गेले लिहायचे राहून.. : दूर जाताना..मृदुला भाटकर

Advertisement

काही पतीपत्नींचं बऱ्याच अंशी चांगलं पटतं. तर खूप जण आयुष्यभर जमवून घेतात. काही जणांमध्ये मात्र घटस्फोटाला पर्याय दिसत नाही. घटस्फोट टाळून जमतंय का पाहावं, तर प्रत्येक वेळी तेही शक्य नसतं. वकिलाकडे येणारा असा प्रत्येक माणूस गोंधळलेला. त्याला आपलं ऐकून घेणारं, निर्णयात मदत करणारं कुणी हवं असतं. घटस्फोट या गुंतागुंतीच्या विषयावरच्या अनुभवांचा हा भाग पहिला.

ती तिच्या आई-बाबांबरोबर रडतच आली होती. आई-बाबा, विशेषत: आई खूप चिडलेली. साहजिकच होतं ते. ते दोघंही मोठय़ा अधिकारावर, सामाजिक प्रतिष्ठा असलेले होते आणि त्यांच्या मुलीला जावयानं चार दिवसांपूर्वी एक कानाखाली लगावली होती. या मुलीला चार वर्षांचा मुलगाही होता.

Advertisement

‘‘हे असं मारणं- म्हणजे हिंसा आमच्या संस्कारात बसत नाही. आज एक थोबाडीत मारली, उद्या तो आणखीन पुढे जाऊन तिचा गळा दाबेल.. हे संपणारं नाही.’’

‘‘मला वाटतं तुम्ही त्याला ताबडतोब घटस्फोटाची नोटीस पाठवा.’’ कोर्टात वकिलांना दोन प्रकारची माणसं घटस्फोटासाठी आढळतात. एक म्हणजे ‘घटस्फोट घेऊ का?’ असं विचारणारी आणि दुसरी म्हणजे घटस्फोट घ्यायचाय, तर कसं काय पुढे जायचं, हे विचारणारी. पहिल्या प्रकारच्या व्यक्तींना खरंतर समुपदेशनाची गरज असते. त्यांचा निर्णय झालेला नसतो. तळय़ातमळय़ात असतात. ते स्वाभाविकही आहेच. कारण हा मोठा निर्णय असतो. पण कोणताही वकील तुम्ही घटस्फोट घेऊ नका किंवा घ्याच, हा सल्ला नाही देऊ शकत. कशा प्रकारे, कोणत्या कारणाखाली घटस्फोट होऊ शकतो हे मात्र वकील सांगतात, त्या त्या धर्माप्रमाणे योग्य तो सल्ला देऊन कार्यवाहीही करू शकतात. पण घटस्फोट घ्यायचा की नाही, हा निर्णय सर्वस्वी त्या दांपत्याचा असतो. वकील वेगवेगळे पर्याय सुचवू शकतो.

Advertisement

‘‘मला हिच्याशी जरा बोलायचंय. तुम्ही जरा बाहेर बसता का?’’ मी तिच्या आईवडिलांना सांगितलं. तिचे आईवडील बाहेर गेले तशी ती आणखीनच रडायला लागली. ती सतत एकच गोष्ट बोलत होती की, ‘‘He slapped me.  How could he?’’

मी तिला या घटनेबद्दल पूर्ण सहानुभूती दाखवून त्याचं कृत्य वाईटच आहे असं सांगितलं. मग हळूहळू लग्नाविषयी, संसाराविषयी बोलतं केलं. नेमका प्रश्न कळायला हवा होता. तेव्हा लक्षात आलं, की त्याला गेली दोन वर्ष ‘यलो मॅगझिन्स’ (पॉर्न) बघायची सवय लागली होती. (तेव्हा मोबाइल नव्हता). तो तिच्याकडे दुर्लक्ष करत असे. त्यावरून होणारी भांडणं आणि काही दिवसांपूर्वी त्यानं हात उगारण्यापर्यंत पोहोचलेलं भांडण. तिच्याबरोबरच्या संपूर्ण संवादात माझ्या हे लक्षात आलं, की ती दुखावली गेली होती. तिच्या मनात त्याच्याबद्दल चीड नव्हती. तिला घटस्फोट मनातून नको असावा, असा माझा कयास. मी तिला सांगितलं, की तुझ्या परवानगीनं मी तुझ्या नवऱ्याशी बोलू का? (म्हणजे घटस्फोट दोघांच्या संमतीनं होईल.) तिनं होकार दिला. मग मी त्याच्याशी बोलले. त्यानं मान्य केलं, की थोबाडीत मारणं चूक होतं आणि त्याला या कृत्याचा पश्चात्ताप होतोय. त्याला ‘यलो मॅगझिन्स’ बघायला फार आवडत होतं, पण त्याचं त्याच्या बायको आणि मुलावर प्रेम होतं. त्याला घटस्फोटाचा निर्णय ऐकून धक्काच बसला. तो त्याच्या सवयी बदलायला तयार असल्याचं त्यानं सांगितलं.

