मुंबई10 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
नार्कोटिक्स विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे चौकशांच्या फेऱ्यात सापडलेत. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने आपल्या अहवालात वानखेडेंवर गंभीर ठपका ठेवला आहे. वानखेडेंनी गत काही वर्षांत 6 परदेश दौरे केले. पण या दौऱ्यांचा खर्च त्यांनी नाममात्र दाखवून संबंधितांची दिशाभूल केली, असे समितीने म्हटले आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, समीर वानखेडे यांनी 2017 ते 2021 या पाच वर्षांमध्ये परिवारासह सहा परदेशी दौरे केले आहेत. यामध्ये युके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीवसारख्या दौऱ्यांचा समावेश आहे. ५५ दिवसांहून अधिक दिवस परदेशांमध्ये घालवल्यानंतर केवळ 8.75 लाखांचाच हिशेब दाखवण्यात आला आहे. मात्र, एवढ्या पैशांमध्ये या सगळ्या देशांचा विमानखर्चही निघणे अवघड असल्याचा दावा चौकशी समितीने दाखल केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.
समीर वानखेडेंचा पाय खोलात
आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या समीर वानखेडे यांचा पाय आरोपांच्या चिखलात रुतत चालल्याचे चित्र आहे.
एनसीबी अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विशेष चैाकशी समितीने वानखेडे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारासह अत्यंत गंभीर आरोप लावले आहेत.
यात त्यांच्या परदेशी दौऱ्यांसह दौऱ्यांमध्ये झालेला खर्च लपवण्याच्या प्रयत्नासह महागड्या घड्याळांच्या खरेदीच्या खर्चाचे उल्लेख करण्यात आले आहेत.
काय आहेत आरोप?
समीर वानखेडे यांनी ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला न अडकवण्याच्या बदल्यात २५ कोटींची रक्कम अभिनेता शाहरूख खान यांना मागितल्याचा मुख्य आरोप आहे.
समीर वानखेडे यांनी 2017 ते 21 या पाच वर्षांच्या काळात कुटुंबासह सहा परदेश वाऱ्या केल्या. युके, पोर्तुगाल, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका अशा ट्रीपचा समावेश असणाऱ्या दौऱ्यांचा कालावधी एकत्र केल्यास तो 55 दिवसांहून अधिक होतो. यासाठभ् वानखेडे यांनी केवळ 8.75 लाखांचा खर्च दाखवला आहे. जो वास्तविक खर्चापेक्षा खूपच कमी आहे. लंडनच्या 19 दिवसांच्या सहलीसाठी वानखेडे यांनी एक लाखांचाच खर्च दाखवला होता. तर तिथे ते एका नातेवाईकांकडे राहिल्याचे दाखविले होते. वानखेडे यांनी 17 लाख 40 हजारांचे रोलेक्स गोल्ड घड्याळ खरेदी केले होते. परंतू या घड्याळ्याची मुळ किंमत 22 लाख् 5 हजार एवढी आहे. एवढेच नाही तर वानखेडे यांचे मुंबईत चार फ्लॅट असल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.
वरीष्ठांना पूर्ण कल्पना होती
आर्यन खानच्या ड्रग प्रकरणाची पूर्ण माहिती वरिष्ठांना होती असा आरोप सीबीआयने केला असून त्यासंदर्भातील संभाषणांचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत.
समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टात १८ मे ला आपल्या बचावात एक रिट याचिका दाखला केली होती. त्यामध्ये त्यांच्यात झालेल्या संभाषणाच्या प्रति जोडण्यात आल्या होत्या. या चॅट्समध्ये आर्यन खान संदर्भात केलेल्या संभाषणाचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांसह आर्यन खान ड्रग्स प्रकरणी तपास करत असल्याचा आरोप CBI ने केला आहे.