छत्रपती संभाजीनगर19 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्थेच्या खातेधारकांचा मोर्चा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात काढण्यात आला. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. तरी देखील हा मोर्चा काढण्यात आला. तसेच मोर्चात सहभागी महिलांनी बॅरिकेट्स तोडून मंत्रिमंडळाची बैठक सुरू असलेल्या सभागृहाकडे कूच केली. या वेळी आंदोलक आणि पोलिसांत चांगलीच रेटारेटी झाली. इतकेच नाही तर पोलिसांनी आम्हाला लाठीने मारले असल्याचा आरोप मोर्चात सहभागी महिलांनी केला आहे.
आदर्श पतसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यात सत्ताधारी मंत्र्यांचाही हात असल्याने या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यामुळे एकही मंत्री मोर्चेकारांना भेटण्यासाठी येण्यास तयार नसल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले. मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी वेळ नसल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी या वेळी केला.
मोर्चेकरी आक्रमक
आदर्श पतसंस्थेच्या खातेधारकांच्या वतीने या मोर्चाल परवानगी देण्यात यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. तसेच काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, बैठक सुरू होताच, अनेक खातेधारक महिला मोर्चेकरी आक्रमक होत, मंत्रिमंडळाच्या बैठक सुरू असलेल्या सभागृहाकडे निघाल्या. या वेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.