गद्धेपंचविशी : बेखौफ जगणारं वादळी आयुष्यरझिया पटेल [email protected]
शाळा व महाविद्यालयात असतानाच मला आजूबाजूच्या परिस्थितीविषयी प्रश्न पडायला लागले. स्वत:ची मतं धिटाईनं मांडायलाही लागले. घुसमट होऊ लागली तेव्हा घरही सोडलं आणि चळवळींना वाहून घेतलं. ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’च्या माध्यमातून आंदोलनं के ली, रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तेव्हा यदुनाथजी थत्तेंसारखी पितृतुल्य माणसं आणि कामाला वाहून घेणारे साथी भेटले. आईवडिलांची साथ होतीच, पण याच काळात धर्माच्या पल्याड जाऊन भेटलेल्या जोडीदार श्रीकांतच्या संवेदनशील साथीनं एक समृद्ध वाटचाल चालू झाली. माझी ‘गद्धेपंचविशी’ अशी बेखौफ आणि म्हणूनच वादळी ठरली.

Advertisement

माझ्या ‘गद्धेपंचविशी’ची पायाभरणी सुरू झाली ती किशोरवयातच. ती अशी, की माझ्या वडिलांनी आम्हा बहिणींना शाळेत घातलं, शाळा मराठी माध्यमाची, त्यामुळे आमच्या समाजापलीकडची मित्रमंडळी मिळाली, शिवाय मराठी माध्यम असल्यामुळे वाचायलाही मुबलक मिळालं. त्यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीचं भान येऊन अनेक गोष्टी खटकायला लागल्या आणि मग फार प्रश्न पडायला लागले..

मी ज्या कुटुंबात जन्मले ते सर्वसाधारण भारतीय कुटुंबांसारखंच शेतकरी कुटुंब. जिथे सहसा मुलींना प्रश्न विचारायला परवानगी नसते, मत मांडायला परवानगी नसते. माझ्या तर जाणतेपणाची सुरुवात झाली तीच प्रश्न विचारण्यापासून. माझी स्वत:ची स्वतंत्र मतं तर होतीच, शिवाय ही मतं आग्रही होती. त्यामुळे माझी गद्धेपंचविशी फार वादळी आणि घरच्यांना डोकेदुखी ठरणारी झाली.

Advertisement

शाळेतील भाषेच्या पाठय़पुस्तकांमधील पाठ आणि कविता यांचा मोठाच प्रभाव माझ्या विचारांवर पडला. उदा. बहिणाबाईंची कविता- ‘राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगनं, त्यात आलं रे नशीब, काय सांगे पंचागन; नको नको रे ज्योतिषा नको हात माह्य़ा पाहू, माह्य़ं दैव मला कये, माझ्या दारी नको येऊ’. बाबा आमटेंवरचा धडा -‘मैं बेईमान समय को अपना अहम नही बेचूंगा’ किंवा ‘छल से मांग लिया करते हो अंगुठे का दान’ ही रामधारी सिंग दिनकर यांची एकलव्य व द्रोण यांच्यावरील कविता. पाठय़पुस्तकातील साहित्य विद्यार्थ्यांच्या मनावर खोल प्रभाव टाकून मूल्यांची बैठक पक्की करतं. त्यामुळे पाठय़पुस्तकं आणि शिक्षण याचा राजकीय आणि धार्मिक अस्मितांचा आखाडा करणारे लोक भारताचं भविष्य बंदिस्त करतात, असं मला मागे वळून बघताना जाणवतं.