Advertisement

तिची माफी मागावी असं त्याला वाटत होतं. पण तिला तिचे आई-बाबा एकटीला त्याला भेटू देत नव्हते. मी तिला आमच्या भेटीचा वृत्तांत दिला. ती मला सतत एकच म्हणत होती, की ‘‘मॅडम, त्याच्याबरोबर मी राहाणार नाही. कारण त्यानं मला थोबाडीत मारलीय.’’ तिला हे कबूल होतं, की याआधी त्यानं तिला कधीच मारलं नव्हतं. माझ्या लक्षात आलं, की तिच्या डोक्यात तिच्या आईवडिलांनी हे असं मारणं म्हणजे घटस्फोटासाठीच जायला हवं हे पक्कं बसवलं होतं. शेवटी मी रमेशची (माझ्या नवऱ्याची) माफी मागून तिला सांगितलं, की ‘‘तुला मी एक खासगी, माझ्याबाबतची गोष्ट सांगते. मलासुद्धा एकदा रमेशनं कानाखाली लगावली होती.’’

‘‘Oh my God!  Unbelievable!’’

Advertisement

(कारण आम्ही बोलत असताना मध्येच येऊन रमेशनं -एकदा आम्हाला कॉफी विचारल्याचं तिनं पाहिलं होतं.)

‘‘Yes,  unfortunately he did it.’’

Advertisement

‘‘Then what you did?’’

‘‘मी त्याला क्षमा केली.’’

Advertisement

‘‘Is it?’’

‘‘Yes’’

Advertisement

‘‘Did he ever do it again?’’

‘‘No. Never! We continued to live happily.’’

Advertisement

ती एकदम विचारात पडली. तिनं आणि तिच्या नवऱ्यानं एकत्र माझ्याच ऑफिसमध्ये भेटावं असं ठरलं. त्यांना एकमेकांना भेटून महिना उलटून गेला होता. भेटीनंतर ते दोघं जेव्हा खोलीबाहेर आले, तेव्हा छान वाटलं. मी तिला सुचवलं, की ‘ट्रायल’ म्हणून एखादा महिना एकत्र राहून पाहा. परत काही मारहाण झाली, तर मग घटस्फोटाचं पाहू.

मग ते दोघं त्यांच्या छोटय़ा मुलाबरोबर निघून गेले. पुढच्या दिवाळीत मला त्या दोघांकडून एक भेटकार्ड आलं. त्यात खाली त्या दोघांबरोबर त्या छोटय़ाचं अशी तीनच नावं नव्हती, तर एका छोटीचं चौथं नावही होतं! मी मात्र खोटं बोलून रमेशच्या नावानं ‘बिल’ फाडल्याबद्दल त्याला सॉरी म्हटलं आणि त्यावर तो फक्त मोठय़ांदा हसला.

Advertisement

माझी तेव्हा वकिलीची नुकतीच सुरुवात होती. अशीच एक ‘ती’ तिच्या ४ वर्षांच्या मुलासह अगदी हताश होऊन आली होती. नवरा तिरसट, संशयी, हुकूमशहा! तिनं विचारलं, ‘‘नवरा सुधारेल का?’’ तिला तिच्या माहेरचे सांगत होते, ‘‘सोड त्याला.’’ ती फारशी शिकलेली नव्हती. लेकाला तिचा लळा, तशी बापाचीही ओढ. नवरा लोकांशी नीट, पण तिच्याशी वाईट! तिच्या प्रश्नाचं माझ्याकडे काही निश्चित उत्तर नव्हतं. ती विचारत होती, ‘‘काय करू?’’ तेव्हा मला वाटलं, की तिनं त्याला काही दिवस संधी द्यावी. कधी, कसा तो विचित्र वागतो ते लिहून काढावं, मग १५ दिवसांनी पाहू. ती जाऊ की नको या विचारात नवऱ्याकडे गेली आणि दुसऱ्या दिवशी ती भयंकर बातमी घेऊन तिचा भाऊ आला.

‘‘मॅडम, त्यानं काल रात्री तिला मारून टाकलं. बाथरूममध्ये किचनच्या सुरीनं सात-आठ वेळा भोसकलं. ती मरून पडलेली अन् तिथंच तो रात्रभर बाथरूममध्ये रक्तात बसून होता. सकाळी कामवाल्या बाईनं पाहिलं..’’

Advertisement

मला प्रचंड धक्का बसला. वाईट याचं वाटलं, की तिला निर्णय घेता येत नव्हता, तिला थोडी मदत करायला हवी होती. तिला खरंतर वकील नाही, एक मैत्रीण हवी होती. तिचं दु:ख समजणारी, तिला घर सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी तिच्या बाजूला उभं राहणारी!

