औरंगाबाद7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित वरिष्ठ गट निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत रणजीपटूंचा भरणा असलेल्या नाशिक संघाने हिंगोली विरुद्ध 8 गडी राखून विजय मिळवला. या लढतीत तन्मय शिरोडे सामनावीर ठरला.
बिडकीन येथील मैदानावर झालेल्या लढतीत प्रथम खेळताना पहिल्या दिवशी हिंगोलीने 36.2 षटकांत सर्वबाद 169 धावा काढल्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावली तेव्हा नाशिकने 17.4 षटकांत 1 बाद 145 धावा उभारल्या होत्या. संघ अद्याप 24 धावा मागे आहे. दिवस अखेर हीच धावसंख्या राहिली. दुसऱ्या दिवशी 145 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. संघाने 56.3 षटकांत 8 बाद 392 धावांवर डाव घोषित केला. त्याचबरोबर 223 धावांची आघाडी घेतली. कालचा नाबाद शेख यासेरने केवळ 6 धावांची भर घालून 48 धावांवर परतला. कुणाल कोठवडेने 57 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 38 धावा केल्या. सिद्धार्थ नाका 17 व एस.आर. गडाख 19 धावांवर परतला. त्यानंतर आलेल्या सत्यजित बच्छावने शतक झळकावले. त्याने 63 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 6 उत्तुंग षटकार खेचत 100 धावा ठोकल्या. तेजस पवारने त्याला साथ देत अर्धशतक केले. तेजसने 50 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारासह 59 धावा जोडल्या. हिंगोलीच्या सनी पंडीतने 3 व अभिनव कांबळेने 2 गडी बाद केले.
शुभमच्या शतकाने हिंगोली अडीशचे पार
प्रत्युत्तरात नाशिकने दिलेल्या 223 संघाने 54 धावांची नाममात्र आघाडी घेतली. यात सलामीवीर शुभम जाधवने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत शतक झळकावले. त्याने 140 चेंडूंत 16 चौकार खेचत 116 धावा काढल्या. सॅडी पाटीलने 37, राहुल देशमुखने 17, प्रतिक बोधगिरेने 43 व संकपाळ हलदकरने 40 धावांचे योगदान दिले. नाशिकच्या तन्मय शिरोडेने 51 धावांत 5 गडी बाद केले. सत्यजित बच्छावने 2 व शेख यासेरने एकाला टिपले.
नाशिकचा अवघ्या 22 चेंडूंत विजय
हिंगोलीने दिलेल्या 54 धावांचे आव्हान नाशिकने 2 गडी गमावत अवघ्या 22 चेंडूंत गाठले. यात सलामीवीर शेख यासेरने फटकेबाजी करत 16 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचत नाबाद 46 धावांची विजयी खेळी केली. मुर्तुझा ट्रंकवाला 7 व कुणाल कोठावडे 1 धावांवर परतले. सिद्धार्थ नाका (०) नाबाद राहिला. सॅडी पाटीलने एकमेव बळी घेतला. कुणाल धावबाद झाला.