माझ्या पंचविशीच्या काळात आणखी एका पुस्तकानं माझ्यावर मोठा परिणाम घडवला. तो स्नेहलता रेड्डी यांच्या ‘सीता’ या नाटकानं. आणीबाणीत अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी लढताना आणि कारावास भोगताना झालेल्या यातनांनी त्यांचा अकाली बळी घेतला. स्नेहलता रेड्डींनी स्त्री जीवनाचं दु:ख आणि राज्यसत्तेचं क्रूर, जुलमी स्वरूप या नाटकातून मांडलं. स्त्रियांच्या बंडखोरीचा मुद्दा आला की धर्मचर्चा आल्याच. त्या चर्चामध्ये स्त्रियांना मनाई. या नाटकात सीतेचं पावित्र्य सिद्ध करायला रामानं महासभा, धर्मसभा बोलावलेली  आहे. या धर्मसभेत सीता विद्रोह करते. वसिष्ठ ऋ षी तिला म्हणतात, ‘शास्त्राचा अधिकार ही चर्चा करण्याजोगी बाब नव्हे.’ तेव्हा सीता म्हणते, ‘एक स्त्री आहे म्हणून प्रश्न विचारणं वज्र्य आहे का मला? मी मरणाला भीत नाही, पण धर्म या नावाखाली जे ढोंग भविष्यकाळापर्यंत चालवलं जाईल त्याला घाबरते. मी नाही करणार जे तुम्हाला योग्य वाटतंय ते. मी नाहीच शरण जाणार. मी स्वतंत्रपणे निवड करणार आहे, आणि माझी निवड आहे बंडाची. मला माहीत आहे, जग एका दिवसात बदलणार नाही. पण आमच्यापैकी कुणीतरी बंड केल्याखेरीज आम्ही मुक्त होणार नाही.’ भर धर्मसभेत प्रश्न विचारणाऱ्या आणि बंड करून उठणाऱ्या सीतेनं माझ्या मनावर खूप प्रभाव टाकला. ती तर केवळ माझंच नाही, सर्व स्त्रीजातीचं म्हणणं मांडत होती. केवळ स्त्रीजातीवर होणाऱ्याच नाही, तर सर्वच प्रकारचा अन्याय, सत्ताधाऱ्यांची क्रूरता आणि ढोंग, अमानुषपणा याबद्दल ती आवाज उठवत होती. या सगळ्यांचा परिणाम माझ्यावर होत होता.  स्वत:च्या सारासारविवेकानं निर्णय घेणं हा मोठा टप्पा मी या काळात पार केला. अन्यायपूर्ण सामाजिक व्यवस्थेला मी शरण जाणार नाही, असं ठामपणे ठरवलं.

Advertisement

या टप्प्यावर कौटुंबिक सुरक्षितता मी झुगारून दिली. सामाजिक चळवळीत प्रवेश केला. बाहेरच्या जगाशी संबंध न आलेल्या, दूरवरच्या एका खेडय़ातल्या मुलीनं- जी जेमतेम विशीची असेल, घेतलेला हा निर्णय फारच धाडसाचा होता असं आज मला वाटतं. पण तो निर्णय मला पेलता आला याचं मोठं कारण म्हणजे ते सत्तरचं दशक होतं आणि या सत्तरच्या दशकात युवक चळवळी भरात होत्या. याच दशकात आलेल्या आणीबाणीविरोधात समाजात संतापाची भावना होती. सामाजिक चळवळींबद्दल समाजात आदर होता. आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे यदुनाथजी थत्तेंसारखी पितृतुल्य माणसं होती, ज्यांनी समता, सामाजिक न्याय यासाठी, मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या तरुणांच्या सर्वच चळवळींवर मनापासून प्रेम केलं, आधार दिला आणि मार्गदर्शन केलं. असे यदुनाथजी माझ्या आयुष्यात आले. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात माझी जेव्हा घरात असताना घुसमट होऊ लागली, मनात प्रश्न निर्माण झाले, तेव्हा मी यदुनाथजींना पत्रं लिहिली. मला या माणसाबद्दल विश्वास वाटला तो ‘साप्ताहिक साधना’तील यदुनाथजींच्या परिचयामुळे. त्यांनी माझ्या पत्रांना उत्तरं दिली. सहानुभूतीपूर्वक माझं म्हणणं ऐकून घेतलं. मी घर सोडलं तेव्हा माझी जबाबदारी घेतली. माझ्या वडिलांशी संपर्क साधला. माझ्या वडिलांना यदुनाथजींबद्दल पूर्ण विश्वास होता. आजच्या काळात मात्र हिंदू-मुसलमानांमध्ये दरी निर्माण होताना दिसतेय. त्या काळात असं काही समोर आलं नाही. पुढे तर केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभर माणुसकी आणि सामाजिक सलोखा जपणारी असंख्य माणसं मला भेटली. या माणसांनी माणुसकीवरचा माझा विश्वास दृढ केला. आजही भारतीय समाज म्हणून आपण यातून बाहेर पडू असा विश्वास वाटतो.

मी ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’त सहभागी झाले. त्या संघटनेत वेगवेगळ्या जाती-धर्मातील मुलंमुली होती. ते सगळे जयप्रकाशजींचे (जयप्रकाश नारायण) धुनी युवक होते. मध्यमवर्गातील त्यांची कुटुंबं चळवळीशी जोडली गेली, कारण त्यांची मुलं या चळवळीशी जोडलेली होती. एका अर्थानं हे युवक सामाजिक न्याय, समतेची मूल्यं कुटुंबापर्यंत पोहोचवणारे दूत होते. चळवळीत आल्यावर मी अधिकच व्यापक नजरेनं अन्यायाकडे बघू लागले. माझी अस्वस्थता व्यक्तिगत उरली नाही. ती सामाजिक, राजकीय चळवळीचा भाग होऊन सामाजिक कृतीत परावर्तित झाली. कवी अनिल यांची ‘मानवता’ ही कविता जणू आम्ही जगत होतो आणि जगतो आहोत..

Advertisement

‘अन्याय घडो कोठेही, चिडून उठू आम्ही

घाव पडो कोठेही, तडफडू आम्ही

Advertisement

अवघ्या अभाग्यांचे अश्रू,

उभे आमच्या डोळ्यांत

Advertisement

दु:खितांच्या वेदनांच्या कळा

उरात आमुच्या ही

Advertisement

संवेदना साऱ्या जगाची हृदयात आहे भरभरून

नाते नवीन असे काही, जोडून आहोत आम्ही

Advertisement

मानव ते ही मानव आम्ही!’

‘संघर्ष वाहिनी’त आल्यानंतर १९८२ मध्ये जळगांव शहरात मुस्लीम पंचकमिटीनं मुस्लीम स्त्रियांवर ‘सिनेमाबंदी’चा हुकूम लादला आणि दंड, शिक्षा देणंही सुरू केलं. या वेळी ‘संघर्ष वाहिनी’नं भूमिका घेतली आणि मी त्यात पुढाकार घेतला. अशी कुठलीही कमिटी कसा कायदा हातात घेते? आणि स्त्रिया त्याच्या बळी का ठराव्यात?  गद्धेपंचविशीतील हे माझं पहिलं रस्त्यावरचं आंदोलन. या काळात धर्ममरतडांशी घातलेले वाद, सिनेमाबंदीनंतरही सिनेमा बघायला गेलेल्या रेहाना-शकील या जोडप्यावर झालेला हल्ला, मुस्लीम वस्तीत अंगावर धावून येणारा जमाव, हल्ला होण्याची शक्यता, पोलीस सुरक्षेत काही काळ वावरावं लागणं, असा हा संघर्षांचा काळ. आज विचार करताना जाणवतं, इतकं  सगळं चालू असूनही त्या काळात भय कधी वाटलं नाही. निर्भयतेनं या संघर्षांला सामोरे गेलो. मला वाटतं निर्भयता हे गद्धेपंचविशीचं व्यवच्छेदक लक्षण आहे; म्हणून गद्धेपंचविशी हा खूप महत्त्वाचा काळ आहे. या काळात ‘संघर्ष वाहिनी’चे साथी सोबत होते आणि आम्ही सर्वच गद्धेपंचविशीत असल्यामुळे बेखौफ होतो. या काळात वासंती दिघे, शेखर सोनाळकर, अरुणा तिवारी, रमेश बोरोले, कुंजबिहारी रावत, रत्ना रोकडे हे सर्व साथी सक्रिय होते.

Advertisement

‘संघर्ष वाहिनी’तच मला माझा आयुष्याचा जोडीदार श्रीकांत भेटला. चांगली मैत्री झाली. एक दिवस त्यानं मला आरती प्रभूंचा कवितासंग्रह ‘नक्षत्रांचे देणे’ भेट दिला. आम्ही वेगवेगळ्या विषयांवर यथेच्छ गप्पा मारायचो. १९८३ मध्ये आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. ते एक धाडसच होतं. पण गद्धेपंचविशीतला हा निर्णय साहजिकच होता. हे लग्न आंतरधर्मीय त्यामुळे ताण खूप होता. समाजाचा रोष होताच. लग्न नोंदणी पद्धतीनं केलं. कुठलेही धार्मिक विधी, धर्मातरं असं काहीही आमच्या लग्नात नव्हतं. कारण माणुसकीचं, मित्रत्वाचं नातं हीच महत्त्वाची गोष्ट होती. आमच्या लग्नासाठी १५ जण उपस्थित होते आणि यदुनाथजीही आवर्जून आले होते. आमचे दोन्हीकडचे काही नातेवाईक नाराज झाले, पण कुणीही आक्रमक विरोध केला नाही. आज ‘लव्ह जिहाद’ म्हणून राजकारण,

कायदे के ले जाताना दिसताहेत. पण आमच्या लग्नामुळे मात्र दोन धर्मीय, दोन कुटुंबं जोडली गेली. त्यांच्या दृष्टीनं अपराध केलेल्या त्यांच्या मुलांना त्यांनी समजून घेतलं, माफ केलं. याचा सामाजिक परिणाम खूप सकारात्मक झाला. समाजात जगताना माझ्या वडिलांनी, आईनं खूप सोसलं. मी तर खूप आधी घराबाहेर पडले होते, पण ते समाजातच राहात होते. त्यांनी धीरोदात्तपणे माझा निर्णय स्वीकारला. आई-वडिलांनी मुलांना समजून घेणं सकारात्मक असतं, ज्याचा परिणाम पुढच्या पिढय़ांवर होतो. आम्हाला एक मुलगी आहे, स्नेहा. तिच्या रूपानं स्वतंत्र विचारांचा वारसा पुढे जाताना  दिसतो आहे.

Advertisement

आज लग्न होऊन आमचं सहजीवन सुरू झाल्याला ३८ वर्ष झाली आहेत. या काळात संवादी पद्धतीनं आम्ही पुढे जात राहिलो. माझा एक चुलतभाऊ माझ्या वडिलांना म्हणाला होता, ‘बघा एक दिवस ती घरी परत येईल, हे लग्न मोडेल.’ माझे वडील तेव्हा शांतपणे म्हणाले होते, ‘हे लग्न मोडणार नाही.’ आज विचार करताना वाटतं,  का त्यांना इतका विश्वास वाटला असावा? तो याच्यासाठी, की आमच्या लग्नाला केवळ प्रेमच नाही, तर एक वैचारिक आधार होता. जग अधिक चांगलं कसं बनवता येईल ही प्रेरणा होती, आहे. त्यामुळे या विवाहानंतरचा काळ हा प्रगल्भ होत जाण्याचा होता. मुख्य म्हणजे दोन्ही कुटुंबातील स्त्रियांनी मला आणि श्रीकांतला ज्या पद्धतीनं स्वीकारलं, माझी आई, सासूबाई, श्रीकांतची मोठी बहीण अपर्णा मनसबदार, तिचे पती आणि माझ्या मोठय़ा बहिणी आणि मेव्हणे ही नाती विलक्षण आहेत. मागच्या पिढीतील श्रीकांतच्या मावशी व काका कुंदा आणि रामचंद्रराव आसोलेकर यांनी तर मुंबईत आम्हाला त्यांच्या घरी काही काळ राहायला ठेवून घेतलं.

माझ्या गद्धेपंचविशीच्या काळात मी मुंबई, पुणे, जळगाव, औरंगाबाद अशा शहरांत कामासाठी फिरत असायचे. शेखर, वासंती, अरूणा तिवारी, रत्ना रोकडे, यांच्या घरी मला आपलं घर मिळालं. वसंत गुप्ते, चंद्रशेखर देशपांडे, रोहिणी आणि पपा गवाणकर यांची घरं माझा आधार ठरली. वसंत गुप्ते म्हणजे नाना तेव्हा ‘हिंद मजदूर सभे’चं काम करत होते. मनिषा आणि गिरिजानं मला सामावून घेतलं, मुख्य म्हणजे या प्रत्येक घरातील स्त्रियांनी मला खूप प्रेमानं वागवलं, मग माई थत्ते, अख्तरचाची, कुसुमताई सोनाळकर, रत्ना रोकडेची आई आणि आजी, नरेंद्र काबराची आई, सर्वानीच मला मुलीसारखं वागवलं. किती जणांची नावं सांगावी.. आजन्म कृतज्ञ राहावं अशी खूप माणसं मला या काळात भेटली. आज मात्र समाजात परिस्थिती वेगळी दिसते. माणसं एकमेकांपासून लांब जात आहेत.

