्ही न्यायाधीश/ वकील मंडळी तर प्रत्यक्ष नाटक जगता!’’ ते खरंच आहे. प्रत्येक खटल्यात, मग तो मालमत्तेबाबतच्या भांडणाचा असो, की व्यावसायिक कराराचा किंवा फसवाफसवीचा. त्यातलं नाटय़ उलगडत जाताना समोर येणारे प्रश्न, प्रत्येकाच्या वेगळ्या भूमिका, मुद्दे हे सारं काही आम्ही जगतोच की!  कधी न्यायाधीश हा दिग्दर्शक असतो, तर कधी तो असतो समीक्षक. अंधारातल्या मुद्दय़ांवर प्रकाश टाकणारा तो पडद्यामागचा कलाकार, तर कधी आवश्यक युक्तिवाद मनात येऊ देणारा आणि अनावश्यक युक्तिवाद मेंदूच्या बाहेर ठेवणारा डोअरकीपरही असतो. मुद्देसूद युक्तिवादाला मनातच टाळी देणारा, रटाळ युक्तिवादाला मनातच शिट्टी वाजवून थांबा म्हणणारा तो प्रेक्षकही असतो आणि लेखक तर तो असतोच! 

 ‘मेक बिलीफ’ या तत्त्वावर आधारलेलं नाटय़शास्त्र फारच वेगळ्या पातळीवर न्यायालयातही लागू होतं. न्यायसंस्था हीसुद्धा अशाच एका अमूर्त संकल्पनेवर उभी आहे आणि तो म्हणजे सर्वसामान्यांचा न्यायालयावर असणारा विश्वास! विश्वास हा फार बहुमोल असतो. तो जितका घट्ट असू शकतो, तितकाच तो तरलही असतो. प्रेक्षक नाटक-चित्रपटातील खोटी राणी, खोटा भिकारी, खोटा खून, खोटं प्रेम हे सगळं खरं मानतात. त्यांचा विश्वास असतो, की या अडीच-तीन तासांत हे सगळं खोटं आहे ते खरं मानायचं असतं.  न्यायदानामध्ये मात्र लोकांचा विश्वास जपावा लागतो. सत्य-असत्याचा आणि भास-आभासाचा खेळ तिथे रोजच खेळला जातो, पण लोकांचा विश्वास असतो न्यायव्यवस्थेवर. तो उडाला तर, पर्यायानं लोकशाहीचा पायाही खचेलच की!  रशियन नाटय़कर्मी स्टॅनिस्लॅव्हस्कीचं ‘नेव्हर लूज युअरसेल्फ ऑन द स्टेज’ हे महत्त्वाचं तत्त्व न्यायालयात वकिलाला आणि न्यायाधीशाला चांगलंच लक्षात ठेवावं लागतं. ‘जग ही रंगभूमी आहे’ या शेक्सपिअरच्या वचनाचा प्रत्यय या व्यवसायात पदोपदी येतो. तेव्हा या वेगवेगळ्या भूमिका जवळून पाहताना, किंबहुना त्याचा एक भाग असताना त्यातल्या घटना, त्यातली पात्रं, हेवेदावे, भावनाविष्कार या सर्वाचे वेळोवेळी काढलेले ‘क्लिक्स’ मनात कुठे कुठे दडून बसलेले आहेत. तेव्हा थर्मामीटर फोडून तो पारा थोडा मोकळा करावासा वाटतो आणि त्या पात्रांविषयी सांगावंसं वाटतं, कारण ते पात्र कदाचित तुम्हीसुद्धा असू शकता. आपण काढलेला एखादा फोटो फक्त एकटे आपणच पाहात नाही, तर तो आपण इतरांना दाखवतो. ते का बरं? जेव्हा एखादं चित्र कॅमेऱ्यात पकडलं जातं, तेव्हा त्या वेळेस तिथे मी हजर होते म्हणून मला ते दिसलं. इतरांना ते नाही बघायला मिळालं कारण ते नव्हते हजर तिथे तेव्हा. म्हणून मग तो फोटो आपण आताच्या भाषेत ‘शेअर’ करतो. इतर सगळे ‘आवडला’ किंवा ‘नाही आवडला’ असं कळवून व्यक्त होतात. पण तो फोटो सगळ्यांनाच दाखवावासा वाटतो. 

Advertisement

प्रत्येकाचे अनुभव प्रत्येकानं आपापल्या कॅमेऱ्यातून टिपलेले असतात. कोर्टकचेरी, न्यायप्रक्रिया, साक्षीदार, पक्षकार, वकील हा सगळा ११ वर्षांच्या वकिलीचा आणि २६ वर्षांच्या न्यायदानाचा प्रवास मला इतर वेळी सतत सोबतीस होताच आणि असतोच. त्या प्रवासाची खूप ‘क्लिक्स’ माझ्याकडे साठलेली, साठवलेली आहेत. ती दाखवावीशी वाटली म्हणून तुमच्याबरोबरचा यापुढे संवाद. मी काढलेले, वेगवेगळ्या घटनांचे, माणसांचे आणि हो, पारदर्शक-अपारदर्शक भावनांचेही फोटो आणि त्या फोटोंचं हे प्रदर्शन..

chaturang@expressindia.com

Advertisement

The post गेले लिहायचे राहून : पारा appeared first on Loksatta.Source link

Advertisement