जसजशी वेगवेगळी माणसं भेटतात, वेगवेगळे प्रश्न, दु:ख यांची ओळख होते, तसतशी या क्षेत्रात परिपक्वता येते. कौटुंबिक प्रश्न, नात्यांचा गुंता, गुंफण हाताळायला जगाचं शहाणपण असलेल्या, अनुभवी व्यक्ती असणं गरजेचं असतं. म्हणूनच आज कुटुंब न्यायालयात अनुभवी व्यक्तींची आणि ज्येष्ठ जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक केलेली असते. प्रश्न समाजस्वास्थ्याचा असतो. समाज जर स्वस्थ असेल, तर तो जास्त कल्पक, उत्पादक, आनंदी असतो. म्हणून कुटुंब न्यायालयावर व त्यात काम करणाऱ्या न्यायाधीशांवर, समुपदेशन करणाऱ्यांवर फार मोठी जबाबदारी असते.

Advertisement

   लग्न हे दोन व्यक्तींचं साहचर्य असल्यामुळे ती ‘सोल प्रोप्रायटरशिप’ नाही, तर ‘पार्टनरशिप’ आहे. त्यातले निर्णय, जबाबदाऱ्या, सुखदु:ख दोघांनी वाटून घ्यायचं. काही जोडपी एकमेकांत मिसळून गेल्यानं त्या संसारात वेगळीच गोडी असते. पण प्रत्येक व्यक्ती अशी भाग्यवान नसते. काही जोडपी नात्यात समंजस राहून मनासारखा जोडीदार नसला तरी नातं सांभाळत व्यवस्थित संसार निभावतात, पण काही जोडपी मात्र जमवून घेऊ शकत नाहीत. त्यांना नाही आवडत मनाला मुरड घालून नातं सांभाळायला. त्याचं त्यांना ओझं होतं. त्यांनी वाकून राहाण्यापेक्षा ते फेकून का देऊ नये? आणि तो निर्णय योग्यही असतो. नात्यांमध्ये मुळात समजावं लागतं, की स्वत:ला नक्की काय हवंय? माझा आनंद, माझं सुख नक्की कशात आहे? स्वत:ला हे प्रश्न विचारून त्यांची खरीखरी उत्तरं शोधता आली पाहिजेत.

दोघांच्या संमतीनं घेतलेल्या घटस्फोटात कारणं कोणतीही असू शकतात. उदा. माझ्याकडे आलेल्या खटल्यांमध्ये ‘तिनं गाऊन घालावा की नाही’ या मुद्दय़ावरही ते दोघं दूर होण्याचा निर्णय घेतात! कधी हे जोडपं एकमेकांसाठी किती अनुरूप आहे, असा मनात विचार असतानासुद्धा त्या व्यक्तींचा घटस्फोटाचा निर्णय अमलात आणावा लागतो. हातात निकालाची प्रत घेऊन त्या वेळेस आनंदात कॉफी पिणारे ते दोघं पाहाताना ‘अरे, हे असंही असू शकतं’ असं शिकवतात. याउलट ‘माझ्यावर अन्याय झाला, मग त्याला किंवा तिला सुखासुखी का जगू द्यायचं?’ म्हणजेच ‘Running for the victim position’ अशा झापड लावलेल्या मनोभूमिकेतून खूपदा न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे खटला हे तिला किंवा त्याला छळण्याचंही साधन म्हणून वापरलं जातं.

Advertisement

लग्न करताना कुणाचीच परवानगी लागत नाही, पण तेच तोडताना मात्र कायद्याची परवानगी लागते. म्हणजेच लग्न ही सामाजिक स्वास्थ्यावर, दोघांच्या आर्थिक परिस्थितीवर, पुढच्या पिढीवर परिणाम करणारी घटना असल्यामुळे ‘घटस्फोट’ ही पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट असली, तरी तिला कोर्टाची मान्यता हवी असते. माझ्या अनेकदा लक्षात येतं, की माणसं स्वत:लाच नाकारत जगतात. म्हणजे ती काही दुसऱ्यासाठी त्याग वगैरे करत नसतात. तसं

त्याग करणाऱ्या, नातं सांभाळणाऱ्यांची एक वेगळीच ‘कॅटेगरी’ असते. पण जी ‘स्व’ नाकारणारी मंडळी असतात, त्यांना आपल्या खऱ्या रूपाची चक्क भीती वाटते किंवा ते आवडत नाही. मग स्वत:ला फसवून मनाचा प्रवास सुरूच राहातो. मनाला उघडंनागडं करून स्व-प्रतिमा आरशात कधीतरी पाहाणं गरजेचं असतं. एकूणच आरसा महत्त्वाचा! कारण तो प्रामाणिक असतो. कधी डोळे खोटं बोलत असतात, तर कधी मन!

Advertisement

chaturang@expressindia.comSource link

Advertisement