मुंबई14 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे बीड जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांनी एका व्हिडिओद्वारे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना कानशिलात लगावल्याचा दावा केला आहे. यामुळे राज्याच्या वर्तुळात खळबळ माजली असताना आता स्वतः सुषमा अंधारे यांनी त्यावेळी नेमके काय घडले? याचा संपूर्ण घटनाक्रम कथन केला आहे. मला मारहाण झाली नाही. मारहाणीचाी दावा करून त्यांना गोंधळ निर्माण करायचा आहे, असे त्या म्हणाल्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या – बीडमध्ये 20 मे रोजी ग्रामीण भागातील महाप्रबोधन यात्रेचा समारोप होणार आहे. आतापर्यंतच्या सर्वच सभा वादळी झाल्या. महाप्रबोधन यात्रा म्हटले की चर्चा व वाद आलेच. विशेषतः या सभेला संजय राऊत स्वतः हजर राहणार आहेत. प्रथमच मी व राऊत एकत्र येणार आहोत. त्यामुळे अनेकांचा अस्वस्थ वाटणे साहजिकच आहे. बीडमध्ये गत अनेक वर्षांपासून शिवसेनेची पडझड सुरू आहे. आता नव्याने शिवसेना उसळी मारत आहे.
बॅनरवर फोटो नाही म्हणून अप्पासाहेब जाधव नाराज
काल आम्ही स्टेजची पाहणी करत होतो. पाहणी झाल्यानंतर आम्ही परत गेलो. त्यानंतर अप्पासाहेब जाधव काही गोष्टींवर बोलले. बॅनरवर फोटो नसल्यामुळे ते नाराज होते. त्यावर मी आपण यावर नंतर बोलू असे म्हणाले. आमचे दुसरे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनीही या प्रकरणी आपण येथे नाही तर हॉटेलवर जाऊन बोलू अशी सूचना केली. त्यानंतर ठीक म्हणून गाडीत बसले, असे अंधारे म्हणाल्या.
असशील तू जहागीरदार…
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, गाडीत मी फेसबूक लाईव्हद्वारे सभेच्या तयारीची माहिती देत होते. तेव्हा जाधवांनी एका मुलाला काही काम सांगितले. त्यावर त्या मुलाने त्यांना मी नोकर नाही, नीट बोला असे सांगितले. यामुळे जाधवांचा पारा चढला. मी जिल्हाप्रमुख असून, तू मला असे बोलतो का, असशील तू जहागीरदार असे ते म्हणाले. यामुळे बाचाबाची वाढली. त्याचे रुपांतर भांडणात झाले. त्यानंतर किरकोळ हाणामारी झाली.
आम्ही प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला
या प्रकरानंतर आम्ही सभेला गालबोट लागू नये यासाठी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रचंड खर्च केला. जीव तोडून कष्ट केले. सामान्यतः मी प्रबोधन यात्रेत थेट व्यासपीठावर जाते. पण प्रथमच मी 4 दिवस थांबून तयारी करत आहे. कारण, ही माझ्या जिल्ह्यातील सभा आहे. यामुळे झाला प्रकार जागच्या जागी मिटवण्याचा आमचा प्रयत्न होता, असे अंधारे म्हणाल्या.
ही घटना पूर्वनियोजित होती
सुषमा अंधाऱ्या म्हणाल्या, या प्रकरणी स्थानिक कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला. पण आम्ही त्यास नकार दिला. मात्र हा संपूर्ण प्रकार पाहिल्यानंतर जाधव यांनी सूनियोजितपणे ही घटना घडवून आणल्याचे वाटते. आप्पा जाधव ठरवून प्लॅन करून आले होते. त्यांना सभेपूर्वी गोंधळा घालायचा होता. एवढे होऊनही आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न केला.
सुषमा अंधारेंवर हात उगारल्याचा दावा केल्याने मोठा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे जाधवांनी तसा दावा केला असावा. एखादा माणूस स्वतः पुढे येऊन हात उचलल्याचा दावा करत असेल तर निश्चितच त्याच्या मनात काहीतरी करण्याचा विचार असू शकतो, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
खरेच मारहाण झाली का?
यावेळी सुषमा अंधारेंना तुम्हाला खरेच मारहाण झाली का? असा थेट प्रश्न केला असता त्यांनी नाही असे स्पष्ट उत्तर दिले. त्या म्हणाल्या. मला मारहाण झाली असती तर अप्पासाहेब जाधव परत गेले असते का? हे प्रकरण एवढ्या लवकर शांत झाले असते का? असे दावे करून करून जाधवांचा केवळ गोंधळ घालण्याचा हेतू होता. त्यावरून शिंदे गट किंवा शिवसेना पुन्हा उभी राहू नये असे ज्यांना वाटते त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे, असे त्या म्हणाल्या.