गद्धेपंचविशी : सखोल पोकळीतली स्वजाणीव|| सचिन कुंडलकर
‘‘ते तरंगते वय होते. कुणाहीमुळे मी ‘सिड्युस’ होऊ शकत असे. कुणाहीमुळे ‘इंप्रेस’ होत होतो. त्याच काळात बऱ्याचशा जवळच्या मित्रांनी ‘हिला विचारून सांगतो’ क्लबची मेम्बरशिप घेतली होती. मनामध्ये एक सखोल पोकळी तयार होऊ लागली. माझ्यातील एकाकीपणा सावकाश एक आकार घेऊ लागला. लिखाणाचे काम जोरात सुरू होते. त्यात कच्चेपण होते, पण त्यातले निर्भय अंगण आणि निवांतपण पोषक होते.  शारीरिक आणि मानसिक हिंसेचा अनुभव घेत असताना याच काळात संगीतातल्या सखोल शारीर जाणीव असलेल्या आवाजांनी शांतही केले. मी अंतर्गत परस्परविरोधी विचारशैली असलेला माणूस आहे, ही माझी महत्त्वाची ओळख याच काळात मिळाली. त्याच काळातले आज भाबडे वाटणारे, अनेक क्षण आजही लख्खपणे आठवतात…’’

Advertisement

त्या सर्व वर्षांमध्ये मनामध्ये प्रेमाची भावना तयार व्हायला जागा नव्हती आणि वेळही नव्हता. मी सारखा प्रेमात पडलो आहे असे मला वाटत असले, तरी ते कोणत्याही अर्थाने प्रेम नव्हते. मन सारखे कशाने तरी किंवा कुणावरतरी भाळले जाण्यात गुंतलेले असे, ‘सिड्युस’ होण्यात. मी कुणाच्या चांगल्या हस्ताक्षरामुळे ‘सिड्युस’ व्हायचो. म्हणजे अस्ताव्यस्त हस्ताक्षरामुळे. कारण माझे हस्ताक्षर बाळबोध, सुबक होते. सिगारेटसमोर जळती काडी आणून ती पेटवायची चांगली लकब सापडलेल्या कुणाहीमुळे मी ‘सिड्युस’ होऊ शकत असे. मला इतकी साधीशी कारणे पुरत. सध्या वाढून बसल्या आहेत तशा मनाच्या कोणत्याच अटी तेव्हा नव्हत्या.

मी माझ्या फिल्म कोर्सच्या गाइडसोबत संध्याकाळी बारमध्ये बसलो होतो. आम्ही ग्लास रिचवत कशावरतरी वाद घालत असताना अचानक एक तरुण वेटर येऊन माझ्या गाइडला म्हणाला, ‘‘तुझ्यासाठी फोन आला आहे. बार काउंटरच्या मागच्या खोलीतून घे.’’

Advertisement

‘‘ कुणाचा आहे?’’ माझ्या गाइडने विचारले. नाव न घेता वेटर म्हणाला, ‘‘कुणाचा असणार?’’ मला पन्नास सालात घडणाऱ्या अमेरिकन गँगस्टर फिल्ममध्ये जाऊन बसल्यासारखे वाटले. ‘‘बसेल वाट पाहात,

दोन-पाच मिनिटांनी जातो.’’ माझा गाइड म्हणाला. वेटर त्याला डोळा मारून हसून निघून गेला. शांतपणे बिअरचा ग्लास संपवून माझा गाइड फोन घ्यायला गेला. जाताना त्याने बार काउंटरवर बसलेल्या एकाची टोपी खाली पाडली आणि एकीच्या डोळ्यावरून गॉगल काढून तिला तिचे डोळे किती सुंदर आहेत हे सांगितले. मला असा तिसऱ्याच जागी चौथ्या कुणाचा फोन कधीच आला नव्हता. आमच्या शहरात असे डोळे मारून गोष्टी पेलून नेणारे वेटर नव्हते. त्या दिवशी मी एकाच वेळी पाच-सहा जणांच्या प्रेमात पडून हॉटेलवर परत आलो आणि आपण नक्की कुणामुळे इंप्रेस झालो आहोत हेच मला कळेनासे झाले. असे ते तरंगते वय होते.

Advertisement

पंचविशीत येताना मला चित्रपटाच्या क्षेत्रात उमेदवारी करायला लागून पाच-सहा वर्षे झाली होती. मी खाण्यापिण्याची बिले, प्रवासाची तिकिटे आणि हवी तेवढी पुस्तके विकत घेण्याइतके पैसे कमवत होतो. खूप लहानपणापासून सोबत असलेले बरेचसे जवळचे मित्र तोवर सुटून गेले होते. त्यांनी ‘हिला विचारून सांगतो’ क्लबची मेम्बरशिप घेतली होती. त्या वेळी कमावत्या कोवळ्या पोरापोरींना गाठून गुंतवणुकीच्या (पैशांच्या) स्कीम्स गळी उतरवणारे मावश्या-मामे आजूबाजूला बक्कळ असत. त्यांच्या पैसे ‘मॅनेज’ करायच्या कल्पना ऐकून मला त्या वयात भोवळ येत असे. बऱ्याच वेळा आपण मेल्यानंतर आपले पैसे कुणालातरी मिळायची त्यात तरतूद असे. मुलांची शिक्षणे, मुलींची लग्ने, आपल्यानंतर मागे उरणारे, रडणारे बिचारे कुटुंब, असे ‘डार्क कॉमेडी’ सिनेमासारखे चित्र ते गुंतवणूकबहाद्दर मावश्या-मामे आपल्यासमोर उभे करत. आपण मेल्यानंतर कुणासाठी काहीही मागे ठेवायची गरज नाही, हे मला त्या वयातही कळत असे. आपण केलेल्या काळजीची गरज वाटेल असे माझ्या आयुष्यात तेव्हा कुणीही नव्हते. मला त्या वयात भरपूर पैसे कमावून आवडत्या गोष्टींवर उडवायचे होते. माझ्या आजूबाजूच्या तरुण मुली भरपूर कष्ट करून इतके पैसे कमवत होत्या, की त्या आमच्यासारख्या पुस्तकवाची मुलांना विकत घेऊन त्यांना त्यांच्या गाड्या चालवायला ठेवू शकल्या असत्या. त्या स्वतंत्र, हुशार आणि चलाख मुली अचानक वर्षातून एखाद्या दिवशी बांगड्या भरून भावांना ओवाळून त्यांना राखी बांधत तेव्हा मला ते प्रसंग फार भेसूर वाटत असत. कोण कुणाचे रक्षण करणार? आणि कोण कुणाला पोसणार? या विचारांचा काला झालेले, आमच्या आजूबाजूच्या ‘हिला विचारून सांगतो’ क्लबातील मुलांचे खुळे चेहरे मला पाहायला फार आवडत.

‘फिल्म इन्स्टिट्यूट’मध्ये शिकायला जाण्याआधी मी अतिशय ऊर्जितावस्थेत काम करणाऱ्या, प्रगतिशील विचारांच्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकांकडून चित्रपटनिर्मितीचे फार व्यापक आणि सखोल क्षण अनुभवले होते. त्या माणसांनी त्यांच्या स्नेहाने आणि जाणीवपूर्वक पोसलेल्या मोकळ्या विचारसरणीने संगीत, चित्रपट, चित्रकला, या सर्व प्रांतातील माझी जाणीव समृद्ध केली होती. मला चुका करायची मोकळीक देऊन त्यांनी पुन:पुन्हा मला त्यांच्या प्रकल्पांमध्ये सामावून घेतले होते. मी अंतर्गत परस्परविरोधी विचारशैली असलेला माणूस आहे, ही माझी महत्त्वाची ओळख त्या माणसांनी मला करून दिली. मला लिहायला नुसते प्रोत्साहन दिले असे नाही, तर माझे लिखाण योग्य संपादकांच्या हाती सुपूर्द करून त्याची योग्य ती काळजी नेहमी घेतली.

Advertisement

पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्युटमध्ये पाऊल ठेवण्याआधी मला जगण्याचे सर्व हक्क फक्त स्त्रियांनाच असतात असे वाटत असे. पण तिथे आत शिरल्यावर विद्यार्थ्यांनासुद्धा कसलेकसले हक्क असतात, याची जाणीव मला झाली. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये रुजलेल्या कडव्या डाव्या राजकीय विचारांची ओळख व्हायला सुरुवात झाली. महाराष्ट्रात अनुभवलेला व्यासंगी, सर्वसमावेशक आणि प्रागतिक असा ‘सेंटर लेफ्ट’चा राजकीय विचार आणि हा संपूर्ण एकांगी केरळी-बंगाली डावा विचार यात फार मोठी तफावत होती. त्या काळात वारंवार झालेली विद्यार्थी आंदोलने आणि चित्रपट रसग्रहणाची माक्र्सवादी विचारपद्धती या सगळ्या पचवायला अवघड अशा अनुभवांचा फायदा मला माझी स्वत:ची ओळख होण्यात झाला. आपण कोणत्याही एकांगी राजकीय विचारसरणीच्या आहारी जाऊ शकत नाही, हा आत्मविश्वास मनामध्ये आला आणि मी फिल्म स्कूल सोडायचे ठरवले. पण त्या प्रांगणातून बाहेर पडताच मला माझे लहानपण, आजूबाजूचा समाज आणि त्यांची राजकीय निष्ठा त्रास देऊ लागली. माझ्या मनामध्ये एक सखोल पोकळी तयार होऊ लागली. कोणत्याही एकांगी आणि रेडीमेड राजकीय भूमिकेला शरण गेले की एक प्रकारची सुरक्षितता मनाला असते. माझी ती सुरक्षितता कायमची हिरावून घेतली गेली, ही डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी मला दिलेली मैत्रीची फार मोठी खूण आहे. माझ्या आतील एकाकीपणा सावकाश आकार घेऊ लागला.

आर. डी. बर्मन यांच्या संगीतरचनेमध्ये वाद्यसंगीताचे मोठमोठे अंतराळ असतात, शब्द अजिबात नसलेले. ते कल्पक अंतराळ ऐकताना मला काय काय सुचत असे आणि मी भसाभसा सगळे कागदावर लिहून काढत असे. आता लिहितो त्यापेक्षा कितीतरी जास्त मी त्या वयात लिहीत असे. कारण मी लिहिलेले कुणीच कधीच वाचत नसे. ओधडबोधड का होईना, पण भरपूर लिहिल्याने कधीतरी अचानक डोळे पाणावत आणि श्वास मोकळा होत असे. एकटेपणाला सतत नीट आकार देऊन तो सुबक आणि ‘प्रॉडक्टिव्ह’ करण्याचे सध्या जे ज्ञान मला प्राप्त झाले आहे, ते तेव्हा नव्हते. मी कोणत्याही एका जागी स्वस्थ बसून त्या काळात सुखी झालो नाही. एखाद्या ठिकाणी जाऊन थोडेसे स्थैर्य येताच मला कुणीतरी कुकरच्या शिट्या मोजून गॅस बंद करायला घरात डांबून ठेवले आहे असे वाटे आणि मी त्या अनुभवातून स्वत:ची सुटका करून घेत असे.

Advertisement

तुमच्या कुटुंबाने त्यांच्या काळात सोय व्हावी म्हणून निर्माण केलेल्या मूल्यव्यवस्थेचा आजच्या काळात तुम्हाला कंटाळा येत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वत:चे काहीतरी ताजे आणि नवीन करायची दृष्टी सापडत नाही. मूल्यव्यवस्थेचा कंटाळा आला तरी आपली नवी जाणीव निर्माण व्हायला पुरेसे असते, त्यासाठी सतत विरोध किंवा कंठाळी भांडणे करायची गरज नसते.

चित्रपटासारख्या बहुपेडी आणि बहुआयामी माध्यमात फार लहानपणापासून कामाला लागल्याने मला तत्कालिकतेच्या मूल्याची ओळख होत गेली. चित्रपट करताना काम झाले की तुम्ही एकटे पडता आणि काम करायचे थांबलात की जग तुम्हाला बाजूला सारून विसरून जाते. दिसायला आणि जाणवायला कितीही ‘क्रिएटिव्ह’ काम वाटले, तरी ते अर्थकारणाच्या नियमावर चालणारे आणि वर्तमानकाळाची अप्रिय जाणीव सातत्याने करून देणारे अतिशय अवघड असे क्षेत्र आहे. त्यामुळे संगीत शिकणाऱ्या किंवा रंगभूमीवर काम करणाऱ्या माणसांना भूतकाळ, परंपरा आणि सामूहिक जगणे, याची जेवढी मदत होते, तितकी मदत चित्रपट बनवायला शिकणाऱ्या माणसाला होत नाही. आणि त्यामुळे भूतकाळ आणि परंपरेकडे पाहायची चित्रपट बनवणाऱ्या माणसाची दृष्टी नेहमी इतरांपेक्षा वेगळी असते.