Advertisement

या काळात ‘संघर्ष वाहिनी’शी नातं कधी तुटलं नाही. १९८६ मध्ये शाहबानो या तलाकपीडित मुस्लीम स्त्रीला पोटगी नाकारली गेली, त्यासाठी कायदा बदलला गेला, तेव्हा ‘संघर्ष वाहिनी’नं तिला न्याय मिळावा अशी भूमिका घेतली. या प्रकरणानंतर मी ‘टाइम्स फाऊंडेशन’च्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. त्यात निवड झाल्यावर ‘भारतातील मुस्लीम महिलांचा सन्मानाने जगण्याचा संघर्ष’ यावर अभ्यास केला. भारतात होणाऱ्या जातीय दंगलींच्या प्रश्नावर ‘संघर्ष वाहिनी’नं खूप काम केलं. त्यासाठी ज्या अभ्यास समित्या बनवल्या, त्यातही मी काम केलं. मुंबई दंगल (१९९२-९३) मध्ये तर जयंत दिवाण, प्रदीप खेलुरकर, चेतना गाला आणि वाहिनीचे सर्व साथी शांतता स्थापन करणं आणि मदतकार्य करणं यासाठी ठामपणे उभे राहिले. अलका देसाई, हसीना अमानी, खुर्शिद अत्तरवाला असे कितीतरी वाहिनीचे साथी सोबत होते. गद्धेपंचविशीतील तरुण हातात दगड उचलू शकतात, तसंच ते शांती स्थापनेचं कामही करू शकतात, हे या तरुणांच्या संघटनेनं दाखवून दिलं.

जागतिक मुस्लीम महिला परिषदेत मला सहभागी होता आलं आणि एका वैश्विक लढय़ाचा मी भाग होऊ शकले. पुढे मुस्लीम समाजाच्या शिक्षणाचा आणि विकासाचा प्रश्न यावर ‘भारतीय शिक्षण संस्थे’त डॉ चित्राताई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनात्मक काम  केलं. ‘भारतीय मुस्लीम समाजाच्या शिक्षणाचं राजकारण’ या विषयावर मी प्रबंध लिहून पुणे विद्यापीठात डॉ. सुहास पळशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून डॉक्टरेट मिळवली, तसंच भारत सरकारच्या उच्चस्तरीय राष्ट्रीय समितीवर नेमणूक होऊन अल्पसंख्याक समूहांच्या स्थितीची पाहाणी करून त्यांच्या शिक्षण, सुरक्षा, रोजगारासंदर्भातील प्रश्नांवर धोरणं सुचवणाऱ्या समित्यांवर काम करता आलं. हे सर्व जरी असलं, तरी ‘अभी लडाई जारी हैं।’

Advertisement

मी जेव्हा चळवळीत आले, तेव्हा देशात आणीबाणी लादली गेली होती. उद्याचा काळ  तसाच खडतर आणि भयावह असेल का, याची काहीशी भीती वाटत राहाते. मात्र आज या देशात तरूण के वळ स्वत:च्याच नाही, तर लोकशाही, संविधान, नागरी, मानवी हक्क यांसाठी निर्भयपणे रस्त्यावर उतरत आहेत. अशा वेळी सुरेश भटांची ही कविता आशादायी वाटते-

हे असे आहे तरी पण,

Advertisement

हे असे असणार नाही,

दिवस आमुचा येत आहे,

Advertisement

तो घरी बसणार नाही

सांगती ते धर्म जाती,

Advertisement

बांधती ते रोज भिंती

पण उद्याचा सूर्य काही,

Advertisement

त्यामुळे फसणार नाही

आजचे अमुचे पराभव,

Advertisement

पचवितो आम्ही उद्यास्तव

विजय तो कसला उरावर,

Advertisement

जखम जो करणार नाही..

The post गद्धेपंचविशी : बेखौफ जगणारं वादळी आयुष्य appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement