प्रतिनिधी | नाशिकएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात येत आहे. पोलिस ठाणे निहाय सराईतांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. शहरातील परिमंडळ १ मध्ये ३५ सराईतांना तडीपार करण्यात आले असून १०५ प्रस्तावित आहेत. परीमंडळ दाेनमध्ये २३ सराईतांना तडीपार करण्यात आले असून ४० प्रस्तावित आहेत. त्यात अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक प्रस्ताव आहेत. सिडको भागात व अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी लक्षात घेता, अंबड पोलिसांनी ५४ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारचे प्रस्ताव तयार केले असून यातील १२ प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. उर्वरित प्रस्तावांवर लवकरच कारवाई होणार असल्याने सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्राणघातक
हल्ला, हाणामारी, काेयत्याचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे अंबड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्याही करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही गुन्हेगारी नियंत्रणात येत नसल्याने अंबड पोलिसांनी दीड महिन्यात सामाजिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे व रेकॉर्ड वरील १२ गुन्हेगारांना तडीपार केले आहे तर २२ गुन्हेगारांचे तडिपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पोलिस आयुक्तांकडे पाठविले आहेत. १० गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकूण ३४ गुन्हेगारांचे तडीपार प्रस्ताव केले असल्याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली. पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. ४२ तडीपार प्रस्तावांमध्ये कोणाचे नाव आहे, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिडको, खुटवडनगर, उंटवाडी, कामटवाडे, डीजीपीनगर, चुंचाळे, अंबड लिंकरोड, अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत परिसर आहे. यात दोनपेक्षा जास्त गुन्हे असणारे गुन्हेगार तसेच सामाजिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे गुन्हेगार, रेकॉर्डवर असलेले गुन्हेगारांची माहिती जमा करून त्यांच्यावर तडिपारीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
परिमंडळ १ मधील पंचवटी, सरकारवाडा, म्हसरुळ, गंगापूर, भद्रकाली, आडगाव या सहा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाेन आणि त्यापेक्षा जादा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या १४० हून अधिक गुन्हेगारांची तडिपारीसाठी यादी तयार करण्यात आली आहे. यामधील ३५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून उर्वरित १०५ गुन्हेगारांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. – किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक
परिमंडळ २ मध्ये २३ तडीपार; ४० प्रस्ताव
सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड व देवळाली पोलिस ठाण्यांच्या अंर्तगत २३ सराईतांना तडीपार केले असून १९ प्रस्तावित आहेत. आणखी १८ गुन्हेगारांची चाैकशी करून त्यांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. यात सर्वाधिक अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. एकूण ४० प्रस्तावित आहे.- चंद्रकांत खांडवी, उपायुक्त, परिमंडळ दाेन