औरंगाबाद6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा रोमांचक स्थितीत व अंतिम टप्प्यात पोहाेचली आहे. स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या मुलींच्या 14 वर्षाखालील संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
शुक्रवारी झालेल्या 14 वर्ष मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात छत्रपती संभाजीनगरच्या संघाने लातूर विभागाच्या संघावर 6 होमरनांनी शानदार विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगरच्या संघाने 9 आणि लातूर संघाने अवघे 2 होमरन काढले. या सामन्यात विजेत्या संघाकडून स्नेहल पाटील, समीक्षा खराटे यांनी उत्कृष्ट हिटींग केली. त्याचबरोबर कांचन कुबडे व वैष्णवी भोंडे यांनी उत्कृष्ट पिचिंग करत विजयश्री खेचून आणली.
सांगलीविरुद्ध होणार अंतिम सामना
आता छत्रपती संभाजीनगरचा अंतिम सामना कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील संघाशी होणार आहे. सांगलीही बलाढ्य संघ आहे. यापूर्वी खुल्या राज्य स्पर्धेत संभाजीनगरने त्यांना पराभूत केले आहे. त्यामुळे संघात आत्मविश्वास आहे. छत्रपती संभाजीनगर संघाला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रसन्ना पळनिटकर, राष्ट्रीय प्रशिक्षक गणेश बेटुदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याचबरोबर ज्योती रत्नपारखी (गायकवाड), मयुरी चव्हाण, ईश्वरी शिंदे यांच्या मार्गदर्शनात संघातील खेळाडू नियमित सराव करतात.
विजेता संघ पुढीलप्रमाणे
वैष्णवी भोंडे, स्नेहल पाटील, कांचन कुबडे, भूमिका परांडे, निशा गरड, समीक्षा खराटे, अदिती सरवटे, आंचल हिवराळे, सायली तांदळे, अभया जाधव. ‘आता आमचा सामना सांगलीशी होणार आहे. प्रत्येक सामन्यानुसार आम्ही रणनिती ठरवतो. यंदा आम्ही निश्चित विजेतेपद घेवून येऊ, असे विश्वास वैष्णवी भोंडे, स्नेहल पाटील, समीक्षा खराटे या खेळाडूंनी व्यक्त केला.’