मुजीम शेख20 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महापालिकेने कक्ष तयार केला, मात्र धर्मादाय, पोलिस आणि महावितरणचे कर्मचारी येथे येतच नाहीत.
- आधी धर्मादायमध्ये नोंद करा, नंतर जा पालिकेत
सार्वजनिक गणेश मंडळांना गणरायाची स्थापना करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी महापालिका, पोलिस प्रशासन, धर्मादाय आणि महावितरणच्या प्रमुखांनी एकत्र येऊन सर्वच परवान्यांसाठी एक खिडकी योजना राबवण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात एकाऐवजी चार खिडक्या झाल्या आहेत. या चारही विभागांनी आपापल्या कार्यालयांमध्ये परवानगी देण्याची सोय केल्याने मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना चार कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.
गणरायाच्या आगमनाला काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. त्यामध्ये गणेशाच्या मूर्तींची बुकिंग करणे, सर्व साहित्य जमा करणे किंवा इतर कामात पदाधिकारी व्यग्र आहेत. अशातच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध परवानग्यांसाठीही धावपळ करावी लागत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने एक खिडकी योजनेंतर्गत एकाच छताखाली महापालिका, पोलिस, धर्मादाय कार्यालय, महावितरण आदी विभागांच्या परवानग्या देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी महापालिकेच्या सर्व वाॅर्ड कार्यालयांत सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, महापालिकेव्यतिरिक्त इतर विभागांचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी या योजनेत सहभाग घेत नाहीत. त्यामुळे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध कार्यालयांत भटकंती करावी लागत आहे. प्रत्येक विभागात एका दिवसात काम होत नसल्याने वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. याबाबत पोलिस आयुक्त मनोज लोहिया, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्याशी ‘डीबी स्टार’ने संपर्क साधला. मात्र, या दोघांनीही प्रतिसाद दिला नाही.
पेट्रोलमध्येच पैसे वाया जात आहेत
एक खिडकी योजनेंतर्गत सर्व कामे लवकर होतील असे वाटले होते. मात्र, याउलट होत आहे. मनपा मुख्यालयात गेल्यानंतर कळले की सर्व कार्यालयांत फिरावे लागणार. परवानगीसाठी असलेल्या फॉर्मवर चार ते पाच पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या, आधार कार्डची झेरॉक्स आदी कागदपत्रे लागतात. त्यासाठी दोन-तीन दुचाकींवर सर्व शहरात गस्त घालावी लागत आहे. यामुळे पेट्रोलमध्येच पैसे वाया जात आहेत.
– विशाल गावंडे, अध्यक्ष, मोरया युवा गणेश मंडळ
मार्गदर्शन करायला कुणी नाही
क्रांती चौक ठाण्यात पोलिसांची परवानगी घ्यायला गेलो असता ते म्हणाले, आधी धर्मादाय कार्यालयाची परवानगी आणा. त्यामुळे सकाळपासून धर्मादाय कार्यालयात सहकाऱ्यांसोबत आलेलो होतो. फॉर्मदेखील किचकट आहे. फॉर्म भरताना येणाऱ्या समस्यांबाबत कुणीही बोलत नाही. परवानगीच्या प्रक्रियेतील पहिल्याच कार्यालयात हे हाल होत आहेत. इतर कार्यालयांची परवानगी कधी मिळेल, याची चिंता आहे.
– गणेश वेताळ, उपाध्यक्ष, श्री छत्रपती गणेश मंडळ
तीन दिवसांपासून चकरा मारत आहे
सोमवारपासून गणेश मंडळांना परवानगी देण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून चकरा मारत आहे. मंगळवारी मनपा मुख्यालयात धर्मादाय कार्यालयातील अधिकारी होते. बुधवारी गेलो तर नव्हते. तेथे मनपाच्या कर्मचाऱ्यांना विचारले तर ते म्हणाले, धर्मादाय कार्यालयात जा. आता सकाळपासून धर्मादाय कार्यालयात परवानगी काढण्यासाठी बसून आहे.
– योगेश चव्हाण, अध्यक्ष, शिवसंग्राम गणेश मित्रमंडळ