गद्धेपंचविशी : भक्कम पायावर तोललेलं आयुष्य!|| अरुण नलावडे

Advertisement

आधी द्वाड, मस्तीखोर आणि नंतर राडेबाज अशी ओळख झालेल्या मला आयुष्य घडवण्याचा कोणताही रस्ता समोर स्पष्ट दिसत नव्हता. अशा काळात आधी माझे वडील, मग संघाच्या शाखेतील वातावरण आणि नंतर बायको अंजली, यांनी माझ्या विचारांना चालना दिली आणि मी मार्गावर आलो.  भीतीच्या आणि अडचणींच्या काळात माझ्यातील माणसानं मला सुरक्षा दिली आणि आजूबाजूला जगणाऱ्यांनी मला शिकवून मोठं केलं. पण त्या सगळ्याचा पाया होता ती माझी ‘गद्धेपंचविशी’…              

‘गद्धेपंचविशी’चा सुरुवातीचा काळ हा खरं तर एखाद्याचं ‘करिअर’ घडण्याचा. विशीच्या आधीच करिअरच्या दृष्टीनं विचार करून पावलं टाकायला सुरुवात केलेली असते. माझ्या बाबतीत मात्र त्या वेळी यातल्या ‘गद्धा’ या शब्दावर अंमळ अधिकच जोर द्यावा अशी परिस्थिती होती. कारण वयाच्या सोळाव्या वर्षी ‘एसएससी’ झाल्यावरही करिअर कशात करायचं, असं काहीच माझ्या डोक्यात नव्हतं. सोळावं ते जवळजवळ सव्वीसावं वर्ष हा काळ मी लोकांच्या दृष्टीनं मस्ती करण्यातच घालवला. सुरुवातीच्या काळात तर ‘राडेबाज’ असंच मी माझं वर्णन करीन.

Advertisement

  माझे मित्रही तसेच होते. ४५ वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा बोरिवलीत राहायला आलो, त्या काळात मला जसे मित्र मिळायला हवेत तसे मिळाले नाहीत आणि जी संगत मिळाली त्यांच्याबरोबर मी शाळेत आणि घराच्या आसपास राडे करू लागलो. कशाचा तरी राग कशावर तरी काढणं, असं त्याचं स्वरूप असे. घरी खोटं बोलून सिनेमा बघायला जाण्यात मी पुढे होतो. सिनेमे पाहण्याचं व्यसनच होतं मला. परत आल्यावर मी गल्लीतल्या मित्रांना त्या सिनेमाची गोष्ट त्यात आणखी काही काल्पनिक गोष्टी पेरून साभिनय सांगत असे. तेव्हा मला असं वाटलंही नव्हतं, की या व्यसनाचा पुढे जाऊन आपल्याला काही उपयोग होईल. तसा रंगमंचावर मी आयुष्यात पहिल्यांदा उभा राहिलो तो शाळेत असताना. पण ते अगदी योगायोगानं. शाळेतल्या नाटिकेत मी ‘प्रॉम्प्टर’चं काम करत होतो आणि आयत्या वेळी नाटिकेत भूमिका करणारा मुलगा आजारी पडला. मी प्रॉम्प्टर असल्यामुळे मला नाटक पाठ होतं. मग सरांनी विचारलं, की ‘तू स्टेजवर उभा राहशील का?’ मी तयार झालो आणि नटाची जागा घेतली. त्यातही नाटकाच्या मध्येच माझा पायजमा सुटायला लागला! मला काय सुचलं ते आठवत नाही, पण पायजमा पायांत घट्ट धरून मी संवाद पूर्ण केले आणि फजिती टाळली. माझ्या प्रसंगावधानाचं कौतुक करत सर म्हणाले,

‘वा! तू चांगला नट होऊ शकशील!’ ही माझी नाटकाशी झालेली पहिली प्रत्यक्ष ओळख. पण त्यानंतर मला नाटक हा प्रकार आवडू लागला एवढं खरं. शाळेत असताना माझी मराठी भाषा खूपच चांगली होती. मराठी आणि हिंदीच्या परीक्षेत माझा नेहमी पहिला नंबर असे. गणितात मात्र मी खूप कच्चा होतो. अजूनही आहे. शाळेतल्या मस्तीखोर वर्षांमध्ये दरवर्षी दोन महिने मला ‘सुधारण्यासाठी’ गावी आजीकडे राहायला ठेवण्यात येई. अर्थात मी काही सुधारलो नाही. एकंदर माझं कसं होणार, याची खूपच चिंता माझ्या वडिलांना होती. द्वाड म्हणून शाळेत शिक्षाही खूपदा होत असे. शाळेतल्या बाई म्हणायच्या,‘तुझ्यात गुण आहेत, पण तू फुकट जाणार!’

