क्रीडा : विराट नेतृत्वाला तडा!ऋषिकेश बामणे – [email protected]
विराट कोहली. गेल्या १० वर्षांच्या कालावधीत या नावाचा संपूर्ण विश्वात दबदबा पाहायला मिळाला. फलंदाज म्हणून छाप पाडणाऱ्या कोहलीने कर्णधार म्हणूनही वर्चस्व प्रस्थापित केले. परंतु आता फलंदाजीत सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे कोहलीच्या नेतृत्व नीतीला तडा जाणार आहे.

Advertisement

दिल्लीच्या कोहलीने काही दिवसांपूर्वीच भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिराती येथे होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार म्हणून अखेरचा विश्वचषक असेल, असे कोहली म्हणाला. ही घोषणा करून ३-४ दिवस उलटतात तोच इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १४वा हंगाम संपल्यानंतर आपण रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहोत, असेही कोहलीने जाहीर करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र कोहलीची गेल्या काही वर्षांतील आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमधील कामगिरी पाहिल्यावर लवकरच तो नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेईल, याची चाहूल अनेकांना लागली होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

२००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या कोहलीच्या नावावर ७० शतके जमा आहेत. २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने अखेरचे शतक झळकावले आहे. त्यामुळे आता दोन वर्षांचा कालावधी उलटला तरीही कोहलीला शतक साकारणे जमलेले नाही. त्यातच नोव्हेंबरमध्ये कोहली वयाची ३३ वर्षे पूर्ण करणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये विभाजित नेतृत्वाची प्रथा प्रचलित नसली तरी, बदलत्या काळाची गरज पाहता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तिन्ही प्रकारांत विविध कर्णधार नेमण्याचा विचार करू शकते.

Advertisement

आयपीएलपूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत कोहलीच्या फलंदाजीतील काही त्रुटींनी पुन्हा डोके वर काढले. विशेषत: जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर तो २०१४च्याच दौऱ्याप्रमाणे चाचपडताना दिसला. क्षेत्ररक्षणादरम्यान त्याची आक्रमक देहबोली संपूर्ण संघाचे मनोबल उंचावणारी ठरली. त्यामुळेच लॉर्ड्स आणि ओव्हलवर अखेरच्या दिवशी भारताने धडाकेबाज विजय मिळवला. मात्र कोहलीसाठी कसोटी क्रिकेट सर्वाधिक महत्त्वाचे असल्याने या प्रकारातील फलंदाजीत त्याला आलेले अपयश असंख्य चाहत्यांनाही दुखावणारे ठरले. कव्हर ड्राइव्हच्या फटक्यांचा मोह कोहलीला आवरता आला नाही. त्यामुळे सुनील गावस्कर यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याला प्रशिक्षक अथवा अन्य माजी खेळाडूंशी संवाद साधण्याचे सल्ले दिले.

गतवर्षी मार्च महिन्यापासून करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर जगभरातील क्रीडा क्षेत्र ठप्प पडल्यावर कोहलीच्याही कारकीर्दीला एकप्रकारे उतरती कळा लागल्याचे दिसून आले. २०२० मध्ये अमिरातीतच झालेल्या आयपीएलमध्ये कोहलीने तीन अर्धशतकांसह ४६६ धावा केल्या. मात्र यादरम्यान तो त्याच्या नेहमीच्या शैलीत दिसला नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्याद्वारे भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांचे पुनरागमन झाले. परंतु पितृत्वाच्या रजेमुळे कोहलीने पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. अ‍ॅडलेडवरील या कसोटीत भारताने नीचांकी धावसंख्या नोंदवल्यामुळे तसेच संघनिवडीवरूनही कोहलीवर टीकेचा भडिमार करण्यात आला.

Advertisement

यंदा फेब्रुवारीत इंग्लंडविरुद्ध घरच्या भूमीवर झालेल्या कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये कोहली पुन्हा लय मिळवेल, अशी आशा होती. काही लढतींमध्ये त्याने दमदार अर्धशतकांसह भारताच्या विजयात निर्णायक भूमिकासुद्धा बजावली. मात्र कोहलीसारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूकडून चाहत्यांना फक्त शतकाचीच अपेक्षा होती. परंतु येथेही कोहली चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरण्यात अयशस्वी ठरला.

२०१७ मध्ये महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेद्वारे कोहलीकडे भारताच्या तिन्ही संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. त्या वर्षीच झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम फेरीपर्यंत दिमाखात धडक मारली, परंतु कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारताचा अक्षरश: धुव्वा उडवून चॅम्पियन्स करंडक जिंकला. या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याच्या कोहलीच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याशिवाय प्रशिक्षक अनिल कुंबळेशी त्याचे असलेले मतभेदही समोर आले. त्यामुळे कोहलीच्या उर्मट वृत्तीविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

Advertisement

२०१९च्या विश्वचषकातसुद्धा भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरीसह उपांत्य फेरी गाठली. मात्र न्यूझीलंडविरुद्ध कोहलीसह अन्य भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वाखाली आयसीसी स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न पुन्हा उद्ध्वस्त झाले. यादरम्यानच्या काळात कोहलीला आयपीएलमध्ये बेंगळूरुलासुद्धा जेतेपदाची दिशा दाखवता आली नाही. २०१३ मध्ये कोहलीने बेंगळूरुचे कर्णधारपद स्वीकारले. त्यानंतर फक्त तीन वेळाच बेंगळूरुला बाद फेरीत प्रवेश करता आला आहे. २०१६ मध्ये भन्नाट फॉर्मात असलेल्या कोहलीने जवळपास स्वबळावर बेंगळूरुला अंतिम फेरीपर्यंत मजल मारून दिली. परंतु बेंगळूरुचा पहिल्या आयपीएल जेतेपदाचा शोध अद्याप सुरूच आहे.

कोहलीच्या तंदुरुस्तीबाबत कोणालाही शंका नाही. किंबहुना कोहलीने नेतृत्व स्वीकारल्यापासून भारतीय संघात तंदुरुस्तीची वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. त्यामुळे फलंदाज म्हणून तो पुढील पाच वर्षे सहज खेळू शकेल. मात्र यासाठी त्याच्यावरील दडपण कमी करणे खरंच गरजेचे होते. त्यामुळे कोहलीनेसुद्धा भविष्यातील आव्हानांकडे पाहात आताच किमान ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल. एकदिवसीय आणि कसोटी प्रकारांत तो दोन्ही आघाडय़ांवर लवकरच अधिकाधिक पूर्वीप्रमाणे यशाची शिखरे सर करेल, अशी आशा आहे.

Advertisement

९६ कसोटी, २५४ एकदिवसीय आणि ९० ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ हजारहून अधिक धावा जमा आहेत. त्यामुळे त्याच्यासारख्या खेळाडूला कारकीर्दीतील या टप्प्यावर चाहत्यांच्या पाठिंब्याचीही तितकीच आवश्यकता आहे. मुळात कोहली विश्वचषकानंतर अन्य खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार असला, तरी त्याचा अनुभव संघासाठी तितकाच महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे सध्या कर्णधार म्हणून अखेरचा ट्वेन्टी-२० विश्वचषक भारताला जिंकवून देण्याबरोबरच बेंगळूरुचेही जेतेपदाचे स्वप्न कोहली साकारणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

The post क्रीडा : विराट नेतृत्वाला तडा! appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement