पुणे5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
कारमधून प्रवास करणार्या तरुणांना ओव्हरटेक करुन थांबण्याचा इशारा करीत टोळक्याने त्यांना शिवीगाळ केली.तसेच लुटमार करण्याच्या उद्देशाने ‘आम्हाला कट का मारला, तुमच्या गाडीचे हप्ते किती थकले आहेत, गाडी जमा करतो’ असे म्हणत बळजबरीने गाडी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणांनी प्रतिकार केल्यामुळे चोरटे पसार झाल्याची घटना पुणे – अहमदनगर रस्त्यावर उरळी कांचन ते सोरतापवाडी परिसरात घडली आहे.
याप्रकरणी कृष्णा कदम (वय- 28, रा. हनुमानवाडी, केळगाव,पुणे) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तिघा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा कदम आणि त्यांचा मित्र सचिन नावडकर हे कार मधून प्रवास करीत होते. त्यावेळी पाठीमागून कारमधून आलेल्या तिघांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे कृष्णाने गाडी थांबविली असता, तिघांनी त्यांना शिवीगाळ केली. आमच्या गाडीला कट मारुन का आलात, असे म्हणत चोरट्याने सचिनच्या कानातील सोन्याची बाळी बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी त्यांनी चोरट्याला धक्का दिला. त्यानंतर दुसर्या आरोपीने जवळ येउन तुमच्या गाडीचे किती हप्ते थकले आहेत, गाडी जमा करतो असे म्हणत तो सीटवर बसला आणि जबरदस्तीने गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असताना कृष्णा आणि सचिनने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाल्यामुळे चोरटे पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे याबाबत पुढील तपास करीत आहेत.
दाम्पत्याला मारहाण
मद्यपीला दुकानासमोर उभा राहून देउ नको, असे म्हणत टोळक्याने किराणा माल विक्रेत्या दाम्पत्याला बेदम मारहाण केली. तलवारीने दुकानातील साहित्याची तोडफोड करुन नुकसान केल्याची घटना 12 मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास येरवड्यातील सिद्धार्थनगरमध्ये घडली आहे.
इलियास शेख (वय 45), सलमा शेख (वय 48), फारुख शेख (वय 22), नदीम शेख (वय 20), अमिन शेख (वय 19 ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय शिंदे (वय 34, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयच्या घराशेजारी राहणारा मजहर दुकानासमोरुन मद्याची बाटली घेउन जात होता. त्यावेळी इलियासने मजहरला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर त्याने अक्षयला दम देत संबंधिताला दुकानासमोर थांबू द्यायचे नाही, असे बजावत मारहाण केली. त्यानंतर इतर नातलगांना बोलावून घेत हातात तलवारी घेउन अक्षयच्या दुकानातील साहित्याची तोडफोड केली. तर सलमाने अक्षयच्या पत्नीला मारहाण केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस गुरव पुढील तपास करीत आहेत.