Advertisement

याच काळात मी नाटिका लिहायला लागलो आणि बरोबरीच्या मुलांना घेऊन त्या बसवू लागलो. मला एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो- एकदा ‘अत्रे पाठांतर स्पर्धे’त मी ‘तो मी नव्हेच’ नाटकातल्या राधेश्याम महाराजांचा प्रवेश सादर करणार होतो. माझे वडीलही बरोबर आले होते. ते मला भाषण लिहायला मदत करायचे. कोणत्या शब्दांवर जोर द्यायला हवा, हातवारे कसे करावेत, तेही सांगायचे. स्पर्धेच्या ठिकाणी आणखी एक मुलगा तोच प्रवेश सादर करणार होता आणि त्याच्याकडे त्या भूमिकेचा पोशाखही होता, जो माझ्याकडे नव्हता. अर्थातच मी हिरमुसलो. माझे वडील म्हणाले, ‘मी त्या मुलाला विचारून पाहतो, की त्याचं सादरीकरण झाल्यावर थोडा वेळ तो तुला पोशाख घालायला देईल का?’ आणि तो मुलगा तयार झाला. मला त्या स्पर्धेत दुसरं बक्षीस मिळालं आणि त्याला नाही मिळालं. पण हा प्रसंग माझ्या मनात कोरला गेला. त्या मुलाला विनंती करणारे माझे वडील आणि स्वत:च्या यशापयशाचा विचार न करता मला पोशाख द्यायला तयार झालेला तो, हे मला तेव्हाही फार प्रेरणादायी वाटलं होतं. अशा लहान प्रसंगांमधूनही खूप शिकायला मिळतं आणि तसे प्रसंग नंतरच्या काळातही अनेक आले.      

गिरगावातही आम्ही दोन वर्षं राहिलो होतो, तेव्हा मी एक वर्षं रुपारेल कॉलेजला होतो. कॉलेज मी कसंबसंच करत असे, पण त्यातही दोन वेळा अभिनय स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षीस मिळवलं होतं. वडिलांचा माझ्या अभिनय करण्याला पाठिंबा होता, पण ‘छंद म्हणून काय ते कर’ असं एकूण घरातलं वातावरण. वडील ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे प्रचारक आणि कार्यकर्ते. वयाच्या १९-२० व्या वर्षी ‘संघा’च्या शिवाजी पार्क शाखेत मला पाठवण्यात आलं. तिथे मला शिस्त लागली. माझी संगत बदलली आणि त्या वातावरणाचा माझ्यावर चांगला परिणाम होऊ लागला. वर्तणुकीच्या बाबतीत संस्कार मिळू लागले. आधी माझा जो स्वभाव होता, जो राग माझ्या मनात एखाद्या प्रसंगानं निर्माण होत असे, ते पूर्णत: गेलं नाही. अजूनही राग येतोच, पण समजुतीची भूमिका घेणं मला हळूहळू जमायला लागलं.

Advertisement

१९७८-७९ च्या सुमारास, वयाच्या बाविसाव्या वर्षी मी ‘बेस्ट’मध्ये नोकरीला लागलो. तिथे प्रत्येक पातळीवर काम करत गेलो. विशेषत: नाटकाचा ‘प्लॅटफॉर्म’ मिळण्यासाठी ही नोकरी फारच उपयुक्त होती. ‘बेस्ट’तर्फे स्पर्धांमध्ये केल्या जाणाऱ्या नाटकांमध्ये मी काम करू लागलो, दिग्दर्शनही करू लागलो. शरद पोंक्षे, अविनाश नारकर, प्रशांत दामले,             प्र. ल. मयेकर हे सर्व ‘बेस्ट’मधलेच सहकारी. शरद पोंक्षे आणि अविनाश नारकर यांनी तेव्हा नाटकात माझ्या हाताखाली काम केलं होतं. आज ते अभिनेते म्हणून खूप मोठे झाले आहेत, हे बघून मला फार समाधान वाटतं. स्पर्धांमधली नाटकं ही शिकण्याची खूप मोठी संधी असते.  सर्व काही प्रेक्षकांसमोर घडत असताना नटांना दुसरी संधी मिळत नसते. त्यामुळे प्रसंगावधान महत्त्वाचं, ही गोष्ट मनात तेव्हाच ठसली. 

माझी आणि माझ्या पत्नीची,अंजलीची भेटही १९८३ मध्ये इथेच झाली. ‘बेस्ट’च्या नाटकात काम करण्यासाठी आम्ही बाहेरच्या कलाकारांना घेत असू, त्यात ती होती. तिच्यामुळे मी खूपच बदललो. ‘बेस्ट’ची नोकरी करतानाची १२-१३ वर्षं मला पूर्णवेळ नाटक करावंसं वाटत होतं, पण साशंकता होती. नोकरी सोडून देण्याचा आत्मविश्वास नव्हता. अंजली नोकरी करत होतीच. तिनं एका क्षणी सांगितलं, की ती नोकरी करेल आणि मी नाटक करावं. तेव्हा मी ते अमलात आणलं. तेव्हापासून अजूनही तीच माझी पहिली टीकाकार असते. माझं काम आवडलं की नाही, हे तीच आधी सांगते. मला विशीच्या काळात अशी दिशा मिळत गेली नसती, तर मी पूर्वी जे करत होतो, तेच आजही करत राहिलो असतो. आपण चुकीचं वागत असताना आपल्याला योग्य मार्गावर नेणं, योग्य दिशा देणं हे कुणीतरी करणं गरजेचं असतं. माझ्या बाबतीत ते प्रथम वडील, मग संघाच्या शाखेतील वातावरण आणि नंतर बायको,अंजली यांनी केलं होतं. अजूनही मनात अनेकदा साशंकता निर्माण होते, पण मी शांत आणि कायम जमिनीवर राहू शकतो ते हे सर्व अनुभवल्यामुळेच. आजूबाजूला अशी माणसं असणं आवश्यक असतं, जेणेकरून आपण सर्वज्ञ आहोत असा आपला समज होत नाही. पुढे मी माझ्या वागण्यानं खूप मित्र जोडले आणि एक चांगला स्नेहीसमूह तयार केला.

Advertisement

नाटकांमध्ये मला माझ्या सहकाऱ्यांकडून खूप शिकायला मिळालं. दिलीप जाधव, मच्छिंद्र कांबळी, सुधीर भट यांनी मला संधी दिली.      डॉ. श्रीराम लागू माझे फार आवडते अभिनेते होते आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटक मला त्यांच्याबरोबर करायला मिळालं. त्यातून खूप शिकता आलं. अभिनेत्री भक्ती बर्वे, सुहास जोशी यांच्याबरोबर काम केलं. प्रशांत दामलेबरोबर अनेक नाटकं केली. त्यात ‘चार दिवस प्रेमाचे’चे हजाराच्या आसपास प्रयोग झाले. ‘सुयोग’तर्फे नाटकाच्या अमेरिका दौऱ्याला जायला मिळालं. तिथे कामाची वेगळी शिस्त बघायला मिळाली.

मालिका आणि चित्रपटांमध्ये मी बराच नंतर आलो. ‘एक धागा सुखाचा’ ही माझी पहिली मालिका आणि ‘वादळवाट’ दुसरी. ‘श्वास’ हा पहिला चित्रपट. या चित्रपटातील अभिनय आणि चित्रपटाची सहनिर्मिती हे घडलं माझ्या पन्नाशीत. पण आता वाटतं, की चित्रपट कसा असावा, कसा नसावा, त्यातील व्यक्तिरेखा खोट्या वाटू नयेत, याबद्दल माझा विचार सुरू झाला होता, तो पूर्वीच. ‘गद्धे’पणाच्या काळात मी व्यसन लागल्यासारखे चोरून सिनेमे पाहात होतो तेव्हाच

Advertisement

जेव्हा नोकरी सोडून पूर्णवेळ अभिनय करू लागलो, तेव्हा मी प्रचंड काम करत होतो. घरात लक्ष देऊ शकत नव्हतो. घरच्या कार्यांना उपस्थित राहात नव्हतो. जवळचे नातेवाईक गेले, अगदी माझे वडील गेले, तेव्हाही मी नाटकाचा प्रयोग करत होतो. स्वत:वर ताबा ठेवून काम करत राहणं, मी या काळात शिकलो. प्रथम बायको नोकरी करत होती आणि आमच्या मुलीकडेही लक्ष देत होती. काही वर्षांनी जेव्हा मला स्थिरता आली, तेव्हा तिनं विचारपूर्वक नोकरी सोडली. आपण मन एकाग्र करून, सच्चेपणानं काम करत गेलो तर ध्येय साध्य करता येतं हे मला अनुभवास येऊ लागलं. सुरुवातीचा काळ भीतीचा आणि अडचणींचा होता. पण माझ्यातील माणसानं मला सुरक्षा दिली आणि आजूबाजूला जगणाऱ्या माणसांनी मला शिकवलं, मोठं केलं. 

मला या क्षेत्रात पाय रोवायला २५-३० वर्षं लागली आणि त्याचा पाया पंचविशीतल्या ‘बेस्ट’च्या नोकरीत असताना घातला गेला होता. आता परिस्थिती बरीच बदलली आहे आणि आताच्या मुलांसमोरची आव्हानं, त्यांचं जगणंही वेगळं, अधिक अस्थिर आहे. पण आपल्याला काय चांगलं जमतं हे ओळखून, जमिनीवर राहात, इतरांशी चर्चा, संवाद करून पुढे गेलं, तर योग्य मार्ग सापडू शकतो. हेच माझ्या ‘गद्धेपंचविशी’च्या दहा वर्षांनी मला शिकवलं. ते मार्गक्रमण अजूनही सुरू आहे…

Advertisement

[email protected]  

शब्दांकन- संपदा सोवनी

Advertisement

The post गद्धेपंचविशी : भक्कम पायावर तोललेलं आयुष्य! appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement