पुणे27 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
खासगी वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदाराच्या कुटुंबीयांना अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका खासगी वित्तीय संस्थेतील सात कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ए यु स्मॉल फायनान्स बँकेच्या लष्कर शाखेतील सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या महिलेने ए यु स्मॉल फायनान्स बँकेच्या लष्कर शाखेतून कर्ज घेतले होते़ त्याचे हप्ते थकल्याने बँकचे अधिकारी सुशिल याने बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फिर्यादी महिलेच्या घरी पाठविले. ते मद्यधुंद अवस्थेत या महिलेच्या घरी गेले. त्यांनी या महिलेला तसेच घरातील महिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, तसेच त्यांच्या अंगावर धावून जाऊन विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे तपास करत आहेत.
हॉटेलमध्ये तरुणीला मद्य पाजून अत्याचार
पुणे शहरातील विमाननगरमधील एका हॉटेलमध्ये तरुणीला मद्य पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अभिषेक सत्तुजी टिक्कल (वय २८, रा. चंदननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पीडीत तरुणीला टिक्कलने विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी बोलावले होते त्यावेळी त्याने तिला जबरदस्तीने मद्य पाजले. तिला त्रास झाल्याने टिक्कल याने तिला जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केले, तसेच तिचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. पोलीस उपनिरीक्षक गाताडे तपास करत आहेत.