छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
एम.एस.एम. बास्केटबॉल स्पोर्टस असोसिएशनतर्फे आयोजित व महा बास्केटबॉल संघटनेच्या मान्यतेने विभागीय क्रीडा संकुलात मंगळवारी झालेल्या विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे महाराष्ट्र राज्य आंतर-जिल्हा युवा अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत पुण्याच्या मुलामुलींच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
मुलांमध्ये नागपूरचा संघ उपविजेता ठरला, तर मुंबई सब अर्बन संघ तृतीय व मुंबई शहर संघ चौथ्या स्थानी राहिला. मुलींमध्ये कोल्हापूरचा संघ उपविजेता आणि मुंबई सब अर्बन संघ तृतीय व नागपूर संघ चौथ्या क्रमांकावर राहिला.
मुलांच्या अंतिम सामन्यात पुणे संघाने नागपूर संघावर 71-53 बास्केट गुणांनी पराभूत करत बाजी मारली. पुणे सामन्याच्या पहिल्या सत्रापासून आघाडीवर होता, पहिल्या सत्रात 19-4, दुसऱ्या सत्रात 18-12, तिसऱ्या सत्रात 20-16 व चौथ्या सत्रात 20-15 बास्केटच्या फरकाने भक्कम आघाडी यश मिळवले. पुण्याच्या विजयात अर्जुन राठोड, ईशान भालेराव, रितीक ढाका, संतकुमार उपाध्ये व आदित्य पवार यांनी वेगवान खेळाचे प्रदर्शन केले. नागपूरच्या शशांक घोडके, श्रेयस भोसले, दीप भांडारकर, प्रथमेश द्विवेदी यांनी शेवटपर्यंत लढत दिली, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. इतर लढतीत मुंबई सब अर्बनने मुंबई शहर संघाचा 43-32 बास्केटच्या फरकाने पराभव केला. विजेत्या संघांना राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ धनंजय वेळूकर, कोषाध्यक्ष जयंत देशमुख, मुख्य आयोजक गणेश कड, सचिन ततापुरे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.
साई, रेवा, तनिषाची चमकदार कामगिरी
मुलींच्या अंतिम फेरीत पुण्याच्या संघाने कोल्हापूर संघाचा 87-71 बास्केटच्या फरकाने पराभव करत जेतेपद मिळवले. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने रोमांचक सामना पहायला मिळाला.
पहिल्या सत्रात कोल्हापूर 20-19 ने, दुसऱ्या सत्रात पुणे 25-14 आघाडीवर होते. पुण्याच्या यशात साई शिंदे, रेवा कुलकर्णी, तनीषा राऊत, अक्षया पाटील, श्रुती सुर्वे व तिव्हीशा शर्मा यांनी चपळ, वेगवान, अचुक पासेस व अचुक बास्केट करत मोलाचे योगदान दिले.
कोल्हापूरच्या हर्षदा शेलाके, अनुष्का जमदाडे, जानवी खामकर, तनिष्का जगताप व हर्षदा पाटील यांनी निकराची झुंज दिली. इतर पदकाच्या सामन्यात मुंबई सब अर्बन संघाने नागपूर संघाचा 40-16 बास्केटच्या फरकाने पराभव केला.