पुणे11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
हनी ट्रॅपमध्ये अडकलेले डीआरडीओ मधले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांची 14 दिवसांची पोलिस कोठडीची रिमांड मंगळवारी संपली. त्यानंतर त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्र. जाधव यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने डॉ. कुरुलकर यांची 29 मे पर्यंत 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे.
सरकारी वकील चंद्रकिरण साळवे यांनी डॉ. कुरुलकर यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली. यावर न्यायालयाने कुरुलकर यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. त्यामुळे डॉ.कुरुलकर यांची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात केली जाणार आहे. डॉ. कुरुलकर यांना हाय शुगर असल्याने डॉक्टरांनी त्यांना नियमित दिलेली औषधे आणि घरचा आहार देण्यात यावा अशी मागणी डॉ.कुरुलकर यांचे वकील ऋषिकेश गानू यांनी न्यायालयाकडे केली. यावर न्यायालयाने कुरुलकर यांना त्यांची नियमित औषधे कारागृहात देण्यात यावी या मागणीस मंजूरी दिली आहे. मात्र, घरचा डबा देण्यास न्यायालयाने कुरुलकर यांना नकार दिला आहे.
शेंडे यांच्या जबाबाबाबत एटीएसची गोपनीयता
बेंगलोर येथील एअर फोर्स येथील एक कर्मचारी निखिल शेंडे यांना देखील डॉ.प्रदीप कुरुलकर यांच्या प्रमाणे पाकिस्तानी आयपी ऍड्रेस वरून हनी ट्रॅप सारखा कॉल आला होता.ज्या नंबरने कुरुलकर यांना कॉल आला होता.त्याच नंबरने निखिल शेंडे यांना देखील कॉल आल्याची बाब तपासात समोर आली आहे.त्यामुळे निखिल शेंडे यांचा देखील जवाब घेण्यात आला असून एअर फोर्सच्या चौकशी समितीकडून त्यांची चौकशी केली जात आहे. याबाबत शेंडे यांचा सीआरपीसी 164 प्रमाणे न्यायालयासमोर कबुली जबाब नोंदविण्यात आला आहे. मात्र शेंडे यांच्या जबाबाबाबत एटीएसने गोपनीयता बाळगली आहे.