Advertisement

मी विशीच्या वयात असताना आमच्या पिढीबरोबर देशाची सामाजिक रचना आणि अर्थव्यवस्था आमूलाग्र बदलांना सामोरी जात होती. दरवाजे शांतपणे उघडले जात होते. नुकतेच सामान्य नागरिकांच्या वापरासाठी इंटरनेट उपलब्ध झाले होते. शहरात जागोजागी ‘इंटरनेट कॅफे’ उघडली गेली होती. मोबाइल फोन अजून हाती आले नव्हते, पण इंटरनेटमुळे माझ्या पिढीला पहिल्यांदा खासगीपणा मिळाला. तोपर्यंत भारतीय कुटुंबांमध्ये कुणालाही खासगीपणा देण्याची अजिबात पद्धत नव्हती. अमर्याद चॅटिंग आणि डेटिंग साइटस, मोकळेपणाने हवी ती माहिती पुरवणारी सर्च इंजिन्स, या सगळ्यामुळे आपण कसे जगायचे, कुणासोबत जगायचे, कुठे जगायचे, या सर्व गोष्टींबद्दल निर्णय घेताना कुटुंबातील इतर कुणाच्याही ज्ञानावर किंवा सल्ल्यावर अवलंबून राहायची गरज संपली. त्यामुळे आमच्या पिढीचे फार भले झाले. आयुष्य सोपे अजिबात झाले नाही, पण बरेवाईट पर्याय समोर ठेवून त्यातून आपल्याला आवडेल तो पर्याय उचलून स्वीकारायची मनाला सवय लागली. चुकलेल्या पर्यायाची किंमत मोजावी लागते हेसुद्धा त्या वयात समजले.

माझ्या कामाचे बाह्यस्वरूप आणि त्यातील आंतरिक ताणेबाणे मोहित टाकळकर याला समजतात. आम्हा दोघांच्या विशीच्या वयात आम्ही कामाची उभारलेली ही समजूत आमच्यामध्ये न थांबता आणि इतर कुणालाही न जाणवता, शांतपणे चालू आहे. मी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले चित्रपट, मी लिहिलेल्या नाटकांच्या संहिता, आणि एकुलती एक अशी बाविसाव्या वर्षी लिहिलेली कादंबरी, या सगळ्या कामाच्या निर्मितीत, माझा ‘इन हाऊस एडिटर’ म्हणून मोहित मला कोणतीही दयामाया न दाखवता बारकाईने काम करत असतो. त्या विशीच्या वयात केलेले सुरुवातीचे काम आज पाहताना किंवा वाचताना त्यातले कच्चेपण जाणवले, तरी त्या कामातले निर्भय अंगण आणि निवांतपण आज ठरवले तरी पुन्हा स्वत:मध्ये उतरवता येणार नाही, हे नक्की वाटते. मी या विशीच्या वयामध्ये देशात आणि परदेशात कामासाठी किंवा विद्यावृत्ती मिळवून भरपूर प्रवास करू शकलो आणि या वयात मला पुस्तकांचा खासगी संग्रह करून तो वृद्धिंगत करायची सवय लागली याचा आज मला फार आनंद होतो. प्रवास आणि वाचन हे माझ्या सर्जक कामाचा फार मोठा भाग आहेत.

Advertisement

याच वयात मी सर्वप्रथम दुसऱ्याकडून झालेली निर्दय शारीरिक हिंसा आणि नात्यातील विश्वासघात याचे अनुभव घेतले. अजूनही कधीतरी ते दिवस आठवून मला झोपेतून अचानक जाग येते आणि आपण आता वेगळ्या परिस्थितीत शांत आयुष्य जगतो आहोत या भावनेने बरे वाटते. या वयात मी माझे घर आणि माझे स्वयंपाकघर एकट्याने उभे करून ते नीट चालवायला शिकलो. शारीरिक आणि मानसिक हिंसेचा अनुभव घेत असताना त्या वयात माझी संगीत ऐकण्याची जाणीव बदलली. लहानपणापासून कानावर पडत असलेले माझ्या मातृभाषेतील शहरी संस्कृतीचे साखरपाक संगीत माझ्या मनाचे पोषण करेनासे झाले. मला या काळात सखोल शारीर जाणीव असलेल्या आवाजांनी शांत केले. केसरबाई केरकर, किशोरी आमोणकर, माधुरी पुरंदरे, बेगम अख्तर, लिओनार कोहेन, स्टिंग, मुकुल शिवपुत्र, नीना सिमोन, उस्ताद आमिर खाँ साहेब यांच्या आवाजाने मनाला लेप लावला जाऊ लागला. तुम्ही पुरेसे दुखावले गेला आहात ना, याची वाट आरती प्रभूंची कविता आणि महेश एलकुंचवारांची लेखणी पाहात असते. तुम्ही दुखावून अंधारात लोटले गेलात की मग त्या दोघी तुम्हाला भेटायला येतात आणि तुमच्या दारावर बाहेरून एक फुली मारून जातात, असा  माझा अनुभव आहे.

आज आठवताना भाबडे वाटले, तरी त्या वयातले हे काही क्षण; जे माझ्यासाठी फार मोलाचे आहेत. आजही शांतपणे समुद्राकडे पाहात बसलो असेन तर मला हे सगळे क्षण लख्ख आठवतात… आता या काळात कोणत्याच प्रसिद्ध माणसाविषयी काहीच न वाटायचा कोरडेपणा अनुभवाने अंगात आला आहे. वयाच्या विशीत तो नव्हता.

Advertisement

– महत्त्वाचा फ्रेंच दिग्दर्शक लुई माल याचा ‘एलेव्हेटर टू द गॅलॉज’ हा चित्रपट संपून दिवे लागतात आणि त्या चित्रपटाची नायिका- सुप्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री जान मरो आमच्या पुढील रांगेत बसलेली उमेश कुलकर्णी आणि मला दिसते. हा एक स्वप्नवत अनुभव. ती सावकाश उभी राहते आणि कुणाच्याही लक्षात यायच्या आत शांतपणे दिल्लीतील त्या सभागृहाबाहेर चालत निघून जाते. आम्ही दोघे नुकत्याच कोऱ्या झालेल्या पडद्याकडे एकदा आणि पाठमोऱ्या तिच्याकडे एकदा असे खुळ्यासारखे पाहात बसतो…

– मनाने अतिशय प्रेमळ छायाचित्रकार

Advertisement

गौतम राजाध्यक्ष त्यांच्याकडील स्मिता पाटीलचे पोट्रेट मला भेट देत आहेत. त्यांच्या घरी दुपारी चहा घेत ते मला सांगत आहेत, की मराठी नट्यांना कपडे आणि मेकअपची जाणीव अजिबात नसते… अतिशय चुकीच्या लिपस्टिक निवडून लावण्यात मराठी नट्या पटाईत असतात. त्याला अपवाद एकच तो म्हणजे माधुरी दीक्षित. तिला सगळे फार चांगले कळते. असे म्हणून ते मला माधुरीचे त्यांनी काढलेले निवडक फोटो दाखवतात. ‘‘मी घेऊ का यातला एक?’’ असे मी विचारताच, ‘‘आला मोठा शहाणा! ’’ असे मला सुनावतात. स्मिताचे सुंदरसे पोट्रेट  घेऊन मी त्यांच्या त्या देखण्या घरातून बाहेर पडतो…

-‘साजणवेळा’. कवी ग्रेस यांच्या कवितांवर आधारित आनंद मोडक यांनी संगीत दिलेला कार्यक्रम. माधुरी पुरंदरे ‘दीप पाजळले नेत्री- गात्री सजविली शेज’ ही कविता गाऊ लागतात. हा आवाज आणि हे गाणे आता यापुढे कधीही मनातून निघून जाणार नाही. ते आपल्याआत कोरले जाते आहे, याचा अनुभव येतोय…

Advertisement

– ‘कोबाल्ट ब्लू’ची पहिली प्रत ‘मौज’ प्रकाशनाकडून आली आहे. ते कागदी पाकीट उघडताना माझे हात थरथरत आहेत…

– सोनाली कुलकर्णी माझ्या पहिल्या फीचर फिल्मच्या लुक टेस्टसाठी तयार होऊन कॅमेऱ्यासमोर येऊन शांतपणे उभी राहिली आहे…

Advertisement

@sachincobaltblue

 

Advertisement

 

The post गद्धेपंचविशी : सखोल पोकळीतली स्वजाणीव appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement