हार्दिक पांड्या नव्या साथीदारासह संघाचं नेतृत्व कसं करणार याची उत्सुकता गुजरात टायटन्सच्या चाहत्यांना लागली आहे. गुजरात टायटन्सचा संघ सोमवारी आयपीएल २०२२ मध्ये पहिला सामना खेळणार आहे. त्यांचा सामना हंगामातील दुसरा नवा संघ लखनौ सुपर जायंट्स यांच्याविरुद्ध होणार आहे. या सामन्याच्या माध्यमातून हार्दिक पांड्या आपल्या कर्णधारपदाच्या नव्या इनिंगच्या पदार्पणासाठी सज्ज आहे. याच दरम्यान गुजरात संघाने आपल्या उपकर्णधाराचीही घोषणा केली. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांनी उपकर्णधाराचं नाव जाहीर केलं.
भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू आणि मुंबई इंडियन्सला अनेक महत्वाचे सामने जिंकवून देणारा हार्दिक पंड्या आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मुंबईने रिलीज केल्यानंतर गुजरात टायटन्सने मेगा लिलावाच्या आधी हार्दिकला १५ कोटींमध्ये संघात रिटेन केले.
हार्दिकसोबतच गुजरातने अफगाणिस्तानी दिग्गज फिरकी गोलंदाज राशिद खान यालाही १५ कोटींमध्ये रिटेन केले. हार्दिकला गुरजातने कर्णधार म्हणून आधीच घोषित केले होते आणि आता राशिद खानला संघाने उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. या दोघांव्यतिरिक्त युवा शुबमन गिलला देखील गुजरातने रिटेन केले होते.
आयपीएलच्या या हंगामात चाहते राशिद खानेच प्रदर्शन पाहण्यासाठी उत्सुक आहेत. गुजरात टायटन्सच्या चाहत्यांना राशिदला त्यांच्या संघासाठी कमाल प्रदर्शन करताना पाहायचे आहे. टी-२० क्रिकेटमध्ये राशिद जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. पहिल्या सामन्यात गुजरातसमोर ज्या लखनऊ संघाचे आव्हान असेल, त्यांचे नेतृत्व भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल करणार आहे. उभय संघातील या सामन्यात हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्यातील संघर्ष पाहण्यासारखा